Monday, February 25, 2019

#प्रपोज

हा त्यां दोघांचा ऑलमोस्ट 13 वा व्हॅलेंनटाईन होता. आज तो ऑफिसला नेहमीपेक्षा लवकर जाणार होता आणि लवकर येणार होता , कारण त्यांच्या मित्रमंडळात आज एकत्र सेलिब्रेट करायचे ठरले होते. मुलांसाठीचे खाणे ,खेळणी ,पुस्तके अशी तयारी करून ती आधी पोहोचणार होती . मोठा मुलगा छोटूला छान सांभाळत असल्याने ,त्यांना फार काळजी नसायची. एकाला दोघे असले की आईवडील थोडे निर्धास्त होऊ शकतात नाही का !
         तसं तर त्यांचं लव्ह मरेज.  लग्नाआधीचे दिवस जितके छान , तरंगत गेले , लग्नानंतर मात्र गालबोट लागल्यासारखे झाले. असूया , मत्सर, किंवा स्त्रीसुलभ हेवा तिच्यात मुळीच नव्हता. दागिने ,कपडे ,पैसे, घर यातही अडकणारी नव्हती ती त्याच्या आई-बाबांचं  मात्र 'मी' आणि 'माझं' कधी सुटलं नाही. 'My home my rules' हा फंडा. टाळी एका हाताने वाजत नाही हे बरोबर, पण समोरचा तुमच्या चार गोष्टी समजून घेतोय म्हणल्यावर तुमचीही तसं करण्याची जबाबदारी बनते ना, सारखंच समोरच्यावर बोट ठेवायचे तर घर शांत राहील का? कुठलेही छंद , मित्र- मैत्रीण नसणं ही गोष्ट स्वभावात अनेक निगेटिव्ह बदल करते , जणू स्लो पॉयझनिंग. म्हणजे समारंभात एखादं टोळकं सतत टीकेच्या सुरात असत ना ,टीकेचं लक्ष्यही absolutely बिनडोक ... म्हणजे केस किती लांब आहेत नई का हिचे ,पण मऊ नाहीत अजिबात ; ती अमकी - ढमकी शिकलेली आहे खूप , नोकरीही भक्कम पगाराची , घरचं करून जाते कामाला ,पण दिसायला काही खास नाही ह् ;  - हे असं जवळचं सगळंच. नकारात्मक बाजूला झुकणारे स्वभाव आणि अडेलतट्टू वृत्ती.
तिने सासरी atjust करण्याचा हरघडी प्रयत्न केला या गोष्टीचा सगळ्यात मोठा साक्षीदार तो स्वतः च होता .
त्याला वाटायचं एखादं भावंड असायला पाहिजे होतं आपल्याला , आई-बाबांचा आपल्यावरचा फोकस विभागला गेला असता ,झालेला त्रास सौम्य झाला असता.
             इथे अमेरिकेत आल्यावर जीवाला थोडी शांतता मिळाली, त्यामुळेच राहून गेलेला दुसरा चान्स त्यांनी  इथे घेतला. ते नऊ महिने आणि डिलिव्हरी खूप अवघड गेली. ती मैत्रिणीत खिदळताना म्हणायचीही ' वर हात लावून परत
आलेय मी'. खरंच होतं. त्याला स्वयंपाक यायचा नाही याची गिल्ट या काळात अनेकदा वाटली त्याला, ते त्याच्या लेखी दुय्यम किंवा नावडीचं काम होत अशातला भाग नव्हे ,पण हे स्किल इतक्या प्रकर्षाने कधी आपल्याला लागेल असं वाटलं नव्हतं त्याला. 'प्रेग्नसी पिरियड आणि डिलीव्हरी क्रिटिकल असेल' ही Dr ची वॊर्निंग डोक्यात सतत असायची.' तिला काही झालं तर ' ची शक्यता त्याची झोप उडवून जायची. मग तो जरुरी पुरता स्वयंपाक शिकला. तिला शक्य तेवढी शारीरिक, मानसिक विश्रांती दिली त्याने. काय केलं म्हणजे तिला बरं वाटेल ? याचा विचार करत असतानाच  'गरजेच्या वेळी तिच्या बाजूने ठामपणे उभं राहणं' हे तिला हवं असणार एकमेव सुख आपण दिलं नाही याची जाणीवही त्याला याच काळात झाली.
            दुसरा लेक दोन वर्षांचा होत आला , आणि ती जराशी सुटी झाली. मुलाची जबाबदारी बरोबरीने घेत ,त्या दोघांनाही किमान गप्पा मारायला थोडा वेळ मिळू लागला. ती सुद्धा तिच्या 'शिकवणे , वाचन, व्यायाम' या त्रिसूत्रीत परत गेली.
           आज प्रेमाचा दिवस. छान रेड कलरचे मॅचिंग कपल ड्रेस घालून चारही जोडपी तयार होती. चक्क आज सगळ्या पतीदेवांनी स्वयंपाकाचा भार उचलून एक एक पदार्थ आणला  होता. खरं तर हेच valentine चं मोठं गिफ्ट होतं. पण खरा रोमॅंटिक टास्क तर पुढे होता. काही कपल्सचं अरेंज मॅरेंज त्यामुळे 'प्रोपोज' करायचं राहूनच गेलं म्हणून लालचुटुक गुलाब आणले होते, आणि प्रत्येकाने बायकोला प्रोपोज करायचं होतं.
           आणि त्याला क्लिक झालं, हीच ती वेळ बोलण्याची ... मोकळं होण्याची . फक्त बायकांच्याच मनात साठतं असं कुठेय. पुरुषांच्याही साठतं की. शब्द जुळवायचीही गरज त्याला पडली नाही. त्याचा टर्न आला... हातात फुल धरून तो तिच्यासमोर गुढग्यावर बसला......
 " आपला हा दुसरा प्रोपोज आहे खरं तर , आधीचाही आठवतो .....किती छान दिवस होते ते.....
मला माहित आहे मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तुला माझ्या घरात खूप मानसिक त्रास झाला. ज्याच्या भरवशावर लग्न करून या घरात आलो तो माणूस खंबीर पाठीशी उभा असेल तर कोणत्याही परिस्थितीत बायको आनंदाने राहू शकते. हे कळायला उशीर झाला मला. तू बरोबर असूनही तुला त्रास होत असताना ठामपणे तुझी बाजू नाही घेतली मी. I m sorry. यामुळे आयुष्यातला खूप मोठा काळ तुझ्या क्षमतांचा विस्तार तू करू शकली नाहीस. यालाही अप्रत्यक्षपणे मी जबाबदार आहे. पण आता आपल्याला वेळ मिळतोय , मी तुला कायम सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन, नवरा - बायकोच्या पलीकडेही आपण आधी जसे एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो, ते विसरूनच गेलो , तसे पुन्हा बनुया. स्वच्छ मन असणारी पार्टनर मला मिळाली ,मी लकी आहे खरंच!
"Will you marry me again ?"
-  "Yes",  डोळ्याच्या कडा पुसत ती म्हणाली.
 डोळ्यासोबत मनावरच्या ओझ्याचाही बोळा निघाला....पाणी वाहतं झालं.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

(सत्यकथेवर आधारित)