Monday, July 24, 2017

सुदिनम्|

लहानपणी वाढदिवस असलेला दिवस खूप छान असायचा . वाढदिवसामुळे मोठं कोणी ओरडायचं नाही, खेळांत पण कुणी birthday boy/girl ला चिडवायचं, त्यांच्याशी भांडायचं नाही .........फक्त त्या दिवासापुरतं......
        ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी संध्याकाळी बोलावणं  असायचं ........त्यातल्या त्यात नवीन कपडे घालून ( कारण नवे कपडे हट्ट करून आधीच काही वेळा घालून घेतलेले असायचे , मग त्यातल्या त्यात कमी वापरलेला ड्रेस घालून ) त्याच्या घरी जायचे , गिफ्ट घेऊन .......
कोणी पेन्सिल, कंपास बॉक्स, बिस्किटाचा पूडा , असे काही बाही आणायचे.
क्रिम चे decoration असलेला केक बघायलाच खूप छान वाटायचा,..........ताजा वगैरे असण्याची गरज नसायची.
त्यावर डेकोरेशन केलेल्या फुलाचा piece आपल्यालाच यावा अशी इच्छा मनात केककडे बघून मागितली जायची.
 केक कापणे , गिफ्ट देणे , कार्यक्रम व्हायचा ,यात टाळ्या वाजवताना birthday boy/ girl ऐवजी केक कडेच जास्त लक्ष असायचे . लिम्लेटच्या गोळ्या, पार्लेG ची चॉकलेट हीच के ती रिटर्न गिफ्ट.
                   मग paper डिश मध्ये फरसाण किंवा तत्सम चिवडा जिलबी आणि केकचा छोटासा piece यायचा, ते क्रिमचं फुल नाही पण पानांचे तुकडे - बिकडे असायचे , तेवढंच आपलं समाधान..........खायला सुरुवात जिलबीला केकचे क्रिम यापासून व्हायची.
केक आणि चिवडा एकदम संपला पाहिजे असा निर्धार करून खायला सुरुवात करायचो ( निर्धारच करावा लागायचा कारण केकच आधी संपणार हे माहीत असायचे ).
काहीजण फरसाण / चिवडा पटापट खाऊन घ्यायची आणि
" काकू , संपलं " असे म्हणून अजून घेऊन यायची , काहींचं निम्मं पण संपलेलं नसायचं. दुसऱ्यांदा आणलेला फरसाण /चिवडा काही संपायचे नाही . मग ठरलेले वाक्य
 " काकू घरी घेऊन जाऊ?" काकू काय म्हणणार " ने" .
त्याची री ओढत आपण पण तसंच विचारायचं, कारण केक संपलेला असायचा. मग ते पेपर डिश मध्ये तसंच न सांडता हळूहळू चालत घरी घेऊन यायचं.
         झोपही मग कसल्याशा आनंदात लागायची.

          परवाच एका गोड मैत्रिणीच्या गोड मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो तेव्हा आठवलं हे सारं.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment