Monday, January 29, 2018

हळदीकुंकू

#हळदीकुंकू
वाण 'लुटायचे' अशी खास ओळख असणारे म्हणजे संक्रांतीचे हळदीकुंकू. सध्याची पद्धत पाहता 'लुटणे' का म्हणायचे? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे . खरेतर वेगवेगळ्या वस्तुंचे वाण मांडून ठेवायचे आणि हळदीकुंकू घेऊन बायकांनी त्यातील आवडेल ती वस्तू घ्यायची,असे होते म्हणून याला लुटणे म्हणतात. मैत्रिणीशी बोलताना मला यात आणखी एक कल्पना सुचली , मी ही वेगवेगळ्या(उपयोगी) वस्तू मांडल्या, चिठ्ठ्यात त्याची नावे लिहिली. ज्या वस्तूच्या नावाची चिठ्ठी जी उचलेल ते तिचे वाण (घावंल त्याला पावंल) असे वाण लुटले. त्यांनाही मजा वाटली.
           माझे लहानपण ज्या कॉलनीत गेले तिथे सगळ्या जातीधर्माच्या बायकांना हळदीकुंकूचे बोलावणे असायचे.
कपाळाला नाही पण मंगळसूत्र किंवा गळ्याला हळदीकुंकू लावून घ्यायच्या त्या, वाणही घ्यायच्या... आनंदाचे वसे जणू.
विधवा बायका किंवा वयस्कर आजी, त्यांनाही बोलावले जायचे. त्यांना ऑकवर्ड वाटू नये म्हणून , 'देण्याघेण्यात काही चुकले/ विसरले तर सांगायला ,लक्ष तरी ठेवायला या, म्हणजे आम्हाला आधार वाटेल' अशी गळ घालून का होईना , पण त्यांनाही आनंदात सहभागी होता येईल असे बघितले जायचे.
          मध्यंतरी हळदकुंकू संदर्भात काही उलटसुलट विधाने वाचनात आली. 'काही आक्षेपार्ह गोष्टीमुळें आम्ही हळदीकुंकू करायचे सोडले',वगैरे... मला एक कळत नाही , असे म्हणणाऱ्या आणि त्याला पाठींबा देणाऱ्या लोकांना त्या आक्षेपार्ह गोष्टीं टाळून स्वतःच्या घरी हळदीकुंकू करण्यासाठी कुणी अडवले होते का? असे केले असते तर खरेच ते एक कौतुकास्पद पाऊल ठरले नसते का?
         सगळी घरे आपलीशी करणारा हळदीकुंकूहून चांगला कार्यक्रम माझ्यातरी पाहण्यात नाही.  एखादी प्रथा पूर्णपणे चुकीची ठरवून त्याला फेकून देण्यापेक्षा त्यात जे चांगले आहे ते उचलून पुढे चालवण्यात शहाणपण आहे.
        इथे अमेरिकेत तर आम्ही मैत्रिणी एकत्र येऊन असे आनंदाचे वसे लुटण्याचे बहाणेच शोधत असतो. 👇🏻


Tuesday, January 16, 2018

फुगेवाला

#फुगेवाला
 Ice festival च्या तंबूत दिसला तो.
जत्रेत/सर्कशीत मोठ्या पायांवर उभे राहणाऱ्या विदूषकासारखा उभा होता. डोक्याला हॅट , हॅट ला नमुना म्हणून एक twised बलून ने केलेला डॉगी चा आकार लावून.
कंडक्टर सारखी पिशवी, त्याला असंख्य कप्पे, त्या कप्प्यात असंख्य रंगाचे उभट फुगे, एका कप्यात कात्री न एकात पैसे.
समोर पालक-मुलांची रांग, आणि बघ्यांची गर्दी.
कारण मागणी तसा पुरवठा.
युनिकॉर्न, मिकी माउस, डॉग, कॅट, बटरफ्लाय, स्वोर्ड..
 काय मागेल ते तो त्याच्या बलून ने करून देत होता.
ऑर्डर मिळाल्यावर तो आकार, त्याला लागणाऱ्या फुग्याचे रंग त्याला किती आणि कसे ट्विस्ट दिले म्हणजे पाहिजे तो आकार मिळेल हे सगळं जणू छापलच होतं त्याच्या डोक्यात.
प्रत्येक ऑर्डर पूर्ण करायला त्याला दोन मिनिटं तरी त्याला लागत होती , पण मुलांची रांग काही कंटाळत नव्हती ,
त्याच काम बघताना मुलांबरोबर पालकही गुंतत होते.
घाई न करता , मन लावून, तो त्याची प्रत्येक कलाकृती करत होता , त्यामुळे एकही फुगा चुकीचा फुगला नाही ,फुटला नाही, extra ही झाला नाही.
काठीला गोल फुगे अडकवणारा फुगेवाला पासून हा इनोव्हेटिव्ह फुगेवाला हा प्रवास आवडला.
मूळ पाया पक्का ठेवून अपडेट आणि अपग्रेड होणाऱ्याला नामशेष होण्याच्या धोका नसतो.

वीरश्री वैद्य - करंदीकर