Thursday, April 27, 2017

वळू

मागच्या आठवड्यात खूप दिवसांनी वळु चित्रपट पाहिला . वळू सारखा रूपकात्मक आणि तरीही निखळ मनोरंजन करणारा मराठी चित्रपट आजवर पाहण्यात नाही आला.
                पहिल्यांदा पाहीला तेव्हा मला माझ्या लहानपणीची आठवण आली. त्यात अस्सल ग्रामीण भाषा आणि शब्द आहेत जसे की ' ईचीभन माजावर आलंय, वशाट ,म्हसाडं ,छचोर धंदे इ. शब्दांबरोबर इंग्लिश बोलण्याचे विनोदी प्रयत्न....... सगळंच.
             "आज काय जेवायला ?"  ---- मटण,
 आणि " गुरुवारी आमच्या घरी वशाट खात नाहीत ." या दोन एकाच घरातील संवादात दुसऱ्या वाक्यात मटण किंवा तत्सम नॉनव्हेज हे शब्द का वापरले नाही? , हे जाणकारांनाच कळेल.
           
           माणसांच्या स्वभावाचे नमुने असणारी गावातील माणसे, राजकारणात उतरु पाहाणारे तरुण नेंंतृत्व, प्रेमी युगुल, स्थानिक नेत्यांचे खंदे (?)कार्यकर्ते, खोड्या काढणारी , इरसाल माणसे, जागृत देवस्थान (खरे असो वा नसो पण सांगणार जागृत) ,  सगळं गाव ज्याचे ऐकू शकते असा ज्येष्ठ आजा,
 वळू ला पकडायला आलेला फॉरेस्ट ऑफिसर , आणि त्याचा भाऊ हे दोन विरुद्ध स्वभावाचे combination....... सगळंच nostalgic.
              यात तो ज्या पद्धतीत वळू पकडतो , ती पद्धत कुठल्याही प्रॉफेशन मध्ये ideal पद्धत आहे . म्हणजे एखाद्या engineer चा प्रोजेक्ट असो, ...catering असो, ....saloon वा एखादा व्यवसाय असो , ...गाठायचे एखादे ध्येय, .
.सर करायचे शिखर , ,..... किंवा आयुष्यातला एखादा अवघड प्रश्न वा परिस्थिती .....वगैरे वगैरे .
           
              यात हा ऑफिसर प्रशिक्षित असतो......( हे जास्त महत्वाचे कारण बघून शिकणे हे कौतुकास्पद आहे पण प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक प्रोफेशन मध्ये acceptable नाही.) .....

बिबटे, लेपर्ड पकडणारा हा असा ऑफिसर officer असूनही वळू बद्दल सगळी माहिती घेतो ..... उदा. तो कधीपासून असा त्रासिक झाला .... का झाला ?..... त्यांच्या सवयी काय ?...... रोजचे रुटीन काय?...... इ. इ. त्याला पकडण्यासाठी proper प्लॅन करतो , आवश्यक ती योग्य माणसे मदतीला घेतो ....... वळू ला प्रत्यक्ष पाहतो ....आवश्यक त्या बंदुका कायम जवळ बाळगतो.. आशा सगळ्या तयारीनिशी , कुणाचे काहीही नुकसान होऊ न देता पकडतो....... यात तो वळूला इजा होऊ नये म्हणून गळ्याऐवजी शिंगात दावे टाका असे सांगतो त्यावेळेला proper training आणि अनुभव  ( कुठलाही proffesion मध्ये ) किती महत्वाचा आहे हे कळतं.
         
            हेच way of working यशस्वी लोकांचे असते , ते वर सांगितलेल्या सगळ्या proffesion मध्ये लागू पडते .
म्हणजे बघा ...
* ध्येय ठरवणे ( set a goal) .....
* त्याचा आवाका लक्षात घेणे......
* त्याची साधक बाधक माहिती  घेणे ......
* त्यानुसार स्वतः मध्ये कौशल्ये विकसित करणे          
   (develop skills n ability),
*  प्रशिक्षित होणे ( training) ,
*  मदतीला माणसे निवडणे ,(skilled resorses) ,              *  साधनसामुग्री जवळ बाळगणे ( wel - equipped) ,
*  काम प्रत्यक्ष पाहणे ( field visit) ,
*   loop holes काढून टाकून सगळी तयारी करणे    
    ( proper planning)
*  या सगळ्यांच्या मदतीने पद्धतशीरपणे काम पार पाडणे
    (goal achieved ).
              यातली कुठलीही पायरी skip केलीत तर काम नीट होणार नाही. जसे चित्रपटात तो वळू ला जेव्हा प्रत्यक्ष बघतो ... त्याचे साथीदार हाकेच्या अंतरावर असतात पण तो त्यांना बोलावत नाही , निरीक्षण करून वळूचा आकार ..... आवाका याचा अंदाज घेतो .... पकडायची घाई करत नाही...... योग्य संधी साधून मगच काम पार पाडतो.
             हे सगळे corporate skills एका ग्रामीण पार्श्वभूमीवर आणि अतिशय विनोदी ढंगात दाखवले आहेत .
अशी मंडळी द. मा. मिरासदार यांच्या पुस्तकात कुठे ना  कुठे भेटतात. चित्रपटाचे music आणि title song ना असणारी व्यंगचित्रे ' Malgudi Days ' ची आठवण करून देतात.
             
            या सगळ्याव्यतिरिक्त काही स्वछ आणि निर्मळ माणसे जशी की जीवन ची माय, किंवा येडी जनी , मन जिंकून जातात.
            सगळेच nostalgic !!!

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, April 25, 2017

एखादे गाणे instrumental ऐकले की तेच पुनः lyrics पण ऐकायचा मोह होतो .
       कधीकधी काम करताना नुसते instumental ,
Background ला लावून ठेवावे वाटते.
        इथे thanks to internet TV मनात आले की लगेच बघता येते. 😊 आणि ऐकता पण येते .

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, April 24, 2017

पुरुषाचा जन्म

पुरुषाचा जन्म

परवा एक सिनेमा बघताना एक संवाद होता त्यात बहीण भावाला म्हणते "तू बदललास"(आशय : बायकोमुळे). ज्यांच्या लग्नाला चार ते सहा महिने झालेत अशा बऱ्याच मुलांना असे त्यांच्या घरच्यांकडून कधीतरी ऐकायला मिळाले असेल.
         
              'काल काल पर्यंत कुठला शर्ट घालू?'......... ते ....'अमुक अमुक खायला कर'....... असे सांगणारा मुलगा किंवा भाऊ तेच त्याच्या बायकोला सांगू लागतो .........त्यामागे त्याचा उद्देश तिला जास्त महत्व देण्याचा नसून तिला घरात कंफर्टेबल करण्याचा असतो ,
पण त्याच्या जवळची माणसेच हे समजून न घेता त्याच्यावर सरळ आरोप करतात.
         
 त्याच्याशी लग्न करून येणारी मुलगी हि त्याच्याच भरवशावर येत असते , आणि जन्मभर त्याच्या बरोबरची सहचारिणी म्हणून राहणार असते ........ सासरी फक्त नवराच तिचा हक्काचा माणूस असतो आणि हे त्या मुलालाही चांगले माहित असते म्हणूनच त्याची प्रायोरिटी बायको होते. ......पण याचा अर्थ असा मुळीच नसतो कि तो बाकीच्यांना विसरून गेला.
             वास्तविक पाहता लग्न झाल्यानंतर मुलाच्या प्रायोरिटीज बदलणार किंवा विभागल्या जाणार यासाठी त्यांच्या घरच्यानी तयार असायला हवे........विशेषतः लहान भाऊ, बहीण यांनी तयार असायला हवे कारण आत्तापर्यंत त्यांच्यावर असलेला दादा चा फोकस आता विभागाला जाणार असतो . कधी ना कधी या लहानांचे सुद्धा  लग्न होणार असते  त्यांना याच प्रकारात atjust करावे लागणार असते , पण असे होताना फार कमी दिसते ......अशा वेळेला आई - वडिलानी त्यांना समजवायला हवे......त्यांना नवीन माणूस घरात येणार आहे यासाठी मानसिक दृष्टीने तयार करायला हवे.......
पण असेही फारच कमी होते.....त्यांना समजावणे दूरच
कित्येकदा त्यांच्या जोडीने
( मुलांमध्ये भेदभाव न करणारी) आईसुद्धा ज्यावेळी तू बदललास असे मुलाला म्हणत असेल त्यावेळी त्याच्या मनाची अवस्था काय असेल  त्यालाच  ठाऊक.
           
@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Saturday, April 22, 2017

पेन आणि पालकत्व

हिरो पेनची शाळेत असताना खूप क्रेझ होती ..... जवळजवळ प्रत्येकाकडे असायचाच तो, काहीं जवळ तर दोनसुद्धा असायचे. इतर बॉलपेनच्या तुलनेत तो बऱ्यापैकी महाग होता....... मला वाटते आजही महाग आहे....
             शाळेत असताना माझ्याजवळ पण हिरो पेन होता  एकदा तो हरवला.....खूप शोधला पण सापडलाच नाही.....तोंड पाडून मी घरी आले.
काहीही झाले तरी घरी ते निसंकोचपणे आणि मोकळे पणाने सांगता येईल असे पोषक वातावरण घरात होतेच .... त्यामुळे घरचे काय म्हणतील? अशी भीती वा दडपण नव्हते , पण आपण आपली अत्यंत आवडती आणि महाग वस्तु हरवली याची गिल्ट मनात असायची.

पेन हरवल्यावर साधे 5 व 10 रु चे बॉलपेन असायचे जवळ मग त्यानेच लिहायचे असे ठरवून टाकले मी.....पण दोन-तीन दिवसांनी आईने पुन्हा हिरो चे पेन आणून दिले.......( देताना सज्जड दम.... पुन्हा हरवलास तर याद राख अशी समज वगैरे काहीही न देता)
एखाद्या कंटाळवाण्या दिवशी कापसाची म्हातारी उडताना बघितल्यावर जसा आनंद होतो ना तसा झाला मला.

शालेय आयुष्यात दोन तीन वेळा पेन हरवल्याच्या घटना घडल्या ( हे casually नाही पण प्रांजळपणे कबुली आहे ) पण आई पुन्हा आणून  देत गेली. तिच्या या देण्यामुळे मी वस्तू वापराबाबत निष्काळजी झाले किंवा हरवण्याबाबत casual झाले ....असे काही झाले नाही .

नंतर खूप वर्षांनी आठवले म्हणून मी तिला विचारले
," मी दोन तीनदा हरवून सुद्धा तू मला न रागावता परत असा महाग पेन परत कसा काय द्यायचीस? , मी लाडाने बिघडेन असे नाही का वाटले तुला ?  "
ती म्हणाली , मुळात मुले कुठलीही गोष्ट मुद्दाम हरवत किंवा कुठे फेकून देत नाहीत, तू वस्तू वापरण्याबाबत निष्काळजी कधीच नव्हतीस ,......... तुझ्या पेनाची निप तूटलिये , टोपण हरवलेंय असं कधी व्हायचे नाही .........जुनी पुस्तके पण तू निघालेली पाने चिकटवून किंवा शिवून, त्याला कव्हर घालून  व्यवस्थित वापरायचीस. म्हणजेच दिलेल्या गोष्टीची किंमत तुला होती ......शाळेतुन निघण्याच्या गडबडीत , कधी नकळत बेंच खाली पडून हरवतात गोष्टी  ........ ती हरवली याची गिल्ट पण तुझ्या मनात असायची.  आणि सर्वात महत्वाचे
काही गोष्टींची मजा त्या त्या वयोगटातच असते ."

इथे आईने माझा एक स्वतंत्र व्यक्ती समजून केलेले निरीक्षण आणि त्यावरचा निर्णय खूप आवडला .

             हिरो पेनाची क्रेझ आज पण आहे , आज मी दहा पेन विकत घेऊ शकते ,पण लिहिणार काय ? शाळेत जसा त्याचा वापर होता तितका नाही करू शकणार. हि जशी पेनाची गोष्ट तशीच कंपास बॉक्स ची ते बाबांनी आणून दिले , खूप वेगवेगळे तसे शाळेत फार कुणाचे इतके नसायचे. '
आम्ही दहावीपर्यत एकाच तो टिपिकल पत्र्याचा कंपासबॉक्स वापरला' हे रद्दड वाक्य माझ्या वाट्याला आले नाही ,
आता खूप महाग कंपासबॉक्स पण मी घेऊ शकते....
पण आता मी त्याचे काय करणार? त्याची मजा शालेंय आयुष्यातच होती.

               हा पेनाचा किस्सा मी माझ्या नवऱ्याला सांगितला तर त्यान त्याचीे आठवण मजेशीर पद्धतीत सांगितली '
माझ्या घरी तर ओरडा बसणार हे ठरलेले असायचे , सहजासहजी दुसरा पेन मिळायचा नाही .... आता कशाने लिहिणार ? असा विचार करत निप, टोपण आणि बाकी पेनाचे भाग आयात करून मी नवीन पेन बनवायचो. तुझी आई तुला पेन द्यायची त्यामुळे तू नवीन पेन तयार करण्याच्या सर्जनशीलतेला मुकलीस 😂😂😂

         विनोदाचा भाग सोडा , आज मी पण एक पालक झाले मला इतर पालकांना प्रश्न विचारावा वाटतो
माझ्या आईच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय केले असते ?
मला काही पालकांकडून मिळालेली उत्तरे
1. पेन हरवल्याबद्दल एखादा दणका दिला असतात. आणि मग               महिन्याभराने तसले पेन दिले असते
2.ओरडलो नसतो पण  पुन्हा लवकर ते पेन दिले नसते .
3. पुन्हा पेन दिले असते पण सज्जड दम दिला असता कि आता हरवले तर परत देणार नाही
4. आम्ही इतक्या महागातले पेन देऊन नसते लाड करत नाही
याने मुले बिघडतात.
5. मुलांना थोडेतरी ओरडले च असतो त्याशिवाय त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कशी होणार ?
6. एकदा काय दहादा दिला असता, आम्हाला नाही मिळाले ते त्यांना आम्ही देणार
तुम्ही काय कराल ?

परंपरा

             एक काल्पनिक प्रसंग...... नात, आज्जीला भाजी टाकताना विचारते," तू तेलात मोहरी , हळद का टाकतेस ?"  (खरेतर माझी आई घालायची म्हणून मी घालते असे म्हणायचे असते )पण नातीला पटावे म्हणून आज्जी म्हणते "त्याने चांगली चव येते". दुसऱ्या दिवशी नात हळूच मोहरी आणि हळदीची चव घेऊन बघते आणि पुन्हा विचारते कि या दोन्हींची चव चांगली नाही मग पदार्थ कसा चांगला होते ?आज्जी कडे उत्तर नसते ......ती तोच प्रश्न आई ला विचारते. आई तर शिक्षिका...... पण तिच्याकडेही  उत्तर नसते.
ती अंतर्मुख होते....... आपल्याला कधी हा प्रश्न का नाही पडला?..... पण ती ही अभ्यासू........... मुलीकडून वेळ मागून घेते आणि उत्तर शोधायला लागते .जेंव्हा ते तिला सापडते तीला आपल्या पूर्वजांचा सार्थ अभिमान वाटतो. उत्तर असे की आपण स्वयंपाकात वापरतो ते तेल, मग अगदी ते शेंगदाण्याचे घाण्यातून काढलेले का असेना, त्यात काही अशुद्धी असतात त्या कमी करण्यासाठी मोहोरी नि जिरे तेलात ताडतडू देतात, आणि हळदीची कन्सेप्ट अशी की, हळद ही निर्जंतुकीकरणाचे काम करते. आयुर्वेद असे म्हणतो ती इतकी प्रभावी आहे की तुम्ही रोज एक चिमूट हळद खाल्ली तर तुम्ही वज्रदेही व्हाल. रोज आठवणीने हळद खाल्ली जाईलच असे नाही म्हणून ती फोडणीचाच एक भाग करण्यात आली.  आईने हे मुलीला सांगितले; त्यावर जुन्या लोकांनी कित्ती रिसर्च केलाय असे तिचे मत पडले. ती खुश झाली पण, त्याचवेळी आज्जी  मोठी असून तीला हे का माहित नाही ? हा ही नवा प्रश्न तिला पडला.
       आजही असे प्रसंग अनेक घरात घडत असतील. आज्जीच्या जागी दुसरे कोणी असेल.
आजही असे अनेक लोक आहेत जे पाळायच्या प्रथा, परंपरा या मागचे मर्म न जाणून घेता,  न विचारता वा, न विचार करता पाळत असतात. आपण विचारले तरी सरळ सांगतात की आमच्या वेळी 'असे का?' म्हणून विचारायची पद्धत (आपण मुभा म्हणूया) नव्हती.
मी म्हणते त्या वेळेला नव्हती पण, तुम्ही जाणते झाल्यावरही खरी कारणे शोधायचा प्रयत्न का नाही केला? अशामुळे काही रीती या खालील गोष्टीतल्या शिष्यांसारख्या पुढे नेल्या गेल्या. 
             एका साधुने एक काळी मांजर पाळली होती. ती यज्ञाच्या वेळी त्याच्या कामात फारच लुडबुड करायची.
साहजिकच त्या साधूने तिला त्या यज्ञ मंडपाच्या एका जवळच्या खांबाला बांधून ठेवले जेणेकरून कुत्र्याचे भय पण राहणार नाही. हळूहळू त्या साधूचे शिष्य तयार झाले. त्याच्या कडून यज्ञ कर्म शिकले. एवढेच नव्हे तर खांबाला मांजर पण बांधायला लागले.😆 आश्रमात नसेल तरी काळी मांजर शोधून आणून बांधायचे 😂😂😂
              यातही त्या शिष्यांनी हेच केले. गुरु ला विचारलेच नाही की काळी मांजर का बांधली?  किंवा स्वतःही लॉजिकल विचारच केला नाही. 
               काळ्या मांजराप्रमाणे इतरही उदा.आहेत. मराठा व बहुजन समाजात लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या हातात तलवार किवा कट्यार असायची. वरातीत तलवारीचे काय काम? विचारले तर रूढी, परंपरा , चालरीत असे
उत्तर असायचे. नंतर समजले  की फार पूर्वी वरातीवर डाकू कडून लूटालुटी साठी हल्ल्यात होत. आपलेच भाउबंद पिढीजात वैरामुळे वरातीत हिंसाचार करीत. तेव्हा स्वसंरक्षणासाठी नवरदेवाच्या हातात तलवार देण्याची प्रथा पडली?    या बाबतीत -- का? कसे? केव्हापासून? इत्यादी प्रश्न मनात निर्माण झालेल्या पाहिजेत , म्हणजे अंधानुकरण होणार नाही.
             परंपरांमागे दूरदर्शी हित असेल तर पूर्वजांचा अभिमान बाळगून ती पुढे नेऊया आणि त्यात या साधूच्या गोष्टीसारखा आंधळा , बिनडोक अनुयय दिसला तर तो दुरुस्त करून ती पुढे नेऊया;  पण हे सगळे कळणार केंव्हा जेंव्हा तुम्ही कारणे शोधायचा प्रयत्न कराल तर!
              मला माझे लहानपण आठवते. माझ्या आई-बाबांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नुसती दिली नाहीत; तर संदर्भ, घटना, प्रयोग, वाचन या आधारे ती शोधायलाही शिकवली. माझी आई तर जुन्या वळणात वाढलेली पण तिने माझे प्रश्न कधी टाळले नाहीत किंवा न पटणारी उत्तरे हि दिली नाहीत.
           आमच्या पिढीला 'मी कुठून आलो?' या प्रश्नाचे  'तुला दवाखान्यातून आणले' हे उत्तर पटले पण पुढच्या पिढीला नाही पटणार. ती आणखी  advance  आहे. कदाचित तुमच्या या उत्तराला हसून ती तुम्हाला त्याचे सायंटिफिक कारण ही सांगेल. अशी आणखी काही तीन -चार प्रश्नांची त्यांना न पटणारी उत्तरे तुम्ही सांगितलित तर त्यांच्या लेखी तुम्ही अडाणी ठराल. त्यामुळे पालक आणि (विशेषतः) आजी-आजोबा यांनी रीती-परंपरा यामागची (लॉजिकल) कारणे या मुलांना स्वतः सांगावित.  माहित नसतील तर शोधवीत. असे झाले तर ही पिढी आपल्या रीती- प्रथा- परंपरा (ऑर्थोडॉक्स न म्हणता) स्वतःहून आनंदाने, उत्साहाने पुढे नेईल.         



@वीरश्री वैद्य - करंदीकर