Sunday, May 28, 2017

गुणग्राहकता

#गुणग्राहकता#

एखाद्याला एखादी  छान idea किंवा suggestions द्यावे आणि त्यातला मूळ मुद्दा,...मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सगळे बाजूला पडून........
त्या चांगल्या मांडलेल्या आयडियाचा एखादा न पटलेला मुद्दा , कसा चुकीचा होता ,
हेच फक्त आडून पुन्हा पुन्हा ऐकवले जाते तेंव्हा

का आयडिया दिली? ( मदत करण्याचा का प्रयत्न केला?) , पुन्हा करशील?
असे स्वतः चे कान पकडून स्वतःला बजावून सांगावे असे वाटते.
या प्रकारचा अनुभव बरेच जणांना असेल......
       
                पण एखाद्या माणसात गुणग्राहकता ( Imbibing ones qualities)  नाही हे अशाच काही अनुभवांनी कळते.

त. टी. Thank u Ketki Kathale  विस्मरणात गेलेला
' गुणग्राहकता ' हा शब्द आणि सगळ्यांनी आत्मसात करावा असा परमोच्च गुण पुन्हा आठवून दिल्याबद्दल,,,,👍

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, May 22, 2017

#interest#
अभ्यास न करणाऱ्या मुलांबद्दल चर्चा करायला बोलावल्यावर अनेकदा मुलांचे पालक हे वाक्य बोलतात ,
 "तो / ती खूप हुशार आहे हो पण करत नाही."
 ह्याचे मला खूप हसू येते कारण पालक अतिशय शिताफीने असे म्हणून आपल्या मुलाला so called हुषार म्हणून आपली सूटका करवून घेतात .
     
'हुषार आहे'असे तुम्ही म्हणता मग नेमका त्याचा interest कशात आहे हे बघणे तुमचे पहिले काम आहे.
 शाळेत नेमून दिलेले सहा विषय असतात आणि रोजच्या आयुष्यात असंख्य, यापैकी नेमका आपल्या मुलाला कोणता विषय आवडतो याचं निरीक्षण करा...........
मुळात interest ज्या विषयात आहे त्या विषयाचा वेगळा असा अभ्यास करावाच लागत नाही ,
 याचे उत्तम उदाहरण म्हणजे 3 idiots मधला रेंचो ........, त्याला मशीन मध्ये इंटरेस्ट असतो.......... रोजचे खाणे ,पिणे, उठणे ,झोपणे यासारखा सहज , आयुष्याचा एक भाग असावा असा तो मशीन चा अभ्यास करत असतो आणि तेच मार्कमध्ये reflect होऊन तो अनपेक्षितपणे कॉलेज मध्ये पहिला येत असतो.
       कधीकधी शाळेच्या शिकवायच्या बोअर पद्धती ......खूप लिहायचा वगैरे दिलेला अभ्यास....., किंवा concept clear नसल्याने मुलांना त्यात काहीच रस न वाटणे असे घडू शकते .ही शक्यता पडताळून  पहा.

कधीकधी मुलांना वही- पुस्तक - लिखाण हेच मुळी आवडत नाही.
हुशार असून सुद्धा करत नाही याला काही निरीक्षणे अपेक्षित आहेत . माझे एक निरीक्षण सांगते ....
माझ्या बहिणीला सुद्धा वह्या पुस्तक लिखाण आवडायचे नाही, पण सहावीत तिला हिंदी विषय खूपच आवडला, इतर विषयात यथातथा च मार्क असताना तिला हिंदीसारख्या भाषा विषयात पैकी च्या पैकी मार्क पडले अ ते ह टक्केवारी नुसार ठरलेल्या तुकड्यात क तुकडीतल्या हिला out of मार्क मिळाले होते . यात शिक्षकांचे श्रेय पण मोठे आहे.
असे काही उदाहरण असेल तर तुम्ही हुशार आहे पण करत नाही असे म्हणू शकता
काहिवेळा तर मुलं नुसत्या उनाडक्या करणारी आणि घरच्यांचे बोलणे कॉपी करून आगाऊपणे तर कधी पोपटपंची ने बोलणारी असतात. तरी आई वडिलांना त्याचे कौतुक असते.
हे काही हुषारपणाचे लक्षण नव्हे .
     वेळीच लक्ष न दिल्याने त्यांना आपला नेमका इंटरेस्ट कळतच नाही ...... तर कधी खूप उशीरा कळतो ...... तर काहींना कधीच कळत नाही.......

एलिझाबेथ एकादशी मध्ये एक प्रसंग आहे. त्यातल्या त्या मुलाला शाळेचे शिक्षक प्रश्न विचारतात,
" कोण व्हायचं ठरवलंय मोठेपणी ?"
 तो म्हणतो ," ठरलं नाहीये अजून".
 यावर ते ही आपापसात म्हणतात ,
" आमचंही ठरायचंय अजून ".

रोज कामावर, नोकरीला जाणाऱ्या बऱ्याच आई - बाबांचे सुद्धा हे दुःख असेल की वेळीच इंटरेस्ट न ओळखता आल्याने ,त्यावेळी जे समोर आले ते निवडून त्यातच करिअर पर्यायाने नोकरी करावी लागतेय .
किमान आज आपण आपल्या मुलांवर ही वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करूया.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, May 12, 2017

# सावळा ग रंग तुझा #

#सावळा गं रंग तुझा .......#
खूप दिवस ठरवतेय ब्लॅक ब्युटीज बद्दल लिहायचे .......
पण काहीतरी खटकत होतं मनात, .....कारण माझा मुलगा गोरा व्हावा असं वाटत होतं मला जेव्हा आई व्हायची चाहूल लागली होती. ......मी गोरी आहे म्हणून नव्हे किंवा मी काळा - गोरा भेद करते मानते म्हणूनही नव्हे.
मुले मोठी होताना ... खूप छोटे प्रसंग असतात ... जसे की एखाद्या समारंभात जुनी मैत्रीण , स्नेही, ओळखीचे लोक भेटतात ज्यांनी आपल्याला.. ,मुलांना खूप वर्ष पाहिलेले नसते
गप्पात, " आगबाई हा का तुझा मुलगा?........ वाटत नाही " असे म्हणले जाते ...... उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते , सहज , सरळसाधी पण मुलांच्या मनावर परिणाम करणारी.....
जाणते झाल्यावर समजूत काढता येते , खरे सौंदर्य कशात आहे हे पटवून देता येते ....., पण अबोध वयाची मुले अशा वेळी खूप रडलेली पहिली आहेत मी .
 असे झाले तर त्याची समजूत कशी काढायची याचे उत्तर नव्हते माझ्याकडे .....आजही नाही . बरेचदा समजूत काढूनही ते खूप खोलवर , आणि बराच काळ परिणाम करणारे ठरते. बर्याच सावळ्या लोकांचे बालपण या किंवा अशा प्रकारच्या संवादाचे साक्षीदार असेल.

आई सावळी असेल आणि मुले गोरी तर फार फरक पडत नाही पण उलटे असेल तर मात्र फरक पडतो.
Intentionally कोणी बोलत नाही , पण परिणाम होतोच.

आपला सावळा रंग confidently Carry करणारे 'कृष्ण' आणि 'द्रौपदी' दोघेच असावे बहुतेक .

अतिशय यशस्वी नट ,नट्या ज्या सावळ्या होत्या , आहेत , त्यांनाही लहानपणी या color comlpex ला सामोरे जावे लागले होते.
लहान असताना मला कांजीण्या आल्या होत्या आणि नंतर काही वर्ष मी पण काळवंडले होते, त्यामुळे हा complex मलाही होता.

या बाबतीत माझ्या best friend चे वडील म्हणायचे ,
 "गोऱ्या माणसाला मनातल्या मनात काळा रंग देऊन बघायचा , तरीही तो सुंदर दिसत असेल तर तो खरा सुंदर ....."
 आपल्या मुलीला येणाऱ्या सावळ्या रंगाचा कॉम्प्लेक्स ओळखून तिच्या वयाला कळणारे सौंदर्याचे मापदंड त्यांनी तिच्यासमोर ठेवले.
तिला भेटल्यानंतर black beauties बद्दल मी खऱ्या अर्थाने विचार करायला लागले .
 या लोकांच्या स्किन ला एक नैसर्गिक तकाकी असते. गोऱ्यांपेक्षा बरेचदा सावळ्या माणसांचे फोटो खूप छान येतात .
बरेच सावळे लोक तरतरीत , स्मार्ट दिसतात . त्याउलट गोरे अनेकदा dull वाटतात.
पण या लोकांना कपड्याचा color complex पण खूप जास्त असतो , बरेचदा मातकट, brown शेड चे कपडे ते जास्त निवडतात. ..... त्यामागे बाकी रंग चांगले दिसणार नाहीत किंवा त्यात आपण जास्तच सावळे दिसू ही भावना असते😢
गोऱ्या रंगाला सगळंच चांगलं दिसत असे अजिबात नाही, बरेचदा तो विचारातील फरक असतो.
        मुळात 'सौंदर्य' ही संकल्पनाच व्यक्तीसापेक्ष आहे. रंगापेक्षाही Features, चेहऱ्यावर दिसणारा confidence आणि स्मार्टनेस ह्या गोष्टी पण खूप मॅटर करतात.

इथे अमेरिकेत हा skin tone फरक इथल्या लोकांच्या वागण्यात बदल करत नाही , हे खूप जाणवते.
पण आपल्याकडे मात्र हृदयाचा मार्ग हा चेहऱ्यावरूनच जातो.

आता थोडा बदल होतोय..... हे ही नसे थोडके!

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, May 8, 2017

घराबाहेर

Hostel किंवा room वर राहिलेल्या लोकांमध्ये खूप चांगली sustaining पॉवर असते .💪🏼 कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता ..... प्रसंगावधान..... मित्र जोडण्याचे कसब ..... स्वावलंबन ...... आणि या सगळ्यामुळे येणारी आनंदी वृत्ती.
        कामे वाटून घेणे , एकमेकांना मदत करणे , एकमेकांशी जुळवून घेणे , एकत्र मजा करणे या सगळ्यात ते ही दिवस कसे संपतात कळत नाही.
        वेगवेगळ्या ( कधीकधी विचित्र  😷)स्वभावाचे नमुने असलेली माणसे हँडल करायला
          या सगळ्याचा पुढच्या संसारी आयुष्यात खूप उपयोग होतो ........☺

#घराबाहेर#

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Sunday, May 7, 2017

चाक

चाक
आई च्या सरकारी नोकरीमुळे आमचे लहानपण वेण्णानगर (कण्हेर जवळ) मध्ये गेले. T. V. खूप कमी जणांच्या घरी....... काही मराठी पिक्चर आणि क्रिकेट मॅच सोडल्या तर तो फार कधी चालूही केला जायचा नाही. बाहेर खेळणे आणि गावभर भटकणे हे आवडते उद्योग. अनेक खेळ होते सोबतीला गोट्या ,भोवरे, विटीदांडू आणि या सोबत
पळापळी चे अनेक खेळ ....काही खेळ sesional असायचे, तर काहींची फॅशन असायची ( जशी कपड्यांची असते , काही दिवसांनी तीच फिरून पुन्हा येते.) जसे भोवरे, गोट्या .......  यात आणखी एक खेळ असायचा चाक फिरवणे. सायकल, गाड्यांची जुनी चाके सगळ्या कॉलनीतून फिरवणे. हाताने किंवा काठीने. यातही क्रमवारी असायची त्याची चाके होंडा वगैरे गाड्यांची असतील ते एक नंबर, ज्यांची सायकल ची असतील ते दोन नंबर. स्कुटर चे चाक जास्त नसायचे कारण एकतर ते जड आणि ते पळवायला खूप खाली वाकावे लागायचे पण त्याचा balance चांगला असायचा. तर असे हे चाक घरातूनच फिरवत पायऱ्यांवरून न पाडता नेता येणे, वळणावरून न थांबवता, वेग न कमी करता काठीने वळवता येणे , काठीने त्याचा वेग वाढवणे सोपे पण त्याचबरोबर कमी पण करता येणे ह्या गोष्टी ज्याला येतील तो यातला hero. मग याच्या शर्यती लागायच्या. जिंकणे, हारणे , भांडाभांडी , गटबाजी सगळे व्हायचे . पण पुन्हा दुसऱ्या दिवशी बट्टी.
             मी जेव्हा हा खेळ खेळण्याएवढी झाले तेव्हा माझ्याकडे चाक नव्हते. घरात सायकल , गाडी काहीच नाही; त्यामुळे मिळायचा प्रश्नच नव्हता. मला फार वाटायचे आपल्याकडे पण चाक असावे आपण पण फिरवावे सगळ्यांबरोबर. तेंव्हा माझ्या मावशीचे मिस्टर (वाकनिस काका) , त्यांच्याकडेच फक्त M80 होती. मी त्यांच्याकडे मागितले "मला चाक द्या , इथे फक्त माझ्याकडेच नाहीये". काही दिवसांनी ते मला चाक घेऊन आले .मुलींविषयी विशेष माया असणारे काका आणि मावशी  साताराहून वेण्णानगर ला गाडीवरून फक्त चाक देण्यासाठी आले.
           मग काय खेळताना माझा भाव पण वधारला. M80 चे चाक घेऊन मीही पळू लागले.  चाक घरातूनच फिरवत पायऱ्यांवरून न पाडता नेता येणे, वळणावरून न थांबवता, वेग न कमी करता काठीने वळवता येणे वगैरे, वगैरे.....या सगळ्यात पारंगत झाले . या खेळाने मला विशेष आनंद दिला. बाकीच्या सगळ्या खेळातले सामान मला आई - बाबांनी आणून दिले असते , पण चाक नसते देता आले त्यांना ,त्यामुळे आपल्याला हा खेळ खेळायला मिळेल असे वाटले नव्हते मला, ..... पण ते मिळाले.
               मी याच खेळाबद्दल लिहिले ते यासाठी कि यात गोट्या , भोवरे किंवा इतर खेळांसारखे काही विकत वगैरे आणावे लागत नाही. ज्या कुणी हा खेळ शोधुन काढला असेल म्हणजे (Best out of west) ते मूल खरंच सर्जनशील म्हणायला हवे.
🤗

वीरश्री वैद्य - करंदीकर

आहारबोली

माणसाच्या स्वभावाचा ढोबळ मानाने अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत .  हस्ताक्षर, सही, दिसणे , काही लकबी, वगैरे पण कधीकधी असे वाटते की पंगतीत वाढलेले ताट जेवताना, जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते त्यावरूनहि त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.  म्हणजे बघा ..... समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो. जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात , ......... तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो, त्यांच्यात patience कमी असतो,.........वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ , atjustable असतात , ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात. .........भजी उचलणारी माणसे भज्या सारखीच कुरकुरीत, नर्मविनोदी, आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात , यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही. .........जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहिभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात .........लोणचे कुठले आहे ? आंब्याचे , लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन😉 (असे माझ्या नवऱ्याचे मत आहे) असतात........ काही असेही असतात की सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात ते लोक अतिचिकित्सक असतात.
                हि वरची माणसे मुख्यप्रवाहाची यात आणखी दोन उपप्रवाह आहेत . पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणा नंतरची reaction असणारे.
              जेवणाच्या आधी ताटे , भांडी घ्यायला सुरुवात झाली  की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही हे बघून त्याची चर्चा करणार . खरे बघितले तर पाणी हा optional भाग ही असू शकतो. तुम्ही जेवल्यानंतर अगदी बिसलेरी आणून पण पिऊ शकता. किंवा एखादे दिवस atjust केले तरी काही बिघडत नाही , प्रत्येकाचेच काही पथ्य नसते पण हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात . अशी माणसे कटकट्या स्वभावाची, आणि जुळवून घेणारी नसतात , अशांना मित्रमंडळी कमी असते किंवा नसते असतीलच तर ते हि याच catagory तील असतात.
                 समोरासमोरच्या पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे , अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे... माझ्या पानात नाही... ते माझ्याही पानात हवे... आत्ताच हवे म्हणून लोक वाढपी ला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jelous असतात . सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .
                  गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच " हम्म मी काय म्हणालोे अहो बासुंदीच आहे ,  म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले " असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात ( हेच लोक कपडे खरेदीला ऐपत असतानाही कपड्या आधी price tag बघतात)
                 जेवणाच्या आधी आणि जेवण जेवताना सुद्धा जे लोक ," बाकी सगळे ठीक होते , पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते" असे म्हणून त्यांना अंघोळीला आणि बाकीच्या विधींना काय आणि कसे करावे लागले हा विषय काढतात ती अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीची असतात .समोर चांगले ताट वाढले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.
                   ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतः च आनंदी .
                  या सर्वांपालिकडे एक विशेष catagory आहे .सगळे जेवण झाल्यावर "ताक आहे का ?" म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर " अरेरे ताक असते ना तर मजा अली असती " असा शेरा मारणारे .....तेच ते ....
बरोबर ओळखलंत ......एकमेवाद्वितीय.... पुणेकर ...🤗
               
ता. क. या लेखाच्या कल्पनेचे श्रेय माझ्या (वाढलेल्या ताटातील भजी पहिल्यांदा उचलणाऱ्या) नवऱ्याला जाते.☺

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

खाकी वर्दीतला माणूस

खाकी वर्दीतला माणूस

     गोष्ट साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर 2016 मधली. मी सातारा ला माहेरी शाहूपुरी मध्ये होते .कॉलनीत राहणाऱ्या देवधर काकू पायात चप्पल न घालता खूप घाईने ओढ्याच्या ( जिथे झोपडपट्टी आहे ) दिशेने जाताना दिसल्या. त्याना विचारायला गेले तेंव्हा असे कळले की नेहमी तिथून ये - जा करणाऱ्या एका झोपडपट्टी मधल्या मुलाने त्याच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढले आणि पळून गेला. कोणी घरात नसल्याचा फायदा घेऊन तो gate मधून आत आला आणि अंगणातच काकूंना त्याने पाडले , मंगळसूत्र हिसकावून तो ओढ्याच्या दिशेने पळाला. मी त्यांना म्हणाले की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करू. 63 वर्षाच्या काकूंना काही सुचेना. त्यांना घरी नेऊन ,पाणी वगैरे देऊन त्यांना गाडीवरून शाहूपुरी पोलीस स्टेशन ला नेले.
          Police सेवेतील काही आमचे फॅमिली फ्रेंड आहेत . पण पोलीस स्टेशन मध्ये जायची आणि त्यांची कार्यपद्धती बघायची हि माझी पण पहिलीच वेळ होती.तक्रार नोंदवायला त्यांनी सुरुवात केली . त्यांच्या विचारण्यात कुठेही बेफिकीरपणा दिसला नाही ( कारण आधी अशा कित्येक cases त्यांच्याकडे आल्या असतील). या दरम्यान आणखीही काही पोलीस सहकारी आजूबाजूला आले त्यांनीही सगळी फिर्याद ऐकून घेतली . काहींनी काकूंना संशयितांचे फोटो दाखवले पण त्यातले कुणी नव्हते. या दरम्यान माझे observation चालू होते . तिथे कुणीही रिकामा व फाईल मध्ये डोके घालून बसलेला वा गप्पा मारत बसलेला नव्हता . सागळे कामात इतके व्यस्त होते की यांना जेवायला तरी फुरसत असेल का असा प्रश्न पडला मला. काकूंना प्रश्न  विचारायचा स्वरही सौम्य होता ,त्याच वेळी एखादी order द्यायचा मात्र तितकाच कठोर . तक्रार नोंदवून झाली , दरम्यान त्यांचे senior आले असावे बहुतेक . कारण त्यांच्या आणि बाकीच्यांच्या वर्दीतला खाकी रंग वेगळा होता . (माझे त्यांच्या पदाबद्दल असलेले अज्ञान 😢)त्यानीही आणखी काही प्रश्न विचारले आणि गाडी काढा म्हणून order दिली . देवधर काका तिथे आले आणि मी घरी यायला निघाले . या सगळ्यात माझ्या मुलाची अंघोळ , खाणे सगळेच राहून गेलेले.
                     मी गाडी घेऊन घरी पोहोचते आहे तोपर्यंतच मागून एक पोलीस गाडी आली त्यातून सहा सात दणकट पोलीस सिविल ड्रेस मध्ये खाली उतरले आणि सरळ समोरच्या झोपडपट्टीत शिरले . अर्ध्या तासाभरातच त्यांनी तीन मुलांना धरून आणले . त्यांच्यापैकी कोणाचेच कपडे काकूंनी वर्णन केल्यासारखे नव्हते . पण ह्याच तिघांनी लहान असल्यापासून कॉलनी मध्ये लोकांना  खूप त्रास दिला होता .नंतर कळाले की ओळख परेड झाली त्या मुलाला देवधर काकूंनी ओळखले, त्याने ते मंगळसूत्र  त्याच्या आई कडे दिले होते, ते हि काकूंनी ओळखले त्याची receipt पण काकूंकडे होती त्यामुळे काम सोपें झाले.
         चेन स्नॅचिंग चा  चोरटा अवघ्या तीन तासातच गजाआड झाला. मी आजपर्यंत पेपर मध्ये पण चेन स्नॅचिंग चोर पकडले गेले असे वाचलेही नव्हते , इथे तर प्रत्यक्षात पहिले. गाडीवरून मी आणि काकू जात असताना त्यांना आणि मलाही अजिबात वाटले नव्हते त्यांचे मंगळसूत्र कधी त्यांना परत मिळेल , पण किमान त्या मुलांना तरी दहशत बसेल असाच विचार करून आम्ही तक्रार करायला गेलो होतो. दोन दिवसांनी कळले की त्या मुलांनी असे किमान 10 गुन्हे कबुल केले.
                 एरवी पोलिसांबद्दल वाचलेले, ऐकलेले असे ......कामाला उशीर टाळाटाळ , बेफिकिरी .... प्रत्यक्षात मात्र कुठेही दिसले नाही.काही चित्रपटातूनही पोलिसांची बेफिकिरी दाखवाली जाते , माझा त्यावर कधी विश्वास नव्हताच . पण त्यादिवशी प्रत्यक्ष त्यांचे काम , त्यांच्यावर कामाचा असलेला ताणही पहिला.
              इतकी तत्परता दाखवल्याबद्दल त्या सगळ्यांचे किमान एक गुलाबाचे फुल देऊन अभिनन्दन करावे असे मनात होते पण अमेरिकाला येण्याला सात-आठ दिवसच उरल्याने धावपळीत ते जमले नाही. देवधर काका आणि बाबांचे कॉमन friend, आमच्याच कॉलनी त राहणाऱ्या सतीश कुलकर्णी काकांनी ए.सी.पी.संदीप पाटील यांना मेल करून यात मदत मिळालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची नावे लिहून त्यांचे अभिनन्दन केले तर  ए.सी.पी. चे पोस्टकार्ड ने उत्तर आले , आशय असा होता कि ' हे तर आमचे कर्तव्य आहे ,.......ज्येष्ठ नागरिकांबद्दल आम्ही विशेष काळजी घेतो.
             
         हे ऐकून मी पण खाकी वर्दीतल्या त्या माणसांना मनोमन सलाम केला🙏

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

मनःशांती

बऱ्याच दवाखान्याप्रमाणे जोशी डॉक्टरांकडे नवव्या महिन्याचे पेशंट लवकर घेतात. रोजचे नंबर चे पेशंट , इमरजंसी , सिरीयस पेशंट या सगळ्यातून डॉक्टर जमेल तितक्या लवकर या नवव्या महिन्याच्या पेशंट ना आत घेत होते. एवढे असूनही एका बाई ची चीडचीड चालूच होती. कधी आत घेणार? .....इतका वेळ लागतो का, .....नवव्या महिन्याचे पेशंट लवकर आत घेतात ते खोटंच बोलतात........ माझ्या वेळेस असेच करतात..... ओळख असलेल्याना लवकरचा नंबर देतात ...........एक ना दोन भरपूर भुणभुणी लावल्या होत्या तिने.....अविरत बडबड आणि चिडचिड.
तिची ती चिडचिड बघून खरंच मला खूप आश्चर्य वाटत होते. आईपण हे नुसते शारीरिक नाही तर मानसिक बदलही घडवत असते. बाळ जन्मल्यानंतर ते किमान 3 ते 4 वर्षाचे होईपर्यंत आईकडे हवा असणारा लागणारा संयम आणि कमालीची सहनशीलता हे नऊ महिने आणि काढाव्या लागणाऱ्या कळा शिकवत असतात. मला तरी माझ्या वेळेस असेच वाटत होते . हिला यातले खरंच काही जाणवले नसेल का गेल्या नऊ महिन्यात?, का जाणवण्यासाठी लागणारा समजूतदारपणा किंवा मानसिकता च मुळी नव्हती  तिच्याकडे ? तेच कळेना.... हळूहळू तिच्या कटकटीचा परिणाम इतर माणसांवरहि व्हायला लागला ... डॉक्टरांवर नाही पण तिच्यावर मात्र सगळे वैतागले , कारण कटकट करणारा माणूस आपल्या डोक्याशी भले कटकट करत नसेल पण त्याच्या कटकटीने वातावरण मात्र खराब नक्की होते.
              आपल्या आयुष्यातहि हे असे लोक कुठे ना कुठे भेटतात. मित्रमंडळी मध्ये असतील तर त्यांच्यापासून चार हात लांब राहता येते , नातेवाईकांचे मात्र तसे नसते. त्यांना कुठे सोडूनही देता येत नाही , किंवा आपल्यालाही पळून जाता येत नाही. वरच्या घटनेसारखेच हे लोक सगळ्या घराचे वातावरण बिघडवतात, अशांत करतात. कुणी चुकून समजवायला गेले तर 'मग... मी असाच/ अशीच आहे असे म्हणतात . हे म्हणण्या मागे त्यांचा' मी आहे तसे मला स्वीकारा ( खरेतर सहन करा) असा मतितार्थ असतो . पण हा नियम ते स्वतः ला मात्र लावत नाहीत.
          हे लोक आले की आपण आत्तापर्यंत खूप प्रयत्नाने , विचाराने केलेली आपल्या स्वभावाची चांगली , संयमी आणि सर्वसमावेशक अशी केलेली बांधणी मोडून काढतात. अशा वेळी ' लक्ष द्यायचे नाही, किंवा तशाच प्रकारचे वाचलेले काही quotes ही उपयोगी पडत नाहीत. हे लोक संयमाचा अंत बघतात. आपली बांधणी ढासळते, त्या माणसाच्या अशा स्वभावाच्या जडण घडणीला जे जबाबदार आहेत त्यांचाही प्रचंड राग येऊ लागतो, कारण चूका इतक्या पण पाठीशी घालू नयेत कि तो माणूस चुका दुरुस्त करायचेच विसरून जाईल.
                कालांतराने परिस्थिती किंवा काळ हा आपली मानसिक सुटका करवून देतो ..... आणि आपण ढासळलेली बांधणी पुन्हा नव्याने उभी करायला घेतो.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

दुसऱ्याच्या बागेतली फुले 'देवाला ' नेण्याची लोकांची मानसिकताच मला कळत नाही.
       फुले न तोडता ती झाडावर फुललेली पाहणे यातही आनंद असतो हे या लोकांना कळत नाही का ?. ते झाड लावणे , त्याला पाणी घालणे, ते किडीपासून वाचवणे हे ज्याने केलेले असते त्याला त्याचा असा निर्भेळ आनंद हे लोक मिळू देत नाहीत,  ' देवाला ' म्हणून हे सहज तोडून नेतात.
            वास्तविक तो तर फुले वगैरे मागत नाही .आपण आपल्या आनंदासाठी आणि प्रसन्नतेसाठी ती अर्पण करतो. तो तर सध्या प्रार्थनेनेपण प्रसन्न होतो .
            आमच्या घराजवळ एक एकत्र कुटुंब आहे , दोन चांगल्या breed ची कुत्री आहेत, चांदीचे दुकान आहे.
ते सुद्धा कुत्री फिरवायला नेतात आणि येता येता गणपतीला पाहिजे म्हणून लाल फुल शोधत दिसेल त्याच्या बागेतून बाहेरून सरळ काढून नेतात. मला नेहमी प्रश्न पडतो, महागडी आणि सुंदर फुले आणण्याची ऐपत देवानेच दिली असुनपण हे असा भिकारीपणा करून दुसऱ्याचा आनंद का तोडतात?..... एवढेच वाटते तर तर हे लोक फुलाचा पुडा का नाही लावत?....किंवा  फुलझाडे का नाही लावत?

# निर्बुद्ध 🙄

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

गॉसिप

स्त्री आणि गॉसिप हे पक्के समीकरणच आहे अशीच एकंदरीत आपल्या जनमानसात भावना आहे. गॉसिप न करणारी स्त्री या भूतलावर अस्तित्वात असूच शकत नाही असेच सगळ्यांना वाटते . त्यातून एखादी स्पष्ट म्हणालीच कि मला गॉसिपिंग आवडत नाही , तर तिच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही .
असे न बोलता तिने आपल्या वागण्यातून असे दाखवून दिले तरीही तू सुद्धा कशी तशीच आहेस ते prove करण्यासाठी बाकीचेच लोक आटापिटा करतात. मग तिने एखाद्यामुळे झालेला त्रास जवळच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवला  , किंवा व्यक्तीचित्रणासारखे एखाद्याचे ( एकदाच ) केलेले वर्णन अशा गोष्टी सुद्धा gossiping मध्येच गणल्या जातात, पण सुज्ञ लोकांनाच व्यक्तिचित्रण आणि गॉसिप यातला फरक कळू शकतो.
       Gossip ला शुद्ध मराठीत कुचाळक्या म्हणतात.  "आपल्याला काय करायचंय ?" या वाक्याआधी आणि नंतर ज्या गावगप्पा होतात , ते गॉसिप असते.
 
 जुनेजाणते (माझी आजी ) म्हणते "उगाच कुणाबद्दल काहीबाही बोलत जाऊ नये , उद्या आपल्या पायाखाली काय येणारे हे आपल्याला माहित आहे का ? आपलं काम बरं आणि आपण बरं "
     आमच्या वेळेला सगळ्या गोष्टी मोठ्याना विचारून करायची , आणि त्यांचं सगळं ऐकायची पद्धत होती. हे वारंवार बोलून आणि कृतीतून दाखवणारे लोक जुन्याजाणत्याचे हे वरचे बोल मात्र सोईस्करपणे कानामागे टाकून गावगप्पा मारताना दिसतात.

हि gossiping ची सवय तशाच मित्रमैत्रिणींमुळे लागते किंवा अनुकरणाने . आई वा आजीला अशा गप्पा ऐकायची सवय असेल तर ती मुलांनाही लागते . सुरुवातीला अनुकरण असते नंतर सवय बनते.
मग हे अशा सवयीचे लोक  स्वतःसोडून इतर सगळ्यांबद्दल
गॉसिप करायला लागतात. अशांना कसलेही छंद नसतात.
यांना best friend असे नसतात
( इंग्लिश मध्ये एक म्हण आहे gossip is spread by wicked people :  they stir up trouble and breakup friendships)
 जे लोक daily soap वाल्या मालिका बघतात ते खूप gossip करतात असे माझे सर्वसाधारण निरीक्षण आहे.( याला अपवादही असू शकतात पण मी पाहिलेला नाही) कायम मदतीला धावून येणाऱ्या परिचितांबद्दलही जेव्हा कुचाळक्या होतात तेंव्हा मात्र यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी वाटते.

           अशाने एक व्यक्ती म्हणून तुमच्यात काहीच positive घडत नाही , उलट सगळ्यांबद्दल तुम्ही असे बोलून त्यांच्या सदिच्छा सुद्धा स्वतःकडे येण्यापासून रोखता.
           
             Gossiping मध्ये पुरुषही मागे नसतात . आपले लक्ष नाही किंवा आवडत नाही असे त्यावेळेला भासवून नंतर बायको किंवा आई - बहिणीकडून सगळी बित्तमबातमी काढुंन घेणारे पुरुष पण माझ्या पाहण्यात आहेत.

           सुदैवाने शाळेत मैत्रिणी अशा मिळाल्या कि ज्यांना वाचनाची आवड होती. वाचलेली पुस्तके, रोजचा अभ्यास , रोजचे  आलेले काही गमतीशीर अनुभव, चालू घडामोडी, इतिहास, तर कधी चित्रपट यावर आमची चर्चा व्हायची. गोष्टी (stories) सांगितल्या जायच्या . यात गॉसिप कधी झाले नाही . चर्चा किंवा गप्पा अशाच झाल्या की त्यात माणूस म्हणून घडायला काही मिळाले. त्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी असेंन. इथे अमेरिकेतही अशाच मैत्रिणी मिळाल्या. ✌  

वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, May 4, 2017

शोध

शोध #
कधीकधी काय होत ना ,....
 एखादी वस्तु शोधायला जातो आणि आपल्याला समोर असूनही ती दिसत नाही🙃 ............खरेतर विचारांची इतकी गर्दी असते मेंदूत की जी वस्तू शोधतो आपण त्याचे रंग,रूप, आकार मनात लवकर तयारच होत नाही  ..........😦
ती वस्तू कधी, कुठे पाहिली होती किंवा त्याच्याशी संबंधित एखादी घटनाही मेंदूत लवकार मिळत नाही , वस्तू शोधायला आणि सापडायला हे होणे फार गरजेचे असते .☺
पण कधीकधी हे होत नाही आणि वस्तू समोर असूनही आपल्याला दिसत नाही.😐
                  लहानपणी , शाळेत, अगदी कॉलेज मध्ये असतानाही असे खूपदा व्हायचे माझे........मग घरचे म्हणायचे " हे काय इथेच तर आहे , समोर असूनही कसे दिसत नाही तुला ? "
मलाही नाही कळायचं , " अरेच्चा ! का बरं सापडलं नाही आपल्याला ?" 🤔
हिचे नेमके असे का होते हे पहिल्यांदा लक्षात आले ते माझ्या बहिणीच्या ..... बहिणी काही काळाने चांगल्या मैत्रिणी होतात हेच खरं !😊
                 घरी सुटी शेव आणली जायची .... एकदा असाच काही चाट खाताना आई म्हणाली, " रॅक मध्ये शेव आहे ती घेऊन ये " .
मी गेले.... मला काही सापडेना ☹..... माझी बहीण माझ्याकडेच बघत होती ...... मला नाही सापडणार अशी खात्री होती तिला! ( आणि का नाही सापडणार याच उत्तर पण)
ती म्हणाली ,
"प्लास्टिक transparent पिशवीतून दिसणारी पिवळी शेव या विचाराने शोधू नकोस" . असे म्हणल्याबरोबर माझ्या मनात हल्दीराम च्या शेवेसारखे पाकीट आले . आणि अर्थातच तसे पाकीट समोरच होते ....ते सापडले.😌
वस्तू मिळण्यासाठी Assumption पलीकडे पण रंग , रूप , आकार....... याचा विचार सुद्धा सापडला.😅
            आज मी संसारी आहे , आणि एक आईसुद्धा , त्यामुळे सजग राहावेच लागते ... पण कधीकधी असे lost व्हायला होतेच.......
            पण उद्या माझ्या मुलांचे असे झाले तर, हे का होते? आणि त्याला नक्की काय करायचं हे पण सापडले.😁😇

# तुज आहे तुजपाशी ......😷

@वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, May 2, 2017

विलायती चिंच

हिला विलायती चिंच का म्हणतात माहित नाही , काही भागात गोरखचिंच पण म्हणतात.
        माझ्या लहानपणी वेण्णानगर ला हा रानमेवा झाडावरच खायला मिळायचा . बरेचदा पांढरीच खायला मिळायची ....... लाल चिंच झाडाच्या टोकावर असायची आणि तुलनेने खाली असणाऱ्या चिंचा लाल होईपर्यंत कुणाला धीर नसायचा😁 ......मग लाल चिंच यशस्वीपणे पाडणाऱ्या मध्ये आणि खायला इच्छुकांमध्ये पेनसिली, सायकल ride अशा गोष्टींवर तह होऊन ती मिळवली  जायची.
         बाकीचे सगळे रानमेवे म्हणजे आवळे , बोरं, चिंचा( लाल , काळी दोन्ही) शहरात मिळतात पण ही चिंच अजून शहरात पाहिली नाही . फलटण च्या घोडे बाजारात मिळते असे ऐकले आहे, पण बाकी मोठ्या शहरात , मॉल मध्ये कधी पहिली नाही.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर


बालपण

हालती वस्तू बघून responce देणारी ....सहा - सात महिन्याची मुले वर्ष - सव्वा वर्षाची झाली की त्यांना आपल्या वस्तू, खेळणी कळायला लागतात.  
हे माझं आहे ( possession ) ही भावना कळायला लागते . एरवी घरात पडलेल्या खेळण्यांकडे ढुंकूनही न बघणारी मुले घरात आलेल्या त्यांच्या मित्रांनी खेळणी घेतली की मग मात्र possessive होतात.
  खाण्याच्या वेळी सुद्धा भरवताना खूप पळायला लावणारी मुले  , आई दुसऱ्या मुलाला किंवा त्यांच्याच मित्रांना भरवायला लागली की पळत आईकडे खायला येतात , आई ज्याला भरवत असते त्याच्याशी भांडतात , आणि सगळा खाऊ शहाण्यासारखा खातात.
            जी गोष्ट मुलांची तीच मुलांप्रमाणे सांभाळलेल्या प्राण्यांची.
काका , बाबा ,आजी - आजोबा पंढरपूरला असताना त्यांच्याकडे एक 'पिंटी ' नावाची कुत्री होती. त्यांच्याच समोर राहणाऱ्या डॉक्टरांकडे ' राणी' नावाची कुत्री होती.  दिवसभर या दोघी मैत्रिणी एकत्र खेळत , भटकत असायच्या .
पिंटी ला खायला ताटली ठेऊन हाक मारली तरी ती काही यायची नाही , खेळतच बसायची , आपले लक्षच नाही असे दाखवायची . खूप हाका मारूनही अजिबात यायची नाही.
मग घरातले 'राणी' ला हाक मारायचे , मग मात्र पिंटी धावत यायची. आणि येताना राणीशी भांडून यायची ( कदाचित त्यांच्या भु भु च्या भाषेत सांगत असेल ' खबरदार आलीस तर !')
             घरात आलेल्या पाहुण्याला जाताना गेटपर्यँत सोडणे ..... तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे पाहत उभे राहणे...... दाढीचा साबण लावलेला ब्रश हळूच पळवणे ....... पळणाऱ्या प्राण्यांची , फुलपाखरांची मजा घेत त्यांच्यामागे पळणे असे अगदी लहान मुलांसारखेच तिचे आणखी उद्योग चालू असायचे.
         एकूणच काय enjoying childhood ☺

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

मंडई

मंडईत खूप गर्दी , गोंधळ असतो त्यावरून 'डोक्याची मंडई करणे' हा वाक्प्रचार रूढ आहे .पण
कंटाळा आल्यावर मला मंडईत फिरायला जायला खूप आवडते. ......

आठवड्याला मंडई करण्याची आवड असणारी ..........
पावशेर मध्ये तीन ऐवजी चार काकड्या बसवण्याचे (tyapical बायकांच्या मते अनोखे) कसब असणारी ............. bargining मध्ये expert................
आधी तीन वेळा मंडई फिरून मग चौथ्या वेळेला actual भाजी खरेदीला सुरुवात करणारी .....................
माझी आई दहा रुपयाला सहा लिंब घेते म्हणून मी पण तिच्या सारखेच करण्याचा प्रयत्न करत म्हणजेच भाजीवलीला सहा लिंब मागून खूप हुज्जत  घातल्यावर ती देईना म्हणून लिंबुच न आणणारी ......
या आणि अशा प्रकारच्या कुठल्याही category मध्ये मी मोडत नाही.
तरीही मला मंडई फिरायला आवडते. मग भाजी आणायची असो किंवा नसो.
             हिरव्यागार भाज्यांचे डोंगर , यात पालेभाज्या, मटार, गवार ...... या भाज्यांना येणारा स्वतःचा एक टिपिकल वास....
विशेषतः कोथिंबीर ....... कोथिंबिरीच्या पेंढ्याचे ढिगच असतात
त्याचा घमघमाट सगळ्या मंडईत फिरत असतो......त्याच्या मुळांना लागलेल्या मातीला सुद्धा कोथींबीरीचाच वास येत असतो ....   खूप फ्रेश वाटते त्याने........ जसे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन वाटते.
             शीत रंग मनाला शांत, स्थिर करतात तर............ उष्ण रंग मनाला उत्साहित करतात. ........
शीत रंग म्हणजे निळा , हिरवा च्या सर्व छटा , क्वचित grey shed पण यात येते. .........उष्ण रंग पिवळा,  लाल च्या छटा.  

निसर्गात उष्ण रंग कमी आणि शीत रंग जास्त असतो. या theory चा प्रत्यक्ष अनुभव निसर्ग पर्यटनात येतो तसा तो मंडई मध्ये पण येतो.......
आकाराने लहान फळे उष्ण तर मोठी फळे शीत रंगाची असतात .
           मंडईत या निसर्गाच्या शीत - उष्ण combination ने एकदा फ्रेश झाले की मग भाजीवाल्यांच्या वेगवेगळ्या आरोळ्या मजेशीर वाटतात. ..... आपोआपच सगळा कंटाळा जातो ...........

@ वीरश्री वैद्य - करंदीकर


उत्तरायण


मला इथली म्हातारी माणसे जाम आवडतात. म्हातारी म्हणणे बरोबर आहे की नाही हे अजून ठरवता आलेलं नाहीये मला .......कारण या शब्दाबरोबर काही गृहीतके साहजिकच मनात येतात, पण इथे मात्र चित्र वेगळे दिसते.
हे सगळे ज्येष्ठ अजून काहीं ना काही काम करतात ......
प्राणी पाळून उर्वरित आयुष्य सुखाने घालवताना दिसतात ..... आपले छंद जोपासतात....

इथे एक मॉल आहे .....मॉल मधून बाहेर पडताना ,आमच्या बिल रिसिट एक आज्जी चेक करतात , त्यांच्याकडे पाहिले की फ्रेश वाटते एकदम .
हलका make up , छान ड्रेस up , artificial nails  अशी टकाटक उभी असते बाई .....प्रत्येकाशी हसून बोलते.......
लहान मुले असतील तर त्यांनाही hi करते ........ बिलाच्या मागे मस्त smily काढून मुलाच्या हातात ठेवते, ..☺
तसं पाहिलं तर फक्त बिल तसे समान आहे का हे बघणे तिचे काम आहे .. ती हसून बोलली नाही बोलली तरी तिच्या पगारात काही फरक पडणार नाही ...... पण....
Really enjoying soul.....
         
              Park मध्ये मुलाला घेऊन खेळायला जाते तिथेही एक आज्जी आजोबा येतात . प्रेमाने मुलांकडे पाहत असतात ....घसरगुंडी वरून छान पैकी घसरून येणाऱ्या मुलांना appreciate करतात .  सगळ्यांना cute वगैरे म्हणतात ..... कुणाचे कपडे , स्वेटर, बूट , सायकल आवडेल तर त्याला छान म्हणतात.......हलक्या आवाजात गाणी गुणगुणतात .....मला कुणाकडून तरी कळले की त्यांना मुले खूप आवडतात.
          ADvertise मध्ये असे एक आजोबा पाहिले चालता येत नाही ,खुर्चीवर बसून असतात ..... लाकडी आणि त्यावर खिळे लावलेल्या tool ने लोकरीच्या टोप्या विणतात.....
 त्या विकून येतील ते पैसे अनाथआश्रमाला देतात.
            भारतात असे ज्येष्ठ आहेत ..... पण तुलनेने कमी ...... आयुष्याचा उत्तरार्ध कसा असावा याचं , बोलतं model म्हणजे इथले हे लोक.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर