Monday, July 10, 2017

काजवे

आज खूप वर्षांनी काजवे पाहिले ( चमकले नाही पाहिले)आणि मनाला आलेली मरगळ दूर झाली.
    सकाळी इथे पाऊस पडून गेला ,जमीन भुसभुशीत झाली ,मातीत गारवा आला. खूप दिवसांनी कामे लवकर आटोपली आणि बाल्कनी मध्ये बसायला मिळाले ......
आणि लक्षात आले की समोर पार्क मध्ये काजवे दिसत आहेत. खात्री झाली तेव्हा जुने काहीतरी गवसल्याचा आनंद झाला.

        वेन्नानागर ला राहायचो तेव्हा खूपदा पाहिलेले, तिथे काजवे दिसणं ही खूपच comman गोष्ट होती.
मग ते बाटलीत पकडणे....तोंडात धरून चेहऱ्याचे भूत करणे हे खेळ त्याबरोबरच आले....
आजी सांगायची तिचे आजोबा धोतराच्या सोग्यात काजवे अलगद पकडून त्याचा बॅटरी सारखा उपयोग करायचे .....  मजा वाटायची तेव्हा .........

          १०-१५ वर्षांनी ते पुन्हा दिसले आज ......

    ' कट्यार काळजात घुसली' सिनेमातील ' मनमंदिरा...' गाण्याने आठवण करून दिली होती काजव्यांची...
तो सिनेमा गाजला त्या दरम्यान ' असे कीटक खरच असतात का ?' असा प्रश्न विचारलेला कानावर आला,
 तेव्हा ' म्हणजे तुम्हाला माहीत नाही?' च्या आश्चर्याबरोबर वाईट ही वाटले .
निसर्गाची ही किमया प्रदूषणाने इतकी दुर्मिळ व्हावी की काजव्यांना बघणे सोडा पण यांच्याबद्दल ऐकलेले पण नसावे?
लगेच पुढचा विचार आला ......
' म्हणजे उद्या माझ्या मुलालाही ( 'सव्य' ला )हे बघायला नाहीच मिळणार का कधी ?'
" आमच्या लहानपणी मागे light असणारे किडे होते ," अशी नुसतेच fantacy वाटणारे सांगावे लागणार असे वाटत होते .
         मी माझ्या शालेय वयात गो. नि. दांडेकरांच्या भ्रमंती वर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ' भिजल्यावर चमकणारे लाकूड....
भुंग्यानी पोखरलेले बांबू बनात वारे शिरल्यावर बासरीचा आवाज काढत होते .......
असे काहीबाही निसर्गाची किमया वाटणारे अनुभव वाचले होते.
मी काजव्यांबद्दल सांगेन तेव्हा माझ्या मुलाला पण असेच वाटेल कदाचित .... असंच वाटलं होतं.

          आशेचा किरण चमकणे हा वाक्प्रचार काजव्यांवरूनच घेतला असावा बहुतेक .....…...मला इतक्या वर्षांनी दिसले
म्हणजे माझ्या मुलालाही कधी ना कधी दिसतील हे जाणवलं ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर



No comments:

Post a Comment