Saturday, April 22, 2017

परंपरा

             एक काल्पनिक प्रसंग...... नात, आज्जीला भाजी टाकताना विचारते," तू तेलात मोहरी , हळद का टाकतेस ?"  (खरेतर माझी आई घालायची म्हणून मी घालते असे म्हणायचे असते )पण नातीला पटावे म्हणून आज्जी म्हणते "त्याने चांगली चव येते". दुसऱ्या दिवशी नात हळूच मोहरी आणि हळदीची चव घेऊन बघते आणि पुन्हा विचारते कि या दोन्हींची चव चांगली नाही मग पदार्थ कसा चांगला होते ?आज्जी कडे उत्तर नसते ......ती तोच प्रश्न आई ला विचारते. आई तर शिक्षिका...... पण तिच्याकडेही  उत्तर नसते.
ती अंतर्मुख होते....... आपल्याला कधी हा प्रश्न का नाही पडला?..... पण ती ही अभ्यासू........... मुलीकडून वेळ मागून घेते आणि उत्तर शोधायला लागते .जेंव्हा ते तिला सापडते तीला आपल्या पूर्वजांचा सार्थ अभिमान वाटतो. उत्तर असे की आपण स्वयंपाकात वापरतो ते तेल, मग अगदी ते शेंगदाण्याचे घाण्यातून काढलेले का असेना, त्यात काही अशुद्धी असतात त्या कमी करण्यासाठी मोहोरी नि जिरे तेलात ताडतडू देतात, आणि हळदीची कन्सेप्ट अशी की, हळद ही निर्जंतुकीकरणाचे काम करते. आयुर्वेद असे म्हणतो ती इतकी प्रभावी आहे की तुम्ही रोज एक चिमूट हळद खाल्ली तर तुम्ही वज्रदेही व्हाल. रोज आठवणीने हळद खाल्ली जाईलच असे नाही म्हणून ती फोडणीचाच एक भाग करण्यात आली.  आईने हे मुलीला सांगितले; त्यावर जुन्या लोकांनी कित्ती रिसर्च केलाय असे तिचे मत पडले. ती खुश झाली पण, त्याचवेळी आज्जी  मोठी असून तीला हे का माहित नाही ? हा ही नवा प्रश्न तिला पडला.
       आजही असे प्रसंग अनेक घरात घडत असतील. आज्जीच्या जागी दुसरे कोणी असेल.
आजही असे अनेक लोक आहेत जे पाळायच्या प्रथा, परंपरा या मागचे मर्म न जाणून घेता,  न विचारता वा, न विचार करता पाळत असतात. आपण विचारले तरी सरळ सांगतात की आमच्या वेळी 'असे का?' म्हणून विचारायची पद्धत (आपण मुभा म्हणूया) नव्हती.
मी म्हणते त्या वेळेला नव्हती पण, तुम्ही जाणते झाल्यावरही खरी कारणे शोधायचा प्रयत्न का नाही केला? अशामुळे काही रीती या खालील गोष्टीतल्या शिष्यांसारख्या पुढे नेल्या गेल्या. 
             एका साधुने एक काळी मांजर पाळली होती. ती यज्ञाच्या वेळी त्याच्या कामात फारच लुडबुड करायची.
साहजिकच त्या साधूने तिला त्या यज्ञ मंडपाच्या एका जवळच्या खांबाला बांधून ठेवले जेणेकरून कुत्र्याचे भय पण राहणार नाही. हळूहळू त्या साधूचे शिष्य तयार झाले. त्याच्या कडून यज्ञ कर्म शिकले. एवढेच नव्हे तर खांबाला मांजर पण बांधायला लागले.😆 आश्रमात नसेल तरी काळी मांजर शोधून आणून बांधायचे 😂😂😂
              यातही त्या शिष्यांनी हेच केले. गुरु ला विचारलेच नाही की काळी मांजर का बांधली?  किंवा स्वतःही लॉजिकल विचारच केला नाही. 
               काळ्या मांजराप्रमाणे इतरही उदा.आहेत. मराठा व बहुजन समाजात लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या हातात तलवार किवा कट्यार असायची. वरातीत तलवारीचे काय काम? विचारले तर रूढी, परंपरा , चालरीत असे
उत्तर असायचे. नंतर समजले  की फार पूर्वी वरातीवर डाकू कडून लूटालुटी साठी हल्ल्यात होत. आपलेच भाउबंद पिढीजात वैरामुळे वरातीत हिंसाचार करीत. तेव्हा स्वसंरक्षणासाठी नवरदेवाच्या हातात तलवार देण्याची प्रथा पडली?    या बाबतीत -- का? कसे? केव्हापासून? इत्यादी प्रश्न मनात निर्माण झालेल्या पाहिजेत , म्हणजे अंधानुकरण होणार नाही.
             परंपरांमागे दूरदर्शी हित असेल तर पूर्वजांचा अभिमान बाळगून ती पुढे नेऊया आणि त्यात या साधूच्या गोष्टीसारखा आंधळा , बिनडोक अनुयय दिसला तर तो दुरुस्त करून ती पुढे नेऊया;  पण हे सगळे कळणार केंव्हा जेंव्हा तुम्ही कारणे शोधायचा प्रयत्न कराल तर!
              मला माझे लहानपण आठवते. माझ्या आई-बाबांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नुसती दिली नाहीत; तर संदर्भ, घटना, प्रयोग, वाचन या आधारे ती शोधायलाही शिकवली. माझी आई तर जुन्या वळणात वाढलेली पण तिने माझे प्रश्न कधी टाळले नाहीत किंवा न पटणारी उत्तरे हि दिली नाहीत.
           आमच्या पिढीला 'मी कुठून आलो?' या प्रश्नाचे  'तुला दवाखान्यातून आणले' हे उत्तर पटले पण पुढच्या पिढीला नाही पटणार. ती आणखी  advance  आहे. कदाचित तुमच्या या उत्तराला हसून ती तुम्हाला त्याचे सायंटिफिक कारण ही सांगेल. अशी आणखी काही तीन -चार प्रश्नांची त्यांना न पटणारी उत्तरे तुम्ही सांगितलित तर त्यांच्या लेखी तुम्ही अडाणी ठराल. त्यामुळे पालक आणि (विशेषतः) आजी-आजोबा यांनी रीती-परंपरा यामागची (लॉजिकल) कारणे या मुलांना स्वतः सांगावित.  माहित नसतील तर शोधवीत. असे झाले तर ही पिढी आपल्या रीती- प्रथा- परंपरा (ऑर्थोडॉक्स न म्हणता) स्वतःहून आनंदाने, उत्साहाने पुढे नेईल.         



@वीरश्री वैद्य - करंदीकर 

No comments:

Post a Comment