Wednesday, September 13, 2017

#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?

एखादी emergency असणारी परिस्थिती म्हणजे accident , operation वगैरे........ . इथे खमक्या(कणखर) लोकांची फार फार गरज असते .
सुतकी चेहरा करून वावरणे, हातपाय गाळून बसणे, उगाच वाईट साईट विचार करणे अशाने ज्या व्यक्तीवर  emergancy ओढवली आहे त्याच्या भोवतीही एक उदासवाणे , निराशाजनक वातावरण पसरते.
            अशा वेळी तिथले वातावरण नीट करण्यासाठी खमक्या लोकांचा  positive attitute परिणामकारक ठरतो.
             खमके , कणखर म्हणजे कोरडे वा भावनाशून्य नव्हे. ( कारण असा अर्थ बरेच लोक काढतात.)
खरेतर खमकेपणा हा ज्यावर ही emergacy ओढवली असेल त्याच्या काळजीपोटीच येतो. ( rather तो यायला हवा )
 त्याच्या आजूबाजूचे negative वातावरण घालवणे ,भक्कम मानसिक आधार देणे या हेतूनेच येतो.  काही लोक जात्याच खमके असतात तर काहींना परिस्थिती बनवते.
              ज्या घरचे लोक खमके असतात तिथे व्यक्ती आपल्यावर आलेल्या अडचणी , office चे टेन्शन, इतर ताणतणाव मोकळेपणाने मांडू शकतो. अति काळजी असणाऱ्या घरात मुले इंडिपेंडंट झाली की घरच्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपले tensions साधे बोलतही नाहीत.
Generaly अति काळजी करणाऱ्या लोकांना high / low Bp वा heart problems असतात. आपल्या अडचणी सांगितल्या तर धीर मिळणे तर लांबच, यांचीच तब्येत बिघडून नवी emergancy नको, असा शहाणा विचार असतो यामागे.
              'तुम्ही / तो /ती आम्हाला काssही ( अडचणी, problems) सांगत नाही' अशी तक्रार करण्याआधी आपण तेवढे  सक्षम आहोत का,  हा विचार नक्कीच व्हायला हवा .

एक वाक्य फार पूर्वी वाचनात आले होते , ते या situation ला चपखल बसते
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, August 15, 2017

नवरे येती स्वयंपाकघरा

#_नवरे_येती_स्वयंपाकघरा

काही नमुने :-

नवरा -भांडं कुठं आहे ?
बायको- खालच्या कप्प्यात.
नवरा - डाळीचे पीठ?
बायको - वरच्या कप्यात उजव्या बाजूला.
नवरा - चिरलेली भाजी?
बायको - फ्रीज मध्ये.
नवरा - मोठा डाव कुठे ठेवलास ?
बायको - ड्रॉवर मध्ये.
नवरा - मसाल्याचा डबा ?
बायको - ?????? 😠😠😠
              राहू दे मीच करते ......
******************************************
नवरा खिचडी करणार असतो.
कट्ट्यावरचे त्याने मांडलेले सामान
 तांदूळ , मुगाची डाळ, मिसळणाचा डबा , गुळाचा डबा    पाण्याचा ग्लास, मीठ , कोथींबीर, सूरी , डाव वगैरे

बायको - ( हे सगळं बघून ) काय कुकरी शो वाले येणारेत
                का ? खिचडीचं coverage घ्यायला ?  
             
*******************************************
नवऱ्याने पदार्थ करून झालेला , कट्टा (चक्क) स्वच्छ ,
 पण......
सिंक मध्ये भांड्यांचा डोंगर...chopping board , किसणी सुरी सकट....
*******************************************
बायको - जरा भाजी टाकता का?
नवरा -   बरं , पण मी माझ्या आवडत्या भांड्यात करणार.
  भाजी झाली
10 जणांची भाजी होईल एवढं मोठ्ठ भांडं (आवडतं☺)
 त्यावर काचेचं जड  झाकण

भाजी .... भांड्यांच्या तळाशी
********************************************
नवरा -    आज मी करतो (बनवतो )नाष्टा
बायको -  बरं , करून झाला की मला स्वयंपाकघर
              परत पूर्वीसारखं करून द्या .
*********************************************

दुर्मिळ किंवा काहींच्या स्वप्नातील नवरा
स्वयंपाक तयार ....
भांडी घासलेली......
गॅस , कट्टा साफ .....
**********************************************
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, August 4, 2017

Friendless

#_friendless
मैत्री दिनानिमित्त थोडेसे
माझ्या परिचितांपैकी एकाच्या मुलीनी , मुलाला कोणी मित्र नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. हल्ली मुलींच्या अटी फारच असतात , फारच igo असतो  हा माझा मुद्दा नाहीये.
     मुलीचे म्हणणे पडले त्याला कोणीही मित्र नाहीत , म्हणजे रोज उठून सगळ्या गोष्टींबद्दल तो माझ्याच डोक्याशी कटकट करणार.
      हे ऐकून मलाही वाटले होते की हे काय नकाराचे कारण असावे का? मुळात मित्र-मैत्रिणी (best friends) नसू शकतात हे काही पटेना , पण नंतर असे दोन नमुने समोर आले आणि पटले की अशीही माणसे असतात, याने एक पालक म्हणून मला विचारात पाडले.
       प्रगल्भता यायला , भावनांचा योग्य निचरा व्हायला , योग्य वयात समवयीन, समविचारी मित्र-मैत्रिणी अत्यंत आवश्यक असतात.
या friendless नमुन्यांबद्दल थोडे निरीक्षण मांडते......
      शाळेत ,कॉलेजमध्ये होते मित्र पण कुणी आता contact मध्ये नाही, अशी अवस्था असते. best friend वगैरे नसतात.
मग आई , वडील किंवा भावंडे यापैकीच कोणीतरी असे असते की ज्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलतात. बरेचदा आईच असते.
आईच्याच डोक्याशी सगळे काही...
मुलांच्या बदलत्या वयानुसार त्यांचे मित्र होऊन समजून घेण्याची मानसिकता प्रत्येक आईची असतेच असे नाही.
 ( मुल कसेही असले तरी आई ला प्रिय त्यामुळे नीट मार्गदर्शन ,प्रसंगी कानउघडणी होतेच असे नाही)
       त्यातून यांच्यात अनेक न्यूनगंड निर्माण झालेले असतात.
हे बरेचदा attention सिकर असतात. भावंड असेल तर ते खूप लाडके आहे , असा समज असतो. हा समज दूर करण्यासाठी आईकडून अनेकदा फाजील लाड केले जातात.
माझ्यावर कसा अन्याय झालाय , असे सारखे सारखे उल्लेखात आणून ही मुले जन्मभर त्याचा फायदा घेत आईकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात .
        त्यांचा स्वभावही चिडचिडा आणि कटकटी करणारा होऊन जातो , जरा काही मनाविरुद्ध झाले की सगळ्या घरभर कटकट करत फिरणे, आपल्याला सोडून बाकीचे सगळे मजा करतात, आपली कुणाला काही पडलेली नाही असे ग्रह करून घेणे , दुसऱ्याला त्रास होईल असे मुद्दाम वागण्याचा नतद्रष्टपणा करणे असे उद्योग सुरु होतात , आणि मग तो स्वभावच बनून जातो . मग अशा माणसांशी बोलायला तरी आवडेल का कुणाला ?
         यावरचढ आईची पाठराखण , लहानपणी समवयीन मुले मुली खेळायला नव्हती ( मग शाळा ,कॉलेज मध्ये काय होते?),
काही आयाना हा अभिमान असतो आपल्या मुलांच्या आयुष्यात फक्त आपणच खूप महत्वाचे माणूस आहोत.
खरे तर ही अभिमानाची नाही , विचार करण्याची गोष्ट आहे.
मित्र - मैत्रीण नसणे ही गोष्ट व्यक्तिमत्वात अनेक negetive बदल लहानपणापासूनच आणते. (Iike slow poisoning)
        असे लोक पाहिल्यावर वाटते  त्या मुलीने योग्य निर्णय घेतला.
           सध्या इथे फार मित्र-मैत्रीण नसणारी , आत्मकेंद्रित मुले मी पाहत आहे , किमान 5 वर्षाची झाल्यावर तरी खाऊ वाटून खाणे , खेळणी share करणे हे सुद्धा ती मुळीच करत नाहीत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पालक म्हणून मला पडलेले काही प्रश्न

* हे असे नेमके friendless कसे काय होतात?
* इतके की वयाची चाळीशी आली तरी याना मित्र का असू नयेत ???
*  आपली मुले अशी होऊ नयेत यासाठी पालक म्हणून काय करता येईल ?
* माझ्या मुलांना योग्य मित्र शोधायला / निवडायला  मदत कशी करता येईल?

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, July 24, 2017

सुदिनम्|

लहानपणी वाढदिवस असलेला दिवस खूप छान असायचा . वाढदिवसामुळे मोठं कोणी ओरडायचं नाही, खेळांत पण कुणी birthday boy/girl ला चिडवायचं, त्यांच्याशी भांडायचं नाही .........फक्त त्या दिवासापुरतं......
        ज्याचा वाढदिवस असेल त्याच्या घरी संध्याकाळी बोलावणं  असायचं ........त्यातल्या त्यात नवीन कपडे घालून ( कारण नवे कपडे हट्ट करून आधीच काही वेळा घालून घेतलेले असायचे , मग त्यातल्या त्यात कमी वापरलेला ड्रेस घालून ) त्याच्या घरी जायचे , गिफ्ट घेऊन .......
कोणी पेन्सिल, कंपास बॉक्स, बिस्किटाचा पूडा , असे काही बाही आणायचे.
क्रिम चे decoration असलेला केक बघायलाच खूप छान वाटायचा,..........ताजा वगैरे असण्याची गरज नसायची.
त्यावर डेकोरेशन केलेल्या फुलाचा piece आपल्यालाच यावा अशी इच्छा मनात केककडे बघून मागितली जायची.
 केक कापणे , गिफ्ट देणे , कार्यक्रम व्हायचा ,यात टाळ्या वाजवताना birthday boy/ girl ऐवजी केक कडेच जास्त लक्ष असायचे . लिम्लेटच्या गोळ्या, पार्लेG ची चॉकलेट हीच के ती रिटर्न गिफ्ट.
                   मग paper डिश मध्ये फरसाण किंवा तत्सम चिवडा जिलबी आणि केकचा छोटासा piece यायचा, ते क्रिमचं फुल नाही पण पानांचे तुकडे - बिकडे असायचे , तेवढंच आपलं समाधान..........खायला सुरुवात जिलबीला केकचे क्रिम यापासून व्हायची.
केक आणि चिवडा एकदम संपला पाहिजे असा निर्धार करून खायला सुरुवात करायचो ( निर्धारच करावा लागायचा कारण केकच आधी संपणार हे माहीत असायचे ).
काहीजण फरसाण / चिवडा पटापट खाऊन घ्यायची आणि
" काकू , संपलं " असे म्हणून अजून घेऊन यायची , काहींचं निम्मं पण संपलेलं नसायचं. दुसऱ्यांदा आणलेला फरसाण /चिवडा काही संपायचे नाही . मग ठरलेले वाक्य
 " काकू घरी घेऊन जाऊ?" काकू काय म्हणणार " ने" .
त्याची री ओढत आपण पण तसंच विचारायचं, कारण केक संपलेला असायचा. मग ते पेपर डिश मध्ये तसंच न सांडता हळूहळू चालत घरी घेऊन यायचं.
         झोपही मग कसल्याशा आनंदात लागायची.

          परवाच एका गोड मैत्रिणीच्या गोड मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो तेव्हा आठवलं हे सारं.

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, July 21, 2017

वाचनवेड

#_वाचनवेड
हल्ली बऱ्याच मुलांना वाचनाची आवड नसते. Electronic media दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याचा खूप मोठा पगडा आहेच , त्याचबरोबर आई-वडिलांनाच ती आवड नसणे हे पण मुख्य कारण आहे. घरात कधी कोणाला वाचताना बघितलेच नसेल तर मुले तरी का घेतील हातात पुस्तके ?
        काहीवेळा आई वडीलांपैकी एकाला आवड असली तरी मुलांना असतेच असे नाही . आई होण्याचा विचार असतानाच हे  आणि यासारखे काही प्रश्न मनात येत होते .
'आपल्यासारखी आवड आपल्या मुलाला लागेल का ? '
'त्याचा interest असेल का ?'  'त्याची आवड निर्माण व्हायला काय बरे करता येईल ?'
याचे उत्तर मला वाचनाची आवड का लागली यात होते.
ज्यांनी माझ्यात ही आवड निर्माण केली ते माझे वडील म्हणतात की,  '
मुले बोलायला लागली की त्यांना गोष्टी सांगायला सुरुवात करायची . वाढत्या वयानुसार त्यांचे interest , वाढत जाणारे आकलन लक्षात घेऊन त्यात बदल करायचे ,
म्हणजे लहान असतात तेव्हा प्राण्यांच्या गोष्टी ,नंतर राजाच्या,  जादूच्या , मग moral stories इसापनीती सारख्या असे करत जायचे .  हे सगळे करताना आपला गोष्टींचा साठा वाढवत जायचा. .... त्याना मध्ये मध्ये गोष्टी वाचूनही दाखवायच्या ..... मग वाचता यायला लागल्यावर त्यांना स्वतः गोष्टी वाचायची आवड लागते . इ• ४ थी ते ७ वी या वयोगटात असतानाच वाचनाची  चटक  लागली  तरच ते चांगले वाचक बनतात. प्रौढ वयात ही आवड निर्माण  करता येत नाही. ', इति बाबा.
             वाचक आई - वडिलांना मुले पण आपल्यासारखा पुस्तक खाणारी (वाचणारी) व्हावी असे वाटणे स्वाभाविक आहे  . पुस्तक खाऊन काय मिळते हे खाल्ल्यावरच कळते. आपल्या व्यक्तिमत्वात अंतर्बाह्य , positive बदल चांगली पुस्तके घडवतात.
           " मला पुस्तक वगैरे वाचायला आवडत नाही " असे अभिमानाने सांगणारी माणसे माझ्या पाहण्यात आहेत.
(ज्या गोष्टीबद्दल खंत वा वाईट वाटले पाहिजे त्या अभिमानाने कसल्या सांगता? )आणि वाचनाची आवड का नाही हे explain करणारे त्यांचे आई - बाबा सुद्धा .
 ' मी कॉमर्स / सायन्स ला होते / होते.
 ' english medium ला होतो/ होते.
तर पालक ----
' खूप अभ्यास असतो, त्यातून शाळा गुरुकुल type आहे.
' शाळेत स्पोर्ट्स आणि इतर activity असतात की personality development ला.( त्यासाठी पुस्तके कशाला?
काही कॉमन कारणे ---
'वेळच मिळत नाही.'
'वाचायला सुरुवात  केली की झोप येते.'
'फेसबुक whatsapp वरील वाचन पुरेसे आहे.'
'नोकरीतून रिटायर झाल्यावर वाचायचेच आहे.'
'आता आम्हाला मराठी वर्ड्स  व त्यांचे मिनिंग्ज रिमेंबर करायला डिफिकल्ट जातं.' ( मग English books वाचा , त्यांचीही बोंब).

            असली लटकी कारणे ' वाचन ' या माणसाच्या महत्वाच्या गरजेसाठी कशी काय देऊ शकतात याचे नवल वाटते.  एकूणच वाचनात no interest.
 " पुस्तक वाचणे आणि त्यावर चर्चा करणे" हे वाक्य जणू काही
 "प्यायला बसतात आणि नंतर बरळत असतात " अशा प्रकारच्या हेटाळणीच्या सुरात मी ऐकलेले आहे ,
आधी राग आला , पण नंतर कीव.......
कारण हे खालचे चित्र या बाबतीत बऱ्यापैकी बोलके आहे.

@वीरश्री वैद्य - करंदीकर


Wednesday, July 19, 2017

मूल झाल्यापासून ते किमान 4-5 वर्षाचे होईपर्यंत त्या आईला असंख्य माणसे असंख्य सल्ले देत असतात .
त्यापैकी काहीच माणसांचे सल्ले हे अचूक असतात .
( ४० - ५० सल्ले देणे , मग त्यातला एक बरोबर आल्यावर , "बघ तरी मी म्हणत होते/होतो", ही असली माणसे या अचूक सल्ले या विभागामध्ये मोडत नाहीत).
        यांचा मुख्य सल्ला criteria म्हणजे बाळाचा आकार , बाळ healthy हवे याचा अर्थ निरोगी असा न घेता, गुबगुबीत घेतला जातो.
 मग बाळ अंगाने बारीक असेल ( भले त्याचे वजन प्रमाणात का असेना)  त्याला गुबगुबीत करण्याचे असंख्य सल्ले चकटफु मिळतात.
त्याला कसं खाऊ घालायचं , लंगोट घाल , diaper नको ( किंवा vice versa), शी होत नाही का? , अमक देत जा , पातळ झाली की लगेच तमकं देत जा, सर्दी कशी झाली ?
बांधलं नव्हतं का डोक्याला?  , sweater घाल लगेच ,
 ड्रायफ्रूट दे , खजुर देच, अंड नाहीं खात, मग पनीर देच.
खात नाही , उलटी काढतो ?असं कसं काढतो ?
,घालायचं दामटून, थांब मी दाखवते / दाखवतो.

       या सगळ्या सल्ल्यांमध्ये आईला जराही उसंत मिळूच नये असं टाईट शेड्युलच सांगत असतात काहींजण....
या सल्ल्यांच्या गर्दीने आई म्हणून तिला निसर्गतः मिळालेले बेसिक instict कामच करत नाहीत.
           दुसऱ्या बाजूला आईची कामं ही आईलाच करावी लागतात , दमटून खायला घालणे या प्रकरणात उलटी , शी यांनी खराब झालेले सगळे काही आईलाच साफ करावे लागते , ते ही लगेच .......ते करायला ना सल्ले देणारे येतात,............ ना खायला घालून दाखवणारे

   कहर तर तेव्हा होतो जेव्हा मूल सांभाळण्याचा काहीही अनुभव नसणाऱ्या ( नवीन लग्न झालेल्या अर्ध्या हळकुंडाच्या...... ') 'डायपर काढून त्याला मोकळे ठेव' , मी घातली आहे ना तशी मऊ ओढणी पांघरत जा 'असले काही म्हणतात ( तेव्हा मनात ' शु - शी तू काढणार आहेस का ?' असे येतेच)........

      आता काही पूर्वीसारखी 9 - 12 व्या वर्षी लग्न होत नाहीत . आई होण्याचा विचार चालू असताना , पूर्ण medical check up करणे, निरोगी मातृत्व, गर्भसंस्कार या सगळ्याची माहिती मुली बऱ्यापैकी घेतात . बाळ आई वर अवलंबून असेपर्यंत काय काय करायचे याची मानसिक तयारी ते पोटातील बाळ , ते नऊ महिने , त्याच्या कळा या काळात होते .
( काही अपवाद असू शकतील पण निसर्गतः मादीमध्ये हे आईपण उपजतच असते).
याही पलीकडे अनुभवी माणसे महत्वाची आहेतच, अगदी कळेनासे झाले , काही भीती वाटली की नवीन आया विचारतातच , तेव्हा द्या सल्ला किंवा सांगा उपाय .
        पण या सल्ले देणाऱ्यांपैकी ( यात अनुभवी पण आली)  2 ते 3 % माणसेच अचूक सल्ला देतात. या माणसांबाबत माझे एक निरीक्षण सांगते . हे आल्या आल्या सल्ल्यांचा भडिमार करत नाहीत.
 "बाळ रडतय? मग वुडवर्ड्स ग्राईप वॉटर दे त्याला मी त्याच्या बाबाना आणि त्यांची आई तुझ्या बाबाना हेच देत होती",
( जसा काही खानदानी रिवाज असावा) असलं काही म्हणत नाहीत .
आई-बाळाचे रुटीन , त्याची अंगकाठी, झोप, भूक, आलेली अनुवंशिकता याचे एक-दोन दिवस अगदी बारीक observation करतात . आई कुठे अडतेय, तिला नेमकी कशात मदत वा अनुभवी सल्ला हवाय हे ओळखतात.
मग अशावेळेला मिळालेला सल्ला साहजिकच अचूक आणि रामबाण असतो.
माझ्या माहितीतल्या अशा बायकांनी त्यांची स्वतःची डिलिव्हरीच्या वेळेचा अंदाजही आला होता , त्या वेळी त्या स्वतःच जाऊन ऍडमिट होऊन , थोड्या वेळातच बाळाला जन्म दिलेल्या आहेत........

@वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, July 10, 2017

काजवे

आज खूप वर्षांनी काजवे पाहिले ( चमकले नाही पाहिले)आणि मनाला आलेली मरगळ दूर झाली.
    सकाळी इथे पाऊस पडून गेला ,जमीन भुसभुशीत झाली ,मातीत गारवा आला. खूप दिवसांनी कामे लवकर आटोपली आणि बाल्कनी मध्ये बसायला मिळाले ......
आणि लक्षात आले की समोर पार्क मध्ये काजवे दिसत आहेत. खात्री झाली तेव्हा जुने काहीतरी गवसल्याचा आनंद झाला.

        वेन्नानागर ला राहायचो तेव्हा खूपदा पाहिलेले, तिथे काजवे दिसणं ही खूपच comman गोष्ट होती.
मग ते बाटलीत पकडणे....तोंडात धरून चेहऱ्याचे भूत करणे हे खेळ त्याबरोबरच आले....
आजी सांगायची तिचे आजोबा धोतराच्या सोग्यात काजवे अलगद पकडून त्याचा बॅटरी सारखा उपयोग करायचे .....  मजा वाटायची तेव्हा .........

          १०-१५ वर्षांनी ते पुन्हा दिसले आज ......

    ' कट्यार काळजात घुसली' सिनेमातील ' मनमंदिरा...' गाण्याने आठवण करून दिली होती काजव्यांची...
तो सिनेमा गाजला त्या दरम्यान ' असे कीटक खरच असतात का ?' असा प्रश्न विचारलेला कानावर आला,
 तेव्हा ' म्हणजे तुम्हाला माहीत नाही?' च्या आश्चर्याबरोबर वाईट ही वाटले .
निसर्गाची ही किमया प्रदूषणाने इतकी दुर्मिळ व्हावी की काजव्यांना बघणे सोडा पण यांच्याबद्दल ऐकलेले पण नसावे?
लगेच पुढचा विचार आला ......
' म्हणजे उद्या माझ्या मुलालाही ( 'सव्य' ला )हे बघायला नाहीच मिळणार का कधी ?'
" आमच्या लहानपणी मागे light असणारे किडे होते ," अशी नुसतेच fantacy वाटणारे सांगावे लागणार असे वाटत होते .
         मी माझ्या शालेय वयात गो. नि. दांडेकरांच्या भ्रमंती वर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ' भिजल्यावर चमकणारे लाकूड....
भुंग्यानी पोखरलेले बांबू बनात वारे शिरल्यावर बासरीचा आवाज काढत होते .......
असे काहीबाही निसर्गाची किमया वाटणारे अनुभव वाचले होते.
मी काजव्यांबद्दल सांगेन तेव्हा माझ्या मुलाला पण असेच वाटेल कदाचित .... असंच वाटलं होतं.

          आशेचा किरण चमकणे हा वाक्प्रचार काजव्यांवरूनच घेतला असावा बहुतेक .....…...मला इतक्या वर्षांनी दिसले
म्हणजे माझ्या मुलालाही कधी ना कधी दिसतील हे जाणवलं ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर