Saturday, December 8, 2018

#दाढी
ज्या आयांना दोन मुलंच ,त्यांचे काय वांदे होत असतील. म्हणजे चौघांचं कुटुंब म्हणलं तर घरात 3 पुरुष , एक मोठ्ठा ,दोन छोटे छोटे . साधे सेप्टिपिन शेअर करायला पण चान्स नाही. मुलीला जितक्या सहज ती मागता किंवा शोधून दे म्हणून सांगता येते तसे यांना कसे सांगणार?तुम्ही म्हणाल सेफ्टीपिन काय ? हे उदाहरण आहे ( तसंही एक सेफ्टीपींन की किंमत तुम क्या जानो बाबू😢)काहीची मुलं देतीलही शोधून एखादयावेळी, पण नंतर भाडीपा मधल्या अनी सारखे 'क्काय? पिन?' असा डायलॉग येईल.
एरवीही आई काय म्हणतेय याकडे मुलांचं लक्ष नसतंच, ' हीची सारखीच काहीतरी बडबड चालू असते, काय लक्ष द्यायचं?  अस्सा ऍटिट्युड असतो (बापसासारखा). असं नसेल एखाद्या घरी , तर मुलं जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी असतातच सारखं 'काय करू?', 'काहितरी नवीन दे'  किंवा 'शोध'.
               यापेक्षाही भयावह म्हणजे 'माझं हे कुठाय? ,माझं ते कुठाय? असे प्रश्न विचारणारे तीन-तीन जण ??? ( इथं एक झेपेना ).
            दुसऱ्या खोलीत असलेल्या आई ला बोलवताना आपण "आई तू काय करतेयस?" अशी सुरुवात करतो .
माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत त्यांना असे विचारले की त्या म्हणायच्या 'दाढी करतेय'. फार हसायला यायचं ऐकून, गंमत म्हणजे त्यांनाही दोन मुलंच
           आता हे सगळं डोक्यात येण्याचं कारण म्हणजे ,  स्वयंपाकघरातली आईची सुरी घ्यायला सर्कस सुरू झाली होती म्हणून सव्य ला प्लास्टिक सूरी ,काटे चमचे सेट आणून दिला मध्यंतरी. त्यातली एक सूरी घेऊन साहेब मला म्हणतात , "आई , दाढी कर, दाढी." मी म्हणाले मला नाही येत , मला म्हणायचे होते मला उगवत नाही ,तर त्याला वाटले की 'करता येत नाही, म्हणाला "मी करतो तुझी दाढी". हे ऐकून दुसऱ्या सेकंदाला मला त्या दाढीवाल्या...म्हणजे..' दाढी करतेय'
म्हणणाऱ्या काकू आठवल्या आणि त्यांचं दुःख मी समजून घेऊ शकले, त्याच्याच पुढच्या सेकंदाला दोन मुलं असलेल्या सगळ्या मैत्रिणी डोळ्यासमोर आल्या , त्यांची मुलं त्याच्या दोन्ही बाजूला बसून दोन्ही गालाची दाढी करत होती. 😂😂😂😂😂😂😂
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, November 14, 2018

अपेक्षांची दुसरी बाजू

बाळ असल्यापासून  आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो ... आपल्याही नकळत...  हेच की  रात्री जास्त वेळा उठू नये, जास्त रडू नये,  नीट पोटभर (त्यांचं का आपलं याबाबत गोंधळ ) खावं,  अंघोळ नीट करून घ्यावी वगैरे.....
             शाळेत गेल्यावर स्मार्ट असावं, तो अमका ढमका कसा बोलतो तसंच व्यक्त व्हावं, उगाच त्रास देऊ नये कोणाला , पण स्वतःचही सहज देऊ नये दुसऱ्याला, थोडक्यात डिफेनसिव्ह पण असावं वगैरे ,वगैरे ....

     अतिशयोक्ती नाही पण मरेपर्यंत काही ही लिस्ट संपत नाही...
तसे पाहता त्यांचा जन्म हा आपला निर्णय असतो, ते काही उपकार वगैरे नसतात.....त्यांनीही ते मानू नये....
       
         याची दुसरी बाजू मात्र फार कमी लोक विचारात घेतात किंवा त्यावर काही अंमलबजावणी करतात....
स्वतंत्र अस्तित्व म्हणून त्यांच्याही अपेक्षा असतातच की...पालकांकडून....
जास्त नाही ,छोट्या छोट्या (त्यांचं वयआहे तेवढ्याच छोट्याश्या),     वेळ देऊन खेळणे.... हाक मारल्यावर बघणे ..ओ देणे.. काय म्हणतोय ते ऐकून घेणे....
        पुढे शाळेत गेल्यावर सोडायला येणाऱ्या पालकांकडे बघून तसे तसे स्मार्ट वागणे ... इंग्लिश - विंग्लिश मुव्हीमध्ये थोडी झलक दाखवली आहे याची...
कालपरत्वे स्वतःच्या वागण्यात, पेहेरवात, स्वभावात बदल करणे....
म्हातारपणी किमान थोडाफार व्यायाम , फिरून  स्वतःला फिट ठेवणे , अंगावर दुखणी न काढणे, वेळच्या वेळी चेकअप करून घेणे वगैरे वगैरे ...
       पालक झालो की दुसरी बाजू विसरायला होते बहुतेक (यात मीही आलेच ) . बालदिन निमित्ताने  पालक म्हणून आत्मपरीक्षण आणि भविष्यविचार करताना जे मनात आले ते मांडले . अर्थात मीच मांडलेली ' दुसरी बाजू ' यावर विचार तर आहेच पण ते अमलात आणायला आजपासून सुरुवात करेन हे मात्र ठरलं!

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, August 7, 2018

युरेका

#युरेका
आज पुन्हा तेच झालं, त्याची शिकवताना चिडचिड आणि त्यानंतर तिचा अजूनच उडालेला गोंधळ. गेले महिनाभर तो तिला गाडी शिकवत होता, आणि त्याच्या म्हणण्यानुसार अजूनही ती खूप चुका करत होती.
झालं असं की इथे ड्रायव्हिंग क्लास लावणं परवडणारं नव्हतं, पण वाहतुकीचे नियम काटेकोर पाळले जायचे त्यामुळे चालवणं सोपं होतं. तो सुद्धा त्याच्या मित्राकडूनच गाडी शिकला होता. थोडी चूक सुद्धा महागात पडायची. लायसन्स वर पॉईंट चढणार , दंड तर भरवाच लागणार , गाडीचा आकार तर बिघडणारच , तो सरळ करायला खिशाला पुन्हा बांबू लागणार अशा भित्या आणि टेन्शन त्याला  असायचं आणि तो काही प्रोफेशनल ड्राइविंग टीचर वगैरे नव्हता.
हे सगळं तिला माहीत होतं , समजतही होतं, पण चिडल्यावरचे त्याचे वेंधळी , बावळट आणखी काही नवे नवे शब्द निघायचे ते तिला फार टोचायचे. नंतर त्यालाही वाटायचं ओव्हररिऍक्ट झालो आपण....पण एक चूक आणि पुढचे सोपस्कार त्याच्या टेन्शनने तो त्या वेळेत फाsर पॅनिक व्हायचा.
दुसऱ्या बाजूला ती मनाशी ठरवायची की त्याला बोलायची एकही संधी द्यायची नाही, इतकं व्यवस्थित चालवून दाखवायचं , पण ती काल जशी चुकली तशी सिच्युएशन आली की तो रागावूनच सांगायचा आणि मिठाचा खडा पडायचा, ती गोंधळायची, आणखी चुकांची भर पडायची.
           संध्याकाळच्या या ड्रायव्हिंगच्या तासाभराचे सावट आताशा तिच्या संपूर्ण दिवसावर पडायला लागले होते , स्वयंपाकातही कधी नव्हे तो गोंधळ होऊ लागलेला.
तिने ठरवलं...
'नकोच ते ...मला नाही शिकायचं ..सांगायचं आज त्याला. या विचारानेच तिला बरं वाटायला लागलं.
 ''रोज वेंधळी म्हणतो मला , इतकीच वेंधळी असते तर तुला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी जागेवर मिळतात, ते का उगीच ? एखादा पदार्थ खावसा वाटला तर त्याचं सगळं साहित्य घरात नेहमीच असतं, कुणाला जेवायला बोलावलं तर कमी पडत नाही आणि उरतही नाही, इतकी अचूक जजमेंट असतात माझी."
या स्वगताची तार अचानक व तुटली ती तिच्याच आतून आलेल्या प्रश्नाने ,
' मग गाडी चालवताना हे जजमेंट कुठं जातं बरं?'
-' हो ना, खरंच की ! म्हणजे आपण काही वेंधळ्या नाही! आपल्याकडे चांगली जजमेंट पॉवर आहे!'
तिने याच्या मुळाशी जायचे ठरवले . कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये शिकली होती ना ती तसे रूट कॉज काढायचे...
'तो शेजारी बसून आत्ता ओरडणार , मग रागवणार अशा शक्यता गृहीतच धरून बसतो, त्यामुळे आपण
चुका करतो का काय?
 का असं आहे की , तो बसल्यामुळे चला काहीही झाले तरी तो आहे अशा कम्फर्ट झोन मध्ये आपण नकळत जातोय? जबाबदारी नकळत त्याला देतोय?
मग जर तो शेजारी नसेल तर?
हो हे ट्राय केलं पाहिजे , तरंच कळेल आपलं ड्रायव्हिंग जजमेंट".
विचार शेवटाला पोहोचला तोपर्यंत तीने गाडीची चावी हातात घेतलेली. रविवार असल्याने तो क्रिकेट खेळायला गेला होता , दोन तास तरी येणार नव्हता.
             एकटी गाडी चालवायची पहिलीच वेळ ... तिने बेल्ट लावला...चावीने गाडी स्टार्ट केली... पार्किंग मधून बाहेर काढली ..... स्टॉप साइन, राईट लेन चे नियम पाळत सोसायटी मधून बाहेर काढली... कोपऱ्यावरच्या मॉलला मागे टाकून नेहमी तिला अवघड वाटणारा राईट टर्न लीलया घेतला ....पुढे येणारा प्रत्येक टर्न तिचा आत्मविश्वास वाढवत गेला ....एक मोठा गोल फिरून ती घरी परत आली.कधी नव्हे ते दोन गाड्याच्या बरोबर मध्ये आज तिने गाडी पार्क केली.
स्वतःशी हसत हसत तिने घराचे दार उघडले.
आज तिचं काहीही बिघडणार नव्हतं , ना फूड , ना मूड.

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, April 19, 2018

व्यथा

         आतापर्यंत स्वतः ची काळजी न घेता , कष्ट केलेल्या आई - वडिलांना चांगले, निरोगी,आयुष्य,जास्त जगता यावे अशी कित्येक मुलांची निर्मळ इच्छा असते. लवकर परावलंबी व्हायला जसे आई-वडिलांना आवडत नाही तसे मुलांनाही आपल्या आई वडिलांना झालेलं बघणे आवडत नसतेच.
          स्वतः मिळवलेले किमान आरोग्यासाठीतरी स्वतः वर खर्च करायला जमत नाही , पण मुलं खर्च करायला वेळ द्यायला तयार असतील तरीही नाटच असतो.मुलं set होईपर्यंत काम आणि काटकसर केलेलीच असते, पण स्वतःची उतरवयातल्या शरीराची काळजी घ्या म्हटलं
'काय करायचंय??'कशाला ?असले प्रश्न.
        आई-बाबांचे धरणारे गुढगे, सतत दुखणारी कंबर, झिजणारे मणके बघणं सोपं नसतं हो....
कुठल्याही सणवारात उसनं अवसान आणून हे काम करतात.' आत्ता करतील आणि नंतर पडतील आडवे ' हे वाक्य यांना सुखावत असलं तरी मुलं काही ते आनंदाने बोलत नसतात.
        याउलट एखादे दिवशी आपण आजारी असताना औषधांचा एखादा डोस घ्यायची नुसती टाळाटाळ करून बघा , इतकी भुणभुण लावतील कानाशी की बाssssस . आपण म्हणालो की तुम्ही तरी कुठे नीट काळजी घेता स्वतः ची, मग आम्ही का घेऊ ? तर लगेच हल्लीची मुलं , ऐकत नाहीत.... आमच्या वेळेला ........ असं सुरू होईल सगळं ........
पण आम्ही पण घेऊ काळजी तुम्ही म्हणता तशी असं काही म्हणत नाहीत.
    मुलाच्या वागण्याला लहानपणी जसे आई-वडिलांना जबाबदार धरतात , तसेच म्हातारपणी त्यांना काही झाले तर मुलांनाच जबाबदार धरतो समाज आणि मुलांना वाट्टेल ते ऐकवतो, बोलतो.एरवी लोकांच्या बोलण्याची यांना पडलेली असते. मुलांविषयी हे असं कुणी (त्यांची चूक नसताना )बोललेलं किंवा कानावर आलेलं चालतं का?
     दुखण्याचा बाऊ करू नये हे बरोबर पण त्याकडे अशक्य दुर्लक्षही नको.
     म्हातारपण हे दुसरं बालपण म्हणतात. न ऐकलं लहान मुलांना दोन धपाटे देता येतात. यांचं काय करायचं?
        जे ज्येष्ठ स्वतः ची काळजी घेऊन निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात त्यां सगळ्यांना माझा इथूनच कौतुकास्पद नमस्कार ..

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, April 11, 2018

बाकी काहीही दुखू दे , दात नको..दातदुखीचा धसका 99%लोकांना असतोच. त्यात नेमके हे दात रात्री ठणकायला सुरुवात करतात . लवंग , पैन किलर , कश्श्या कश्श्याचा म्हणून उपयोग होत नाही , तो ठणकत राहतोच, झोप कशीबशी लागली तरी दिवसा खायचे वांदे होतात ते वेगळेच. इतक्या खत्रुड वेदना सहन करूनही बरेचजण डेंटिस्टची पायरी काही चढत नाहीत. कारण एकच 'भीती'.
       हे फक्त दाताच्या बाबतीत नाही तर कान आणि नाक   या बाबतीतही असतेच, कारण या आपल्या अत्यंत खाजगी जागा आहेत. याला दुसऱ्या कुणाचा हात लावू देणं हे मेंदूलाही चटकन मान्य होणारं नसतं, मेंदू शरीराला defencive मोड मध्ये जायची आज्ञा देतो. पण treatment च्या वेळेला हे आपल्या भल्याचं आहे हे मनाला ठाऊक असतं, त्यामुळे मन आणि मेंदूची आज्ञा याचं कॉम्बिनेशन तयार होतं , ते म्हणजे प्रचंड भीती.
त्यातून भरीस भर म्हणून डेंटिस्टचं त्याच्या छिन्नी-हातोड्याचं सुसज्ज केबिन. त्याच्यासमोर आssss करून बसल्यावर तो त्याच्या अस्तन्या सरसावून तीन चार कसले कसले tools तोंडात घालायला लागतो.
इतर अनेक सुररर , फुररर , सुईईइ , पीपीपी असा आवाज करणाऱ्या अनेक यंत्रांनी ही भीती आणखी गडद होत जाते.... की बरेचजण अगदी आणीबाणीची वेळ आल्याशिवाय ( लोकांचे दात कोरून पोट भरणाऱ्या, बिच्चाऱ्या ) dentist कडे जात नाहीत.
       ही पोस्ट एवढ्या confidently लिहिण्याचे कारण मला भीती वाटत नाही ( इतकं दातांच काम झालंय ).
त्यामुळे आता मी भिणाऱ्यांवर दात काढून हसते.
#आपले_दात_आपलीच_पोस्ट

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, March 30, 2018

_घरोघरी_तीच_आजी

#आजी_रॉक्स_सगळे_शॉक्स
यावर्षी मी मुलींना सांगितलंय की मी काही उन्हाळी वाळवण पाठवणार नाही , तुम्ही पण मला काहीही पाठवू नका" , इति आज्जी ( दरवर्षीचा डायलॉग )
काही दिवसांनी मामाबरोबर डबे येतातच.....
" आग आई काय हे , या वयात काय काहितरी करत बसतेस, कशाला एवढं  ?" इति लेकी ....
काय ? फार काही नाही केलं....
यांना पोह्याच्या पापड्या आवडतात म्हणून केल्या थोड्या!
परवा उपास होता, साबुदाणा जरा जास्त भिजवला त्याच्याही पापड्या केल्या , खिचडी जात नाही हल्ली!
उडदाचे पापड किती महाग ? अमुक पैशाला अमुकच येतात, त्यात बघ तुम्हाला तिघींना झाले पापड..
यांना म्हणलं मी मटकीची डाळ दळून आणणार असाल तरच करणार सांडगे ... आणलं यांनी दळून ....!
गुरुवारच्या मंडईत मोठे बटाटे चांगले मिळाले आणि स्वस्त मग थोडा कीस केला... मला खिचडी नाही आवडत उपासाला...
एवढंच ... बाकी काssही केलं नाही....तुमच्या लहानपणी केवढं करायचे... होत नाही आता...
********************************************
दिवाळी
"यावर्षी मी फराळाचं काहीही करणार नाहीये . हल्ली विकत मिळतं सगळं, आणि अगदी बारा महिने मिळतं.
पूर्वी दिवाळीलाच व्हायचं त्यामुळे भरपूर खायची मुलं",

मग सुरुवात लाडवाच्या डब्यापासून होते आणि त्याची कारणे पुढीलप्रमाणे,
फक्त लाडूच देणारे तिघींना... करंज्या कुणी खात नाही म्हणून थोड्याच केल्यात.... चकल्या घालायला आता जोर नाही लागत त्यामुळं कडबोळ्या केल्यात....
शंकरपाळ्या चहात बुडवायला बर्या लागतात .....
ह्यांना आवडते म्हणून थोडी शेव केली
कुणी शेजारीपाजारीनी दिले तर त्यांना द्यायला नको का फराळ म्हणून केलं आपलं थोडं.
पूर्वी डबेच्या डबे भरून करायचे ..
आता होत नाही पूर्वीसारखं....चिवडा केला की पाठवते "
#_घरोघरी_तीच_आजी

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, March 22, 2018

गरिबी...

परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट असताना , पैसा जोडत - साठवत जाणे , हौसमौज न करणे , वायफळ खर्च न करणे, आहे त्यात भागवायचा प्रयत्न करणे ही म्हणजे काटकसर...
ती आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हा , कमी / जास्त प्रमाणात करावी लागते.
पण परिस्थिती चांगली झाल्यावर , आर्थिक आवक चांगली झाल्यावर आपल्या आवडीच्या गोष्टींवर , छंदावर, updated सोयीसुविधांवर पुरेसा पैसा नक्की खर्च करावा. चांगले, पौष्टिक खावे / प्यावे.
पण ह्या गोष्टी जे करू शकत नाहीत ते काटकसरीची सीमारेषा ओलांडून कंजूषपणाकडे वळलेले असतात.
      काही वेळा खूप वर्षे काटकसरीत काढलेल्याना लाखो रुपये मिळाले तरी मुळाशी कसलीतरी अनामिक भीती असते बहुतेक की 'ते दिवस परत आले तर?' किंवा
( इतक्या वर्षांच्या काटकासरीचा ) सवयीचा परिणामही असू असतो की चांगले दिवस येऊनही ते मानसिक गरिबीतच जगतात....
    ही भीती वाढत्या वयाची अपरिहार्यताही असावी कदाचित ......
मानसिक गरिबी आणि आर्थिक गरीबी यांचं एक दुष्टचक्र असतं, जोपर्यंत आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत  ते  आपली पाठ सोडत  नाही.....
मग साठवलेल्या पैशाला नको असलेल्या अनेक वाटा फुटत जातात ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, January 29, 2018

हळदीकुंकू

#हळदीकुंकू
वाण 'लुटायचे' अशी खास ओळख असणारे म्हणजे संक्रांतीचे हळदीकुंकू. सध्याची पद्धत पाहता 'लुटणे' का म्हणायचे? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे . खरेतर वेगवेगळ्या वस्तुंचे वाण मांडून ठेवायचे आणि हळदीकुंकू घेऊन बायकांनी त्यातील आवडेल ती वस्तू घ्यायची,असे होते म्हणून याला लुटणे म्हणतात. मैत्रिणीशी बोलताना मला यात आणखी एक कल्पना सुचली , मी ही वेगवेगळ्या(उपयोगी) वस्तू मांडल्या, चिठ्ठ्यात त्याची नावे लिहिली. ज्या वस्तूच्या नावाची चिठ्ठी जी उचलेल ते तिचे वाण (घावंल त्याला पावंल) असे वाण लुटले. त्यांनाही मजा वाटली.
           माझे लहानपण ज्या कॉलनीत गेले तिथे सगळ्या जातीधर्माच्या बायकांना हळदीकुंकूचे बोलावणे असायचे.
कपाळाला नाही पण मंगळसूत्र किंवा गळ्याला हळदीकुंकू लावून घ्यायच्या त्या, वाणही घ्यायच्या... आनंदाचे वसे जणू.
विधवा बायका किंवा वयस्कर आजी, त्यांनाही बोलावले जायचे. त्यांना ऑकवर्ड वाटू नये म्हणून , 'देण्याघेण्यात काही चुकले/ विसरले तर सांगायला ,लक्ष तरी ठेवायला या, म्हणजे आम्हाला आधार वाटेल' अशी गळ घालून का होईना , पण त्यांनाही आनंदात सहभागी होता येईल असे बघितले जायचे.
          मध्यंतरी हळदकुंकू संदर्भात काही उलटसुलट विधाने वाचनात आली. 'काही आक्षेपार्ह गोष्टीमुळें आम्ही हळदीकुंकू करायचे सोडले',वगैरे... मला एक कळत नाही , असे म्हणणाऱ्या आणि त्याला पाठींबा देणाऱ्या लोकांना त्या आक्षेपार्ह गोष्टीं टाळून स्वतःच्या घरी हळदीकुंकू करण्यासाठी कुणी अडवले होते का? असे केले असते तर खरेच ते एक कौतुकास्पद पाऊल ठरले नसते का?
         सगळी घरे आपलीशी करणारा हळदीकुंकूहून चांगला कार्यक्रम माझ्यातरी पाहण्यात नाही.  एखादी प्रथा पूर्णपणे चुकीची ठरवून त्याला फेकून देण्यापेक्षा त्यात जे चांगले आहे ते उचलून पुढे चालवण्यात शहाणपण आहे.
        इथे अमेरिकेत तर आम्ही मैत्रिणी एकत्र येऊन असे आनंदाचे वसे लुटण्याचे बहाणेच शोधत असतो. 👇🏻


Tuesday, January 16, 2018

फुगेवाला

#फुगेवाला
 Ice festival च्या तंबूत दिसला तो.
जत्रेत/सर्कशीत मोठ्या पायांवर उभे राहणाऱ्या विदूषकासारखा उभा होता. डोक्याला हॅट , हॅट ला नमुना म्हणून एक twised बलून ने केलेला डॉगी चा आकार लावून.
कंडक्टर सारखी पिशवी, त्याला असंख्य कप्पे, त्या कप्प्यात असंख्य रंगाचे उभट फुगे, एका कप्यात कात्री न एकात पैसे.
समोर पालक-मुलांची रांग, आणि बघ्यांची गर्दी.
कारण मागणी तसा पुरवठा.
युनिकॉर्न, मिकी माउस, डॉग, कॅट, बटरफ्लाय, स्वोर्ड..
 काय मागेल ते तो त्याच्या बलून ने करून देत होता.
ऑर्डर मिळाल्यावर तो आकार, त्याला लागणाऱ्या फुग्याचे रंग त्याला किती आणि कसे ट्विस्ट दिले म्हणजे पाहिजे तो आकार मिळेल हे सगळं जणू छापलच होतं त्याच्या डोक्यात.
प्रत्येक ऑर्डर पूर्ण करायला त्याला दोन मिनिटं तरी त्याला लागत होती , पण मुलांची रांग काही कंटाळत नव्हती ,
त्याच काम बघताना मुलांबरोबर पालकही गुंतत होते.
घाई न करता , मन लावून, तो त्याची प्रत्येक कलाकृती करत होता , त्यामुळे एकही फुगा चुकीचा फुगला नाही ,फुटला नाही, extra ही झाला नाही.
काठीला गोल फुगे अडकवणारा फुगेवाला पासून हा इनोव्हेटिव्ह फुगेवाला हा प्रवास आवडला.
मूळ पाया पक्का ठेवून अपडेट आणि अपग्रेड होणाऱ्याला नामशेष होण्याच्या धोका नसतो.

वीरश्री वैद्य - करंदीकर