Tuesday, May 12, 2020

दवाईसुंदरी दिवस

#दवाईसुंदरी_दिवस

गेले दहा-बारा तास अविरतपणे कळा देत होती ती. नर्स येऊन बघून गेल्या त्यालाही 2-3 तास झाले. हे पोटाचे ओझे लवकरात लवकर सोडून मोकळे व्हावे एकदाचे. कधी येणार वेळ? नर्स एकमेकांशी बाहेर गप्पा मारत उभ्या नुसत्या , सात्विक संताप आला तिला.
 त्यात पँन ची ही सोय नव्हती.....ती तशीच कशीबशी उठली टॉयलेट चे दार थोडे उघडे ठेवून जाऊन आली ,तशीच विव्हळत बेडवर आडवी झाली .त्या एकदा येउन पाहून गेल्या , पुन्हा गप्पा मारीत लांब उभ्या राहिल्या., हिचा राग पुन्हा वाढला.
मी इतकी विव्हळतेय आणि ह्या गप्पा मारत हसतायत...
आत्ता या क्षणी हातात येण्यासारखं काही असत ना तर ते  भिंतीवर थडाथड फेकून मारायची इच्छा झाली तिला.
या सगळ्या मनस्थितीत कळा मात्र दुप्पट वेगाने येऊ लागल्या. तिच्या कण्हण्यात झालेला सूक्ष्म फरक त्यांच्या अनुभवी कानांनी टिपला होता . त्या तिघी लगबगीने आत आल्या . त्यातली एक म्हणाली ," चला घ्या आत हिला , आता होईल ही".
       आत नेल्यावर च्या प्रत्येक टिपेच्या कळेला त्याचा हात तिच्या केसातून आईच्या मायेने फिरत होता " आई होणं सोपं नसतं ग पोरी ......लाव जोर लाव
...पुश कर "झालं हं ,झालं .... थोडंच बघ .... पुश कर ... पुश कर  .... सुटशील लवकर.....असा आवाज लांबून कुठूनतरी तिच्या कानाला जाणवत होता. बाळाच्या रडण्याचा आवाज आला , क्लान्त होऊन पडून राहिली ती.
      तिसरीत शाळेच्या स्टेजवर गेली होती ,प्रखर लाईट समोर अंधार , काही सुचेना ,कळेना , सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात असताना ,विंगेत बाईंचा चेहरा दिसला , अक्षरशः आई सारखा वाटला तो......
आताही तसंच झालं होतं. तिला तोच केसातून हात फिरवणारा चेहरा मिटल्या डोळ्यांनाही दिसत होता.
          तोपर्यंत बाळाला धुवून ,गुंडाळून त्यांनी तिच्या शेजारी ठेवले ..... आणि त्या नन्तर दिसलाच नाहीत.
डिसचार्ज च्या दिवशी तिने त्यांना शोधून हाका मारून बोलवले , हातात नारळ आणि काही पैसे ठेवले आणि एक घट्ट मिठी मारली.

© वीरश्री वैद्य - करंदीकर