Thursday, April 19, 2018

व्यथा

         आतापर्यंत स्वतः ची काळजी न घेता , कष्ट केलेल्या आई - वडिलांना चांगले, निरोगी,आयुष्य,जास्त जगता यावे अशी कित्येक मुलांची निर्मळ इच्छा असते. लवकर परावलंबी व्हायला जसे आई-वडिलांना आवडत नाही तसे मुलांनाही आपल्या आई वडिलांना झालेलं बघणे आवडत नसतेच.
          स्वतः मिळवलेले किमान आरोग्यासाठीतरी स्वतः वर खर्च करायला जमत नाही , पण मुलं खर्च करायला वेळ द्यायला तयार असतील तरीही नाटच असतो.मुलं set होईपर्यंत काम आणि काटकसर केलेलीच असते, पण स्वतःची उतरवयातल्या शरीराची काळजी घ्या म्हटलं
'काय करायचंय??'कशाला ?असले प्रश्न.
        आई-बाबांचे धरणारे गुढगे, सतत दुखणारी कंबर, झिजणारे मणके बघणं सोपं नसतं हो....
कुठल्याही सणवारात उसनं अवसान आणून हे काम करतात.' आत्ता करतील आणि नंतर पडतील आडवे ' हे वाक्य यांना सुखावत असलं तरी मुलं काही ते आनंदाने बोलत नसतात.
        याउलट एखादे दिवशी आपण आजारी असताना औषधांचा एखादा डोस घ्यायची नुसती टाळाटाळ करून बघा , इतकी भुणभुण लावतील कानाशी की बाssssस . आपण म्हणालो की तुम्ही तरी कुठे नीट काळजी घेता स्वतः ची, मग आम्ही का घेऊ ? तर लगेच हल्लीची मुलं , ऐकत नाहीत.... आमच्या वेळेला ........ असं सुरू होईल सगळं ........
पण आम्ही पण घेऊ काळजी तुम्ही म्हणता तशी असं काही म्हणत नाहीत.
    मुलाच्या वागण्याला लहानपणी जसे आई-वडिलांना जबाबदार धरतात , तसेच म्हातारपणी त्यांना काही झाले तर मुलांनाच जबाबदार धरतो समाज आणि मुलांना वाट्टेल ते ऐकवतो, बोलतो.एरवी लोकांच्या बोलण्याची यांना पडलेली असते. मुलांविषयी हे असं कुणी (त्यांची चूक नसताना )बोललेलं किंवा कानावर आलेलं चालतं का?
     दुखण्याचा बाऊ करू नये हे बरोबर पण त्याकडे अशक्य दुर्लक्षही नको.
     म्हातारपण हे दुसरं बालपण म्हणतात. न ऐकलं लहान मुलांना दोन धपाटे देता येतात. यांचं काय करायचं?
        जे ज्येष्ठ स्वतः ची काळजी घेऊन निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात त्यां सगळ्यांना माझा इथूनच कौतुकास्पद नमस्कार ..

© वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment