Monday, July 24, 2017

सुदिनम्|

लहानपणी वाढदिवस असलेला दिवस खूप छान असायचा . वाढदिवसामुळे मोठं कोणी ओरडायचं नाही, खेळांत पण कुणी birthday boy/girl ला चिडवायचं, त्यांच्याशी भांडायचं नाही .........फक्त त्या दिवासापुरतं......
        ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी संध्याकाळी बोलावणं  असायचं ........त्यातल्या त्यात नवीन कपडे घालून ( कारण नवे कपडे हट्ट करून आधीच काही वेळा घालून घेतलेले असायचे , मग त्यातल्या त्यात कमी वापरलेला ड्रेस घालून ) त्याच्या घरी जायचे , गिफ्ट घेऊन .......
कोणी पेन्सिल, कंपास बॉक्स, बिस्किटाचा पूडा , असे काही बाही आणायचे.
क्रिम चे decoration असलेला केक बघायलाच खूप छान वाटायचा,..........ताजा वगैरे असण्याची गरज नसायची.
त्यावर डेकोरेशन केलेल्या फुलाचा piece आपल्यालाच यावा अशी इच्छा मनात केककडे बघून मागितली जायची.
 केक कापणे , गिफ्ट देणे , कार्यक्रम व्हायचा ,यात टाळ्या वाजवताना birthday boy/ girl ऐवजी केक कडेच जास्त लक्ष असायचे . लिम्लेटच्या गोळ्या, पार्लेG ची चॉकलेट हीच के ती रिटर्न गिफ्ट.
                   मग paper डिश मध्ये फरसाण किंवा तत्सम चिवडा जिलबी आणि केकचा छोटासा piece यायचा, ते क्रिमचं फुल नाही पण पानांचे तुकडे - बिकडे असायचे , तेवढंच आपलं समाधान..........खायला सुरुवात जिलबीला केकचे क्रिम यापासून व्हायची.
केक आणि चिवडा एकदम संपला पाहिजे असा निर्धार करून खायला सुरुवात करायचो ( निर्धारच करावा लागायचा कारण केकच आधी संपणार हे माहीत असायचे ).
काहीजण फरसाण / चिवडा पटापट खाऊन घ्यायची आणि
" काकू , संपलं " असे म्हणून अजून घेऊन यायची , काहींचं निम्मं पण संपलेलं नसायचं. दुसऱ्यांदा आणलेला फरसाण /चिवडा काही संपायचे नाही . मग ठरलेले वाक्य
 " काकू घरी घेऊन जाऊ?" काकू काय म्हणणार " ने" .
त्याची री ओढत आपण पण तसंच विचारायचं, कारण केक संपलेला असायचा. मग ते पेपर डिश मध्ये तसंच न सांडता हळूहळू चालत घरी घेऊन यायचं.
         झोपही मग कसल्याशा आनंदात लागायची.

          परवाच एका गोड मैत्रिणीच्या गोड मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो तेव्हा आठवलं हे सारं.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, July 21, 2017

वाचनवेड

#_वाचनवेड
हल्ली बऱ्याच मुलांना वाचनाची आवड नसते. Electronic media दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याचा खूप मोठा पगडा आहेच , त्याचबरोबर आई-वडिलांनाच ती आवड नसणे हे पण मुख्य कारण आहे. घरात कधी कोणाला वाचताना बघितलेच नसेल तर मुले तरी का घेतील हातात पुस्तके ?
        काहीवेळा आई वडीलांपैकी एकाला आवड असली तरी मुलांना असतेच असे नाही . आई होण्याचा विचार असतानाच हे  आणि यासारखे काही प्रश्न मनात येत होते .
'आपल्यासारखी आवड आपल्या मुलाला लागेल का ? '
'त्याचा interest असेल का ?'  'त्याची आवड निर्माण व्हायला काय बरे करता येईल ?'
याचे उत्तर मला वाचनाची आवड का लागली यात होते.
ज्यांनी माझ्यात ही आवड निर्माण केली ते माझे वडील म्हणतात की,  '
मुले बोलायला लागली की त्यांना गोष्टी सांगायला सुरुवात करायची . वाढत्या वयानुसार त्यांचे interest , वाढत जाणारे आकलन लक्षात घेऊन त्यात बदल करायचे ,
म्हणजे लहान असतात तेव्हा प्राण्यांच्या गोष्टी ,नंतर राजाच्या,  जादूच्या , मग moral stories इसापनीती सारख्या असे करत जायचे .  हे सगळे करताना आपला गोष्टींचा साठा वाढवत जायचा. .... त्याना मध्ये मध्ये गोष्टी वाचूनही दाखवायच्या ..... मग वाचता यायला लागल्यावर त्यांना स्वतः गोष्टी वाचायची आवड लागते . इ• ४ थी ते ७ वी या वयोगटात असतानाच वाचनाची  चटक  लागली  तरच ते चांगले वाचक बनतात. प्रौढ वयात ही आवड निर्माण  करता येत नाही. ', इति बाबा.
             वाचक आई - वडिलांना मुले पण आपल्यासारखा पुस्तक खाणारी (वाचणारी) व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे  . पुस्तक खाऊन काय मिळते हे खाल्ल्यावरच कळते. आपल्या व्यक्तिमत्वात अंतर्बाह्य , positive बदल चांगली पुस्तके घडवतात.
           " मला पुस्तक वगैरे वाचायला आवडत नाही " असे अभिमानाने सांगणारी माणसे माझ्या पाहण्यात आहेत.
(ज्या गोष्टीबद्दल खंत वा वाईट वाटले पाहिजे त्या अभिमानाने कसल्या सांगता? )आणि वाचनाची आवड का नाही हे explain करणारे त्यांचे आई - बाबा सुद्धा .
 ' मी कॉमर्स / सायन्स ला होते / होते.
 ' english medium ला होतो/ होते.
तर पालक ----
' खूप अभ्यास असतो, त्यातून शाळा गुरुकुल type आहे.
' शाळेत स्पोर्ट्स आणि इतर activity असतात की personality development ला.( त्यासाठी पुस्तके कशाला?
काही कॉमन कारणे ---
'वेळच मिळत नाही.'
'वाचायला सुरुवात  केली की झोप येते.'
'फेसबुक whatsapp वरील वाचन पुरेसे आहे.'
'नोकरीतून रिटायर झाल्यावर वाचायचेच आहे.'
'आता आम्हाला मराठी वर्ड्स  व त्यांचे मिनिंग्ज रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं.' ( मग English books वाचा , त्यांचीही बोंब).

            असली लटकी कारणे ' वाचन ' या माणसाच्या महत्वाच्या गरजेसाठी कशी काय देऊ शकतात याचे नवल वाटते.  एकूणच वाचनात no interest.
 " पुस्तक वाचणे आणि त्यावर चर्चा करणे" हे वाक्य जणू काही
 "प्यायला बसतात आणि नंतर बरळत असतात " अशा प्रकारच्या हेटाळणीच्या सुरात मी ऐकलेले आहे ,
आधी राग आला , पण नंतर कीव.......
कारण हे खालचे चित्र या बाबतीत बऱ्यापैकी बोलके आहे.

@वीरश्री वैद्य - करंदीकर


Wednesday, July 19, 2017

मूल झाल्यापासून ते किमान 4-5 वर्षाचे होईपर्यंत त्या आईला असंख्य माणसे असंख्य सल्ले देत असतात .
त्यापैकी काहीच माणसांचे सल्ले हे अचूक असतात .
( ४० - ५० सल्ले देणे , मग त्यातला एक बरोबर आल्यावर , "बघ तरी मी म्हणत होते/होतो", ही असली माणसे या अचूक सल्ले या विभागामध्ये मोडत नाहीत).
        यांचा मुख्य सल्ला criteria म्हणजे बाळाचा आकार , बाळ healthy हवे याचा अर्थ निरोगी असा न घेता, गुबगुबीत घेतला जातो.
 मग बाळ अंगाने बारीक असेल ( भले त्याचे वजन प्रमाणात का असेना)  त्याला गुबगुबीत करण्याचे असंख्य सल्ले चकटफु मिळतात.
त्याला कसं खाऊ घालायचं , लंगोट घाल , diaper नको ( किंवा vice versa), शी होत नाही का? , अमक देत जा , पातळ झाली की लगेच तमकं देत जा, सर्दी कशी झाली ?
बांधलं नव्हतं का डोक्याला?  , sweater घाल लगेच ,
 ड्रायफ्रूट दे , खजुर देच, अंड नाहीं खात, मग पनीर देच.
खात नाही , उलटी काढतो ?असं कसं काढतो ?
,घालायचं दामटून, थांब मी दाखवते / दाखवतो.

       या सगळ्या सल्ल्यांमध्ये आईला जराही उसंत मिळूच नये असं टाईट शेड्युलच सांगत असतात काहींजण....
या सल्ल्यांच्या गर्दीने आई म्हणून तिला निसर्गतः मिळालेले बेसिक instict कामच करत नाहीत.
           दुसऱ्या बाजूला आईची कामं ही आईलाच करावी लागतात , दमटून खायला घालणे या प्रकरणात उलटी , शी यांनी खराब झालेले सगळे काही आईलाच साफ करावे लागते , ते ही लगेच .......ते करायला ना सल्ले देणारे येतात,............ ना खायला घालून दाखवणारे

   कहर तर तेव्हा होतो जेव्हा मूल सांभाळण्याचा काहीही अनुभव नसणाऱ्या ( नवीन लग्न झालेल्या अर्ध्या हळकुंडाच्या...... ') 'डायपर काढून त्याला मोकळे ठेव' , मी घातली आहे ना तशी मऊ ओढणी पांघरत जा 'असले काही म्हणतात ( तेव्हा मनात ' शु - शी तू काढणार आहेस का ?' असे येतेच)........

      आता काही पूर्वीसारखी 9 - 12 व्या वर्षी लग्न होत नाहीत . आई होण्याचा विचार चालू असताना , पूर्ण medical check up करणे, निरोगी मातृत्व, गर्भसंस्कार या सगळ्याची माहिती मुली बऱ्यापैकी घेतात . बाळ आई वर अवलंबून असेपर्यंत काय काय करायचे याची मानसिक तयारी ते पोटातील बाळ , ते नऊ महिने , त्याच्या कळा या काळात होते .
( काही अपवाद असू शकतील पण निसर्गतः मादीमध्ये हे आईपण उपजतच असते).
याही पलीकडे अनुभवी माणसे महत्वाची आहेतच, अगदी कळेनासे झाले , काही भीती वाटली की नवीन आया विचारतातच , तेव्हा द्या सल्ला किंवा सांगा उपाय .
        पण या सल्ले देणाऱ्यांपैकी ( यात अनुभवी पण आली)  2 ते 3 % माणसेच अचूक सल्ला देतात. या माणसांबाबत माझे एक निरीक्षण सांगते . हे आल्या आल्या सल्ल्यांचा भडिमार करत नाहीत.
 "बाळ रडतय? मग वुडवर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला मी त्याच्या बाबाना आणि त्यांची आई तुझ्या बाबाना हेच देत होती",
( जसा काही खानदानी रिवाज असावा) असलं काही म्हणत नाहीत .
आई-बाळाचे रुटीन , त्याची अंगकाठी, झोप, भूक, आलेली अनुवंशिकता याचे एक-दोन दिवस अगदी बारीक observation करतात . आई कुठे अडतेय, तिला नेमकी कशात मदत वा अनुभवी सल्ला हवाय हे ओळखतात.
मग अशावेळेला मिळालेला सल्ला साहजिकच अचूक आणि रामबाण असतो.
माझ्या माहितीतल्या अशा बायकांनी त्यांची स्वतःची डिलिव्हरीच्या वेळेचा अंदाजही आला होता , त्या वेळी त्या स्वतःच जाऊन ऍडमिट होऊन , थोड्या वेळातच बाळाला जन्म दिलेल्या आहेत........

@वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, July 10, 2017

काजवे

आज खूप वर्षांनी काजवे पाहिले ( चमकले नाही पाहिले)आणि मनाला आलेली मरगळ दूर झाली.
    सकाळी इथे पाऊस पडून गेला ,जमीन भुसभुशीत झाली ,मातीत गारवा आला. खूप दिवसांनी कामे लवकर आटोपली आणि बाल्कनी मध्ये बसायला मिळाले ......
आणि लक्षात आले की समोर पार्क मध्ये काजवे दिसत आहेत. खात्री झाली तेव्हा जुने काहीतरी गवसल्याचा आनंद झाला.

        वेन्नानागर ला राहायचो तेव्हा खूपदा पाहिलेले, तिथे काजवे दिसणं ही खूपच comman गोष्ट होती.
मग ते बाटलीत पकडणे....तोंडात धरून चेहऱ्याचे भूत करणे हे खेळ त्याबरोबरच आले....
आजी सांगायची तिचे आजोबा धोतराच्या सोग्यात काजवे अलगद पकडून त्याचा बॅटरी सारखा उपयोग करायचे .....  मजा वाटायची तेव्हा .........

          १०-१५ वर्षांनी ते पुन्हा दिसले आज ......

    ' कट्यार काळजात घुसली' सिनेमातील ' मनमंदिरा...' गाण्याने आठवण करून दिली होती काजव्यांची...
तो सिनेमा गाजला त्या दरम्यान ' असे कीटक खरच असतात का ?' असा प्रश्न विचारलेला कानावर आला,
 तेव्हा ' म्हणजे तुम्हाला माहीत नाही?' च्या आश्चर्याबरोबर वाईट ही वाटले .
निसर्गाची ही किमया प्रदूषणाने इतकी दुर्मिळ व्हावी की काजव्यांना बघणे सोडा पण यांच्याबद्दल ऐकलेले पण नसावे?
लगेच पुढचा विचार आला ......
' म्हणजे उद्या माझ्या मुलालाही ( 'सव्य' ला )हे बघायला नाहीच मिळणार का कधी ?'
" आमच्या लहानपणी मागे light असणारे किडे होते ," अशी नुसतेच fantacy वाटणारे सांगावे लागणार असे वाटत होते .
         मी माझ्या शालेय वयात गो. नि. दांडेकरांच्या भ्रमंती वर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ' भिजल्यावर चमकणारे लाकूड....
भुंग्यानी पोखरलेले बांबू बनात वारे शिरल्यावर बासरीचा आवाज काढत होते .......
असे काहीबाही निसर्गाची किमया वाटणारे अनुभव वाचले होते.
मी काजव्यांबद्दल सांगेन तेव्हा माझ्या मुलाला पण असेच वाटेल कदाचित .... असंच वाटलं होतं.

          आशेचा किरण चमकणे हा वाक्प्रचार काजव्यांवरूनच घेतला असावा बहुतेक .....…...मला इतक्या वर्षांनी दिसले
म्हणजे माझ्या मुलालाही कधी ना कधी दिसतील हे जाणवलं ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर



Thursday, July 6, 2017

इथे सध्या summer चालू आहे . घरातूनच समोरचा पार्क दिसतो. बऱ्याच भारतीय लोकांचे ज्येष्ठ आई - वडील आलेले दिसतात . बघून खूप बरे वाटते.
         या इथे येणाऱ्या आई वडिलांचे मला कौतुक आहे ते याचसाठी की
' , आम्ही काही येणार नाही ....... तुम्हीच या ......
 आम्हाला भीती वाटते.............आम्हाला नाही करमणार..... किंवा आम्हाला आमचे घर सोडून दुसरीकडे कुठे कुठे करमत नाही. ............असली कारणे ना देता ,
 जशी मुले सुट्टी-सणावाराला ( वरची कुठलीही कारणे न देता ) घरी येतात तसेच इथे आले आहेत म्हणून.  

इथे येणाऱ्या आई-वडीलांपैकीपैकी बरेचजण तर कदाचित भारतात  राज्याबाहेरही गेले नसतील .......
बरेच जणांना english येत नसेल...........
बाहेर वागण्याबोलण्याचा confidence ही नसेल कदाचित , पण तरीही लाडक्या मुलांसाठी ( यात मुलगा-मुलगी दोन्हीही आले) ते या सगळ्या न्यूनगंडावर मात करून 25 ते 30 तासाचा विमानप्रवास करून  आले त्याच खरंच कौतुक...!
         
               जसे आई - वडिलांना मुलांची आठवण येते ,ती जवळ असावे असे वाटते , त्याप्रमाणे मुलांनाही येतेच की , म्हणून तर ती सणावारी सुट्टी मिळाली की गावातल्या
आई-बाबांकडे धावत येतात. अगदी पुण्या-मुबई मध्ये शहरापासून लांब उपनगरात राहणारे सुद्धा सुट्टी मिळाली की मुख्य गावभागात राहणाऱ्या आपल्या आई-बाबांकडे येतात.
 अगदी तसेच....... इथे येणारे आई - बाबा करतात.😊

@ वीरश्री वैद्य - करंदीकर