Tuesday, January 8, 2019

नको तेच उद्योग मंडळ

#नको_तेच_उद्योग(मंडळ)
आजी-आजोबा बरेचदा नातवंडांना म्हणतात, "आमची मुलं नव्हती बाबा एवढी व्रात्य" .       असं काही नसतं .
सगळ्यांनी आपापल्या लहानपणी मोठ्यांना वैताग आणलेला असतोच . नाणी गिळणे, नाकात शेंगदाणा घालणे, खोली किंवा बाथरूम मध्ये जाऊन आतून कड्या लावून अडकणे, खिडक्यांच्या काचा फोडणे, कात्रीने स्वतःचे /भावंडांचे केस कापणे, पिठाच्या धान्याच्या रांगोळ्या काढणे, नळ चालू करून सगळा पिंप रिकामा करून घराचा स्विमिंग पूल करून ठेवणे हे आणि असले असंख्य प्रकार प्रत्येकाने केलेलेच असतात.
तरी आगाऊपणाची ठळक उदाहरणे झाली ,बाकी मित्रांच्या टोळीमध्ये परस्परसंमतीने बिनबोभाट उरकलेले उद्योग हा तर स्वतंत्र पोस्ट चा विषय होईल.😆😆
          मुलाचे लहानपण ते नातवंडं येणं यात किमान 25 वर्षांचा काळ मध्ये उलटून गेलेला असतो ,त्यामुळे मुलांनी लहानपणाचे बरेच असे वैताग आणलेल्याचा विसर आजी आजोबाना पडलेला असतो. दुसरं असं की मुलांचे शिक्षण , त्यांनी मिळवलेली बक्षिसे, त्यांची करिअर development असे खूप आनंदाचे आणि कौतुकाचे प्रसंग एव्हाना त्यांच्या डोक्यात घर करून असतात.
          ज्या घरात लहान मूल असतं ,त्या घरातल्या वस्तूंची रचना त्या प्रकारात असते ,म्हणजे सगळ्या वस्तू almost तीन फुटांच्या वर असतात. सैल झाकणाचे डबे वरच्या शेल्फ मध्ये असतात . विळी / चाकु/ स्क्रू ड्राइव्हर अशा टोकेरी ( इजा होऊ शकणाऱ्या ) वस्तू कट्ट्यावर ,खिडकीत अशा उंच ठिकाणी जातात. हॉल मधले टोकेरी कोपऱ्यांचे टेबल वा तसे फर्निचर नसते किंवा असलेच तर त्याच्या कडा रबरी कॉर्नर ने कव्हर केल्या जातात , पाण्याची भांडी मुलांच्या हाताला येणार नाहीत अशी वर ठेवली जातात.... वगैरे वगैरे . मुलांनंतर पुढे नातवंडे येईपर्यंत पुढल्या खूप वर्षात वरचेवर येऊन घरात वावरणारे हक्काचे लहान मूल नसते, त्यामुळे मोठ्यांच्या सोईनुसार घरातल्या वस्तूंच्या जागा सेट झालेल्या असतात . जसे की देवघर खाली येते , पिण्याच्या पाण्याचे हांडे ,कळश्या ज्या कट्ट्यावर चौकोनी बेसिन शेजारी असायच्या त्या खाली भरून ठेवलेल्या असतात. हे अस्स सगळं घर म्हणजे नातवंडांची प्रयोगशाळाच. मग काय होतात कुटिरोद्योग सुरू....
          मुलाच्या खोड्या निस्तरताना तरुण असलेले आजी -आजोबा नातवंडपर्यंत मात्र थकलेले असतात, त्यामुळे साहजिकच इतक्या वर्षांनी लहानग्यांनी घरभर सुरू केलेले प्रयोग त्यांना वरचा डायलॉग म्हणायला भाग पाडतात😂.
© वीरश्री वैद्य - करंदीकर