Saturday, April 22, 2017

पेन आणि पालकत्व

हिरो पेनची शाळेत असताना खूप क्रेझ होती ..... जवळजवळ प्रत्येकाकडे असायचाच तो, काहीं जवळ तर दोनसुद्धा असायचे. इतर बॉलपेनच्या तुलनेत तो बऱ्यापैकी महाग होता....... मला वाटते आजही महाग आहे....
             शाळेत असताना माझ्याजवळ पण हिरो पेन होता  एकदा तो हरवला.....खूप शोधला पण सापडलाच नाही.....तोंड पाडून मी घरी आले.
काहीही झाले तरी घरी ते निसंकोचपणे आणि मोकळे पणाने सांगता येईल असे पोषक वातावरण घरात होतेच .... त्यामुळे घरचे काय म्हणतील? अशी भीती वा दडपण नव्हते , पण आपण आपली अत्यंत आवडती आणि महाग वस्तु हरवली याची गिल्ट मनात असायची.

पेन हरवल्यावर साधे 5 व 10 रु चे बॉलपेन असायचे जवळ मग त्यानेच लिहायचे असे ठरवून टाकले मी.....पण दोन-तीन दिवसांनी आईने पुन्हा हिरो चे पेन आणून दिले.......( देताना सज्जड दम.... पुन्हा हरवलास तर याद राख अशी समज वगैरे काहीही न देता)
एखाद्या कंटाळवाण्या दिवशी कापसाची म्हातारी उडताना बघितल्यावर जसा आनंद होतो ना तसा झाला मला.

शालेय आयुष्यात दोन तीन वेळा पेन हरवल्याच्या घटना घडल्या ( हे casually नाही पण प्रांजळपणे कबुली आहे ) पण आई पुन्हा आणून  देत गेली. तिच्या या देण्यामुळे मी वस्तू वापराबाबत निष्काळजी झाले किंवा हरवण्याबाबत casual झाले ....असे काही झाले नाही .

नंतर खूप वर्षांनी आठवले म्हणून मी तिला विचारले
," मी दोन तीनदा हरवून सुद्धा तू मला न रागावता परत असा महाग पेन परत कसा काय द्यायचीस? , मी लाडाने बिघडेन असे नाही का वाटले तुला ?  "
ती म्हणाली , मुळात मुले कुठलीही गोष्ट मुद्दाम हरवत किंवा कुठे फेकून देत नाहीत, तू वस्तू वापरण्याबाबत निष्काळजी कधीच नव्हतीस ,......... तुझ्या पेनाची निप तूटलिये , टोपण हरवलेंय असं कधी व्हायचे नाही .........जुनी पुस्तके पण तू निघालेली पाने चिकटवून किंवा शिवून, त्याला कव्हर घालून  व्यवस्थित वापरायचीस. म्हणजेच दिलेल्या गोष्टीची किंमत तुला होती ......शाळेतुन निघण्याच्या गडबडीत , कधी नकळत बेंच खाली पडून हरवतात गोष्टी  ........ ती हरवली याची गिल्ट पण तुझ्या मनात असायची.  आणि सर्वात महत्वाचे
काही गोष्टींची मजा त्या त्या वयोगटातच असते ."

इथे आईने माझा एक स्वतंत्र व्यक्ती समजून केलेले निरीक्षण आणि त्यावरचा निर्णय खूप आवडला .

             हिरो पेनाची क्रेझ आज पण आहे , आज मी दहा पेन विकत घेऊ शकते ,पण लिहिणार काय ? शाळेत जसा त्याचा वापर होता तितका नाही करू शकणार. हि जशी पेनाची गोष्ट तशीच कंपास बॉक्स ची ते बाबांनी आणून दिले , खूप वेगवेगळे तसे शाळेत फार कुणाचे इतके नसायचे. '
आम्ही दहावीपर्यत एकाच तो टिपिकल पत्र्याचा कंपासबॉक्स वापरला' हे रद्दड वाक्य माझ्या वाट्याला आले नाही ,
आता खूप महाग कंपासबॉक्स पण मी घेऊ शकते....
पण आता मी त्याचे काय करणार? त्याची मजा शालेंय आयुष्यातच होती.

               हा पेनाचा किस्सा मी माझ्या नवऱ्याला सांगितला तर त्यान त्याचीे आठवण मजेशीर पद्धतीत सांगितली '
माझ्या घरी तर ओरडा बसणार हे ठरलेले असायचे , सहजासहजी दुसरा पेन मिळायचा नाही .... आता कशाने लिहिणार ? असा विचार करत निप, टोपण आणि बाकी पेनाचे भाग आयात करून मी नवीन पेन बनवायचो. तुझी आई तुला पेन द्यायची त्यामुळे तू नवीन पेन तयार करण्याच्या सर्जनशीलतेला मुकलीस 😂😂😂

         विनोदाचा भाग सोडा , आज मी पण एक पालक झाले मला इतर पालकांना प्रश्न विचारावा वाटतो
माझ्या आईच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय केले असते ?
मला काही पालकांकडून मिळालेली उत्तरे
1. पेन हरवल्याबद्दल एखादा दणका दिला असतात. आणि मग               महिन्याभराने तसले पेन दिले असते
2.ओरडलो नसतो पण  पुन्हा लवकर ते पेन दिले नसते .
3. पुन्हा पेन दिले असते पण सज्जड दम दिला असता कि आता हरवले तर परत देणार नाही
4. आम्ही इतक्या महागातले पेन देऊन नसते लाड करत नाही
याने मुले बिघडतात.
5. मुलांना थोडेतरी ओरडले च असतो त्याशिवाय त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कशी होणार ?
6. एकदा काय दहादा दिला असता, आम्हाला नाही मिळाले ते त्यांना आम्ही देणार
तुम्ही काय कराल ?

No comments:

Post a Comment