Sunday, May 7, 2017

मनःशांती

बऱ्याच दवाखान्याप्रमाणे जोशी डॉक्टरांकडे नवव्या महिन्याचे पेशंट लवकर घेतात. रोजचे नंबर चे पेशंट , इमरजंसी , सिरीयस पेशंट या सगळ्यातून डॉक्टर जमेल तितक्या लवकर या नवव्या महिन्याच्या पेशंट ना आत घेत होते. एवढे असूनही एका बाई ची चीडचीड चालूच होती. कधी आत घेणार? .....इतका वेळ लागतो का, .....नवव्या महिन्याचे पेशंट लवकर आत घेतात ते खोटंच बोलतात........ माझ्या वेळेस असेच करतात..... ओळख असलेल्याना लवकरचा नंबर देतात ...........एक ना दोन भरपूर भुणभुणी लावल्या होत्या तिने.....अविरत बडबड आणि चिडचिड.
तिची ती चिडचिड बघून खरंच मला खूप आश्चर्य वाटत होते. आईपण हे नुसते शारीरिक नाही तर मानसिक बदलही घडवत असते. बाळ जन्मल्यानंतर ते किमान 3 ते 4 वर्षाचे होईपर्यंत आईकडे हवा असणारा लागणारा संयम आणि कमालीची सहनशीलता हे नऊ महिने आणि काढाव्या लागणाऱ्या कळा शिकवत असतात. मला तरी माझ्या वेळेस असेच वाटत होते . हिला यातले खरंच काही जाणवले नसेल का गेल्या नऊ महिन्यात?, का जाणवण्यासाठी लागणारा समजूतदारपणा किंवा मानसिकता च मुळी नव्हती  तिच्याकडे ? तेच कळेना.... हळूहळू तिच्या कटकटीचा परिणाम इतर माणसांवरहि व्हायला लागला ... डॉक्टरांवर नाही पण तिच्यावर मात्र सगळे वैतागले , कारण कटकट करणारा माणूस आपल्या डोक्याशी भले कटकट करत नसेल पण त्याच्या कटकटीने वातावरण मात्र खराब नक्की होते.
              आपल्या आयुष्यातहि हे असे लोक कुठे ना कुठे भेटतात. मित्रमंडळी मध्ये असतील तर त्यांच्यापासून चार हात लांब राहता येते , नातेवाईकांचे मात्र तसे नसते. त्यांना कुठे सोडूनही देता येत नाही , किंवा आपल्यालाही पळून जाता येत नाही. वरच्या घटनेसारखेच हे लोक सगळ्या घराचे वातावरण बिघडवतात, अशांत करतात. कुणी चुकून समजवायला गेले तर 'मग... मी असाच/ अशीच आहे असे म्हणतात . हे म्हणण्या मागे त्यांचा' मी आहे तसे मला स्वीकारा ( खरेतर सहन करा) असा मतितार्थ असतो . पण हा नियम ते स्वतः ला मात्र लावत नाहीत.
          हे लोक आले की आपण आत्तापर्यंत खूप प्रयत्नाने , विचाराने केलेली आपल्या स्वभावाची चांगली , संयमी आणि सर्वसमावेशक अशी केलेली बांधणी मोडून काढतात. अशा वेळी ' लक्ष द्यायचे नाही, किंवा तशाच प्रकारचे वाचलेले काही quotes ही उपयोगी पडत नाहीत. हे लोक संयमाचा अंत बघतात. आपली बांधणी ढासळते, त्या माणसाच्या अशा स्वभावाच्या जडण घडणीला जे जबाबदार आहेत त्यांचाही प्रचंड राग येऊ लागतो, कारण चूका इतक्या पण पाठीशी घालू नयेत कि तो माणूस चुका दुरुस्त करायचेच विसरून जाईल.
                कालांतराने परिस्थिती किंवा काळ हा आपली मानसिक सुटका करवून देतो ..... आणि आपण ढासळलेली बांधणी पुन्हा नव्याने उभी करायला घेतो.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

No comments:

Post a Comment