Sunday, May 7, 2017

चाक

चाक
आई च्या सरकारी नोकरीमुळे आमचे लहानपण वेण्णानगर (कण्हेर जवळ) मध्ये गेले. T. V. खूप कमी जणांच्या घरी....... काही मराठी पिक्चर आणि क्रिकेट मॅच सोडल्या तर तो फार कधी चालूही केला जायचा नाही. बाहेर खेळणे आणि गावभर भटकणे हे आवडते उद्योग. अनेक खेळ होते सोबतीला गोट्या ,भोवरे, विटीदांडू आणि या सोबत
पळापळी चे अनेक खेळ ....काही खेळ sesional असायचे, तर काहींची फॅशन असायची ( जशी कपड्यांची असते , काही दिवसांनी तीच फिरून पुन्हा येते.) जसे भोवरे, गोट्या .......  यात आणखी एक खेळ असायचा चाक फिरवणे. सायकल, गाड्यांची जुनी चाके सगळ्या कॉलनीतून फिरवणे. हाताने किंवा काठीने. यातही क्रमवारी असायची त्याची चाके होंडा वगैरे गाड्यांची असतील ते एक नंबर, ज्यांची सायकल ची असतील ते दोन नंबर. स्कुटर चे चाक जास्त नसायचे कारण एकतर ते जड आणि ते पळवायला खूप खाली वाकावे लागायचे पण त्याचा balance चांगला असायचा. तर असे हे चाक घरातूनच फिरवत पायऱ्यांवरून न पाडता नेता येणे, वळणावरून न थांबवता, वेग न कमी करता काठीने वळवता येणे , काठीने त्याचा वेग वाढवणे सोपे पण त्याचबरोबर कमी पण करता येणे ह्या गोष्टी ज्याला येतील तो यातला hero. मग याच्या शर्यती लागायच्या. जिंकणे, हारणे , भांडाभांडी , गटबाजी सगळे व्हायचे . पण पुन्हा दुसऱ्या दिवशी बट्टी.
             मी जेव्हा हा खेळ खेळण्याएवढी झाले तेव्हा माझ्याकडे चाक नव्हते. घरात सायकल , गाडी काहीच नाही; त्यामुळे मिळायचा प्रश्नच नव्हता. मला फार वाटायचे आपल्याकडे पण चाक असावे आपण पण फिरवावे सगळ्यांबरोबर. तेंव्हा माझ्या मावशीचे मिस्टर (वाकनिस काका) , त्यांच्याकडेच फक्त M80 होती. मी त्यांच्याकडे मागितले "मला चाक द्या , इथे फक्त माझ्याकडेच नाहीये". काही दिवसांनी ते मला चाक घेऊन आले .मुलींविषयी विशेष माया असणारे काका आणि मावशी  साताराहून वेण्णानगर ला गाडीवरून फक्त चाक देण्यासाठी आले.
           मग काय खेळताना माझा भाव पण वधारला. M80 चे चाक घेऊन मीही पळू लागले.  चाक घरातूनच फिरवत पायऱ्यांवरून न पाडता नेता येणे, वळणावरून न थांबवता, वेग न कमी करता काठीने वळवता येणे वगैरे, वगैरे.....या सगळ्यात पारंगत झाले . या खेळाने मला विशेष आनंद दिला. बाकीच्या सगळ्या खेळातले सामान मला आई - बाबांनी आणून दिले असते , पण चाक नसते देता आले त्यांना ,त्यामुळे आपल्याला हा खेळ खेळायला मिळेल असे वाटले नव्हते मला, ..... पण ते मिळाले.
               मी याच खेळाबद्दल लिहिले ते यासाठी कि यात गोट्या , भोवरे किंवा इतर खेळांसारखे काही विकत वगैरे आणावे लागत नाही. ज्या कुणी हा खेळ शोधुन काढला असेल म्हणजे (Best out of west) ते मूल खरंच सर्जनशील म्हणायला हवे.
🤗

वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment