Tuesday, August 7, 2018

युरेका

#युरेका
आज पुन्हा तेच झालं, त्याची शिकवताना चिडचिड आणि त्यानंतर तिचा अजूनच उडालेला गोंधळ. गेले महिनाभर तो तिला गाडी शिकवत होता, आणि त्याच्या म्हणण्यानुसार अजूनही ती खूप चुका करत होती.
झालं असं की इथे ड्रायव्हिंग क्लास लावणं परवडणारं नव्हतं, पण वाहतुकीचे नियम काटेकोर पाळले जायचे त्यामुळे चालवणं सोपं होतं. तो सुद्धा त्याच्या मित्राकडूनच गाडी शिकला होता. थोडी चूक सुद्धा महागात पडायची. लायसन्स वर पॉईंट चढणार , दंड तर भरवाच लागणार , गाडीचा आकार तर बिघडणारच , तो सरळ करायला खिशाला पुन्हा बांबू लागणार अशा भित्या आणि टेन्शन त्याला  असायचं आणि तो काही प्रोफेशनल ड्राइविंग टीचर वगैरे नव्हता.
हे सगळं तिला माहीत होतं , समजतही होतं, पण चिडल्यावरचे त्याचे वेंधळी , बावळट आणखी काही नवे नवे शब्द निघायचे ते तिला फार टोचायचे. नंतर त्यालाही वाटायचं ओव्हररिऍक्ट झालो आपण....पण एक चूक आणि पुढचे सोपस्कार त्याच्या टेन्शनने तो त्या वेळेत फाsर पॅनिक व्हायचा.
दुसऱ्या बाजूला ती मनाशी ठरवायची की त्याला बोलायची एकही संधी द्यायची नाही, इतकं व्यवस्थित चालवून दाखवायचं , पण ती काल जशी चुकली तशी सिच्युएशन आली की तो रागावूनच सांगायचा आणि मिठाचा खडा पडायचा, ती गोंधळायची, आणखी चुकांची भर पडायची.
           संध्याकाळच्या या ड्रायव्हिंगच्या तासाभराचे सावट आताशा तिच्या संपूर्ण दिवसावर पडायला लागले होते , स्वयंपाकातही कधी नव्हे तो गोंधळ होऊ लागलेला.
तिने ठरवलं...
'नकोच ते ...मला नाही शिकायचं ..सांगायचं आज त्याला. या विचारानेच तिला बरं वाटायला लागलं.
 ''रोज वेंधळी म्हणतो मला , इतकीच वेंधळी असते तर तुला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी जागेवर मिळतात, ते का उगीच ? एखादा पदार्थ खावसा वाटला तर त्याचं सगळं साहित्य घरात नेहमीच असतं, कुणाला जेवायला बोलावलं तर कमी पडत नाही आणि उरतही नाही, इतकी अचूक जजमेंट असतात माझी."
या स्वगताची तार अचानक व तुटली ती तिच्याच आतून आलेल्या प्रश्नाने ,
' मग गाडी चालवताना हे जजमेंट कुठं जातं बरं?'
-' हो ना, खरंच की ! म्हणजे आपण काही वेंधळ्या नाही! आपल्याकडे चांगली जजमेंट पॉवर आहे!'
तिने याच्या मुळाशी जायचे ठरवले . कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये शिकली होती ना ती तसे रूट कॉज काढायचे...
'तो शेजारी बसून आत्ता ओरडणार , मग रागवणार अशा शक्यता गृहीतच धरून बसतो, त्यामुळे आपण
चुका करतो का काय?
 का असं आहे की , तो बसल्यामुळे चला काहीही झाले तरी तो आहे अशा कम्फर्ट झोन मध्ये आपण नकळत जातोय? जबाबदारी नकळत त्याला देतोय?
मग जर तो शेजारी नसेल तर?
हो हे ट्राय केलं पाहिजे , तरंच कळेल आपलं ड्रायव्हिंग जजमेंट".
विचार शेवटाला पोहोचला तोपर्यंत तीने गाडीची चावी हातात घेतलेली. रविवार असल्याने तो क्रिकेट खेळायला गेला होता , दोन तास तरी येणार नव्हता.
             एकटी गाडी चालवायची पहिलीच वेळ ... तिने बेल्ट लावला...चावीने गाडी स्टार्ट केली... पार्किंग मधून बाहेर काढली ..... स्टॉप साइन, राईट लेन चे नियम पाळत सोसायटी मधून बाहेर काढली... कोपऱ्यावरच्या मॉलला मागे टाकून नेहमी तिला अवघड वाटणारा राईट टर्न लीलया घेतला ....पुढे येणारा प्रत्येक टर्न तिचा आत्मविश्वास वाढवत गेला ....एक मोठा गोल फिरून ती घरी परत आली.कधी नव्हे ते दोन गाड्याच्या बरोबर मध्ये आज तिने गाडी पार्क केली.
स्वतःशी हसत हसत तिने घराचे दार उघडले.
आज तिचं काहीही बिघडणार नव्हतं , ना फूड , ना मूड.

©वीरश्री वैद्य - करंदीकर