Wednesday, November 14, 2018

अपेक्षांची दुसरी बाजू

बाळ असल्यापासून  आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो ... आपल्याही नकळत...  हेच की  रात्री जास्त वेळा उठू नये, जास्त रडू नये,  नीट पोटभर (त्यांचं का आपलं याबाबत गोंधळ ) खावं,  अंघोळ नीट करून घ्यावी वगैरे.....
             शाळेत गेल्यावर स्मार्ट असावं, तो अमका ढमका कसा बोलतो तसंच व्यक्त व्हावं, उगाच त्रास देऊ नये कोणाला , पण स्वतःचही सहज देऊ नये दुसऱ्याला, थोडक्यात डिफेनसिव्ह पण असावं वगैरे ,वगैरे ....

     अतिशयोक्ती नाही पण मरेपर्यंत काही ही लिस्ट संपत नाही...
तसे पाहता त्यांचा जन्म हा आपला निर्णय असतो, ते काही उपकार वगैरे नसतात.....त्यांनीही ते मानू नये....
       
         याची दुसरी बाजू मात्र फार कमी लोक विचारात घेतात किंवा त्यावर काही अंमलबजावणी करतात....
स्वतंत्र अस्तित्व म्हणून त्यांच्याही अपेक्षा असतातच की...पालकांकडून....
जास्त नाही ,छोट्या छोट्या (त्यांचं वयआहे तेवढ्याच छोट्याश्या),     वेळ देऊन खेळणे.... हाक मारल्यावर बघणे ..ओ देणे.. काय म्हणतोय ते ऐकून घेणे....
        पुढे शाळेत गेल्यावर सोडायला येणाऱ्या पालकांकडे बघून तसे तसे स्मार्ट वागणे ... इंग्लिश - विंग्लिश मुव्हीमध्ये थोडी झलक दाखवली आहे याची...
कालपरत्वे स्वतःच्या वागण्यात, पेहेरवात, स्वभावात बदल करणे....
म्हातारपणी किमान थोडाफार व्यायाम , फिरून  स्वतःला फिट ठेवणे , अंगावर दुखणी न काढणे, वेळच्या वेळी चेकअप करून घेणे वगैरे वगैरे ...
       पालक झालो की दुसरी बाजू विसरायला होते बहुतेक (यात मीही आलेच ) . बालदिन निमित्ताने  पालक म्हणून आत्मपरीक्षण आणि भविष्यविचार करताना जे मनात आले ते मांडले . अर्थात मीच मांडलेली ' दुसरी बाजू ' यावर विचार तर आहेच पण ते अमलात आणायला आजपासून सुरुवात करेन हे मात्र ठरलं!

©वीरश्री वैद्य - करंदीकर