Friday, March 30, 2018

_घरोघरी_तीच_आजी

#आजी_रॉक्स_सगळे_शॉक्स
यावर्षी मी मुलींना सांगितलंय की मी काही उन्हाळी वाळवण पाठवणार नाही , तुम्ही पण मला काहीही पाठवू नका" , इति आज्जी ( दरवर्षीचा डायलॉग )
काही दिवसांनी मामाबरोबर डबे येतातच.....
" आग आई काय हे , या वयात काय काहितरी करत बसतेस, कशाला एवढं  ?" इति लेकी ....
काय ? फार काही नाही केलं....
यांना पोह्याच्या पापड्या आवडतात म्हणून केल्या थोड्या!
परवा उपास होता, साबुदाणा जरा जास्त भिजवला त्याच्याही पापड्या केल्या , खिचडी जात नाही हल्ली!
उडदाचे पापड किती महाग ? अमुक पैशाला अमुकच येतात, त्यात बघ तुम्हाला तिघींना झाले पापड..
यांना म्हणलं मी मटकीची डाळ दळून आणणार असाल तरच करणार सांडगे ... आणलं यांनी दळून ....!
गुरुवारच्या मंडईत मोठे बटाटे चांगले मिळाले आणि स्वस्त मग थोडा कीस केला... मला खिचडी नाही आवडत उपासाला...
एवढंच ... बाकी काssही केलं नाही....तुमच्या लहानपणी केवढं करायचे... होत नाही आता...
********************************************
दिवाळी
"यावर्षी मी फराळाचं काहीही करणार नाहीये . हल्ली विकत मिळतं सगळं, आणि अगदी बारा महिने मिळतं.
पूर्वी दिवाळीलाच व्हायचं त्यामुळे भरपूर खायची मुलं",

मग सुरुवात लाडवाच्या डब्यापासून होते आणि त्याची कारणे पुढीलप्रमाणे,
फक्त लाडूच देणारे तिघींना... करंज्या कुणी खात नाही म्हणून थोड्याच केल्यात.... चकल्या घालायला आता जोर नाही लागत त्यामुळं कडबोळ्या केल्यात....
शंकरपाळ्या चहात बुडवायला बर्या लागतात .....
ह्यांना आवडते म्हणून थोडी शेव केली
कुणी शेजारीपाजारीनी दिले तर त्यांना द्यायला नको का फराळ म्हणून केलं आपलं थोडं.
पूर्वी डबेच्या डबे भरून करायचे ..
आता होत नाही पूर्वीसारखं....चिवडा केला की पाठवते "
#_घरोघरी_तीच_आजी

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, March 22, 2018

गरिबी...

परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट असताना , पैसा जोडत - साठवत जाणे , हौसमौज न करणे , वायफळ खर्च न करणे, आहे त्यात भागवायचा प्रयत्न करणे ही म्हणजे काटकसर...
ती आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हा , कमी / जास्त प्रमाणात करावी लागते.
पण परिस्थिती चांगली झाल्यावर , आर्थिक आवक चांगली झाल्यावर आपल्या आवडीच्या गोष्टींवर , छंदावर, updated सोयीसुविधांवर पुरेसा पैसा नक्की खर्च करावा. चांगले, पौष्टिक खावे / प्यावे.
पण ह्या गोष्टी जे करू शकत नाहीत ते काटकसरीची सीमारेषा ओलांडून कंजूषपणाकडे वळलेले असतात.
      काही वेळा खूप वर्षे काटकसरीत काढलेल्याना लाखो रुपये मिळाले तरी मुळाशी कसलीतरी अनामिक भीती असते बहुतेक की 'ते दिवस परत आले तर?' किंवा
( इतक्या वर्षांच्या काटकासरीचा ) सवयीचा परिणामही असू असतो की चांगले दिवस येऊनही ते मानसिक गरिबीतच जगतात....
    ही भीती वाढत्या वयाची अपरिहार्यताही असावी कदाचित ......
मानसिक गरिबी आणि आर्थिक गरीबी यांचं एक दुष्टचक्र असतं, जोपर्यंत आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत  ते  आपली पाठ सोडत  नाही.....
मग साठवलेल्या पैशाला नको असलेल्या अनेक वाटा फुटत जातात ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर