Wednesday, June 21, 2017

खरा मान-पान

#_खरा_मान_पान

आपल्या कडे सण समारंभ यात मान - पानाची पद्धत आहे. या मान - पानात कपडे दिले जातात सुवासिनींची ओटी भरली जाते. पूर्वी ओटीत खण, नारळ, तांदूळ द्यायची पद्धत होती. शिजविण्यास उपयोगी म्हणून तांदूळ , नारळ आणि शिवण्याकरता उपयोगी म्हणून चोळी दिली जायची.
आज त्याची जागा ब्लाउज पिस ने घेतली आहे.
            काही घरातून मात्र या मान- पानाचे अति अवडंबर केले जाते. अगदी मंगळागौर, डोहाळेजेवण किंवा घरातील पूजा यातही मान-पान होताना दिसतो.
मला यामागे यजमान व्यक्तिचा नेमका काय हेतू आहे ते कळत नाही. कारण बरेचदा या मान- पानात पक्षपातिपणा  दिसतो. म्हणजे जवळच्या व्यक्तीना चांगले तर लांबच्या वा नावडत्या व्यक्तीला बरे अशी क्रमवारी पडते.
 मग दिले याचे मानसिक समाधान हवे ........ का सगळे प्रथेप्रमाणे करतात याचे कौतुक हवे असते ???
तेच कळत नाही.
बरे! सगळ्यांचे सगळे केले पाहिजे असा यांचा सुर असतो ,
 मग तूम्ही कर्तव्य म्हणून करता तर कौतुक किंवा परतफेडीची अपेक्षा का?........  तुमचे कर्तव्य तुम्ही करा बाकीच्यांचे त्यांचें ते बघून घेतील.
पण असे होतच नाही.
              यजमान ज्यांना देतात त्यांच्याकडून मिळण्याची सुप्त इच्छा हि यांच्या मनात असते. ..........नुसते मिळण्याची नाही तर चांगले मिळण्याची............मुळात त्यांची ही इच्छा पूर्ण  व्हायला त्यानी स्वतःनी काही  निःपक्षपातीपणाने मान-पान केलेले नसतात..................मग कुचाळक्या सुरु होतात.... मी दिलेले असे तर त्यानी दिलेले तसे.................
बरेचदा न आवडलेले किंवा हलके दागिने वा कपडे फिरवले जातात.
असे म्हणतात 'देउन द्यावे ते चांगले द्यावे'.
मी त्याही पुढे जाऊन असे म्हणेन की आपल्या आनंदासाठी द्यावे,..... अपेक्षा न करता , ........ना कौतुकाची , ........
ना परतफेडिची .
"मी दिले , मला त्याच्या आनंद आहे ...... मी माझ्या आनंदासाठी दिले" असेच मनाशी म्हणालो तर अपेक्षा राहणार नाही आणि आपण जे केले त्याचा  निर्भेळ, सुखमय आनंदच वाट्याला येइल.
         मुळात जे सधन आहेत ज्याच्याघरी कपड्यांचे , दागिन्यांचे गठ्ठे लागले आहेत त्यांना देण्यापेक्षा ज्यांच्याकडे नाही अशाना दिलेले काय वाईट??
ज्यासाठी तुम्ही हे सगळे करता म्हणजे
'आनंद', 'आशिर्वाद' , 'कौतुक'  या तीनही गोष्टी तुम्हाला मिळतील .
उदा. महत्त्वाचे एक-दोन समारंभ सोडले तर हि देवाणघेवाण परस्पर सामंजस्याने बंद करावी आणि यात लागणारा पैसा एखाद्या समाजसेवी संस्था ना द्यावा.......
 माणसांसाठीच काय पण प्राण्यांसाठी काम करणाऱ्याही अनेक संस्था, संघटना आहेत. त्यांना मदत करावी. पैशाच्या स्वरूपात करायाची नसेल तर अन्न,औषधे या स्वरूपात करावी.
             माझी आज्जी दरवर्षी रीतिप्रमाणे दिवाळसण , अधिकवाण करायची. एका वर्षी माझ्या बाबांनी तिला सांगितले कि ज्यांच्या घरीं आहे त्याना देण्यापेक्षा ते पैसे ज्याचे कपडे घेता ते एखाद्या आश्रमाला द्या.
आज्जीनेही जावयाचे कौतुक करत किंवा असे म्हणूया त्याच्या मान राखत तसे प्रत्येक वर्षी केले. असे कितीतरी लोक करत असतील , पण हे माझ्या घरचे उदा. आहे त्यामुळे मला महित आहे. मला त्या दोघांचे माणूस म्हणुन कौतुक आहेच पण जास्त कौतुक यासाठी आहे कि पारंपारिक रीत सोडून दुसरे करताना लोक काय म्हणतील ? किंवा आज्जी नेही ' मुलीच्या सासर कडचे काय म्हणतील ' ? असा विचार न करता जे योग्य  , जे मनाला पटले तेच केले.
   सुजाण नागरीक , सज्जन माणूस , भला माणूस अशी नुसती विशेषणे आपण ऐकत असतो. आपण पण असे काही काम करून आपल्याच नजरेत भले व्हायला काय हरकत आहे?
       विचारधारेत मोठी तफावत असण्यार्या  माणसाना हे पटवून देणे अवघड आहे. पण आपण स्वतः असे करु शकतो आणि आपल्या पुढच्या पिढीला तसे  पटवून देणे आपल्या हातात आहे .
मुलांच्या हातूनच एखाद्या आश्रमात कपडे वा खाऊ वाटप करताना किंवा वृद्धाश्रमातील एखाद्या पंक्तीत स्वतःच्या हाताने वाढताना मला , माझ्या मुलाना जे समाधान मिळेल त्याची तुलना कशाशीच होउ शकत नाही आणि अशा आनंदात लोक काय म्हणतील हा विचार आसपास फिरकतच नाही.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

1 comment: