Tuesday, May 12, 2020

दवाईसुंदरी दिवस

#दवाईसुंदरी_दिवस

गेले दहा-बारा तास अविरतपणे कळा देत होती ती. नर्स येऊन बघून गेल्या त्यालाही 2-3 तास झाले. हे पोटाचे ओझे लवकरात लवकर सोडून मोकळे व्हावे एकदाचे. कधी येणार वेळ? नर्स एकमेकांशी बाहेर गप्पा मारत उभ्या नुसत्या , सात्विक संताप आला तिला.
 त्यात पँन ची ही सोय नव्हती.....ती तशीच कशीबशी उठली टॉयलेट चे दार थोडे उघडे ठेवून जाऊन आली ,तशीच विव्हळत बेडवर आडवी झाली .त्या एकदा येउन पाहून गेल्या , पुन्हा गप्पा मारीत लांब उभ्या राहिल्या., हिचा राग पुन्हा वाढला.
मी इतकी विव्हळतेय आणि ह्या गप्पा मारत हसतायत...
आत्ता या क्षणी हातात येण्यासारखं काही असत ना तर ते  भिंतीवर थडाथड फेकून मारायची इच्छा झाली तिला.
या सगळ्या मनस्थितीत कळा मात्र दुप्पट वेगाने येऊ लागल्या. तिच्या कण्हण्यात झालेला सूक्ष्म फरक त्यांच्या अनुभवी कानांनी टिपला होता . त्या तिघी लगबगीने आत आल्या . त्यातली एक म्हणाली ," चला घ्या आत हिला , आता होईल ही".
       आत नेल्यावर च्या प्रत्येक टिपेच्या कळेला त्याचा हात तिच्या केसातून आईच्या मायेने फिरत होता " आई होणं सोपं नसतं ग पोरी ......लाव जोर लाव
...पुश कर "झालं हं ,झालं .... थोडंच बघ .... पुश कर ... पुश कर  .... सुटशील लवकर.....असा आवाज लांबून कुठूनतरी तिच्या कानाला जाणवत होता. बाळाच्या रडण्याचा आवाज आला , क्लान्त होऊन पडून राहिली ती.
      तिसरीत शाळेच्या स्टेजवर गेली होती ,प्रखर लाईट समोर अंधार , काही सुचेना ,कळेना , सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात असताना ,विंगेत बाईंचा चेहरा दिसला , अक्षरशः आई सारखा वाटला तो......
आताही तसंच झालं होतं. तिला तोच केसातून हात फिरवणारा चेहरा मिटल्या डोळ्यांनाही दिसत होता.
          तोपर्यंत बाळाला धुवून ,गुंडाळून त्यांनी तिच्या शेजारी ठेवले ..... आणि त्या नन्तर दिसलाच नाहीत.
डिसचार्ज च्या दिवशी तिने त्यांना शोधून हाका मारून बोलवले , हातात नारळ आणि काही पैसे ठेवले आणि एक घट्ट मिठी मारली.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, April 7, 2020

हनुमान

#हनुमॅन
एखादि गोष्ट हवी असेल तर न मागताही मुळातच मनकवडा असलेला मामा ती देतो, मला तू मामासारखाच वाटतोस . मामासुद्धा तुझा उपासक , बलोपासक , सगळ्याना आधार वाटणारा असाच , त्याचं अस असणं खूप जास्त कारणीभूत आहे खरं तर तुझी माझी ओळख करून देण्यात. आजोबांनीही गोष्टी सांगताना मला तुझ्या खूप जवळ आणून सोडलं.  तू माझा सुपरहिरो 'हनुमॅन' झालास. तुझ्याबद्दलच एक आश्वस्थ कुतूहल कायम राहिलं. शेवटच्या गाडीने गावाच्या फाट्यावर उतरल्यानंतर घरी जाणाऱ्या प्रत्येक लहानथोराला तुझे नुसते स्मरण म्हणजे जणू बुलेटप्रूफ जॅकेटच.
रामायणातील गोष्टींमध्ये तुझ्या वेगवेगळ्या पराक्रमांसकट कायमच भेटत राहिलास. मोठी झाले तसतशा आणखी गोष्टी कळत गेल्या ......
तुझे व्यक्तिमत्त्वच इतके पावन पवित्र , कर्तव्यनिष्ठ की प्रत्यक्ष शनी ला ही इतक्या व्रतस्थाला साडेसाती कोणत्या कारणाने द्यावी ? असा प्रश्न पडला. अनेक बाधा घालवण्यासाठी , मानसिक कणखरपणा येण्यासाठी तुझी स्तोत्रे रामबाण उपाय आहेत. भाषा आणि त्यांची व्याकरणे यावरही तुझे प्रभुत्व आहे.
नंतर भेटलास ते नवनाथ भक्तीसार ग्रंथात . खरं तर त्यात  तुझ्यासारखाच अजून एक आहे , गोरक्षनाथ ! . पूर्ण पोथीतील त्याचे व्यक्तिमत्व पाहिल्यावर मला तूच आठवलास. गाढ ,डोळस भक्तीने आलेला दुर्दम्य आत्मविश्वासामुळे तुम्ही गुरू असो किंवा आराध्य यांनाही प्रसंगी मोह मायेपासून , संकटातून बाहेर काढलेले आहे.
एवढे करून श्रेयही त्यांनाच देण्याची नम्रताही दाखवली आहे.
प्रभू श्रीरामानंही तू त्यांचा भक्त आहेस म्हणून सार्थ अभिमानच असणार....
      लहान मुलांसाठीचे सुपरमॅन गाणे मध्यंतरी ऐकण्यात आले . तेव्हा मला एक महत्वाची गोष्ट जाणवली की
मला माहित असणाऱ्या तुझ्या पूर्ण जीवनपटात तुला एकटेपणा , फ्रस्ट्रेशन असे कधी आले नाही.
रामायणात एक प्रसंग आहे - तुला तुझ्या शक्तींचा विसर पडला आणि मग जांबुवंताने आठवण करून दिली , यामध्ये तुला विसर पडला असेल असे वाटत नाही , तुझ्या आत्मसंयमाने तू अंगातील रग काही काळाकरता शांत ठेवली असशील , तू काय ताकदीचा आहेस हे जांबुवंताला माहीत असेल आणि तो एवढंच म्हणाला।असेल की " this is the time .…..." ( अर्थात संस्कृतमध्ये )
      लहानपणी निर्जीव फुग्याला घाबरणारी मी आणि आत्ताची मी यात स्तोत्ररूपाने तू जवळ असण्याचा खूप मोठा हात आहे....यापुढेही असाच सोबत रहा.
जिथे कुठे आहेस तिथे हे नक्की वाचत किंवा जाणून घेतले असशील तू.......
प्रकटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा .!!!
Happy birthday