Tuesday, May 12, 2020

दवाईसुंदरी दिवस

#दवाईसुंदरी_दिवस

गेले दहा-बारा तास अविरतपणे कळा देत होती ती. नर्स येऊन बघून गेल्या त्यालाही 2-3 तास झाले. हे पोटाचे ओझे लवकरात लवकर सोडून मोकळे व्हावे एकदाचे. कधी येणार वेळ? नर्स एकमेकांशी बाहेर गप्पा मारत उभ्या नुसत्या , सात्विक संताप आला तिला.
 त्यात पँन ची ही सोय नव्हती.....ती तशीच कशीबशी उठली टॉयलेट चे दार थोडे उघडे ठेवून जाऊन आली ,तशीच विव्हळत बेडवर आडवी झाली .त्या एकदा येउन पाहून गेल्या , पुन्हा गप्पा मारीत लांब उभ्या राहिल्या., हिचा राग पुन्हा वाढला.
मी इतकी विव्हळतेय आणि ह्या गप्पा मारत हसतायत...
आत्ता या क्षणी हातात येण्यासारखं काही असत ना तर ते  भिंतीवर थडाथड फेकून मारायची इच्छा झाली तिला.
या सगळ्या मनस्थितीत कळा मात्र दुप्पट वेगाने येऊ लागल्या. तिच्या कण्हण्यात झालेला सूक्ष्म फरक त्यांच्या अनुभवी कानांनी टिपला होता . त्या तिघी लगबगीने आत आल्या . त्यातली एक म्हणाली ," चला घ्या आत हिला , आता होईल ही".
       आत नेल्यावर च्या प्रत्येक टिपेच्या कळेला त्याचा हात तिच्या केसातून आईच्या मायेने फिरत होता " आई होणं सोपं नसतं ग पोरी ......लाव जोर लाव
...पुश कर "झालं हं ,झालं .... थोडंच बघ .... पुश कर ... पुश कर  .... सुटशील लवकर.....असा आवाज लांबून कुठूनतरी तिच्या कानाला जाणवत होता. बाळाच्या रडण्याचा आवाज आला , क्लान्त होऊन पडून राहिली ती.
      तिसरीत शाळेच्या स्टेजवर गेली होती ,प्रखर लाईट समोर अंधार , काही सुचेना ,कळेना , सैरभैर होऊन इकडे तिकडे पहात असताना ,विंगेत बाईंचा चेहरा दिसला , अक्षरशः आई सारखा वाटला तो......
आताही तसंच झालं होतं. तिला तोच केसातून हात फिरवणारा चेहरा मिटल्या डोळ्यांनाही दिसत होता.
          तोपर्यंत बाळाला धुवून ,गुंडाळून त्यांनी तिच्या शेजारी ठेवले ..... आणि त्या नन्तर दिसलाच नाहीत.
डिसचार्ज च्या दिवशी तिने त्यांना शोधून हाका मारून बोलवले , हातात नारळ आणि काही पैसे ठेवले आणि एक घट्ट मिठी मारली.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, April 7, 2020

हनुमान

#हनुमॅन
एखादि गोष्ट हवी असेल तर न मागताही मुळातच मनकवडा असलेला मामा ती देतो, मला तू मामासारखाच वाटतोस . मामासुद्धा तुझा उपासक , बलोपासक , सगळ्याना आधार वाटणारा असाच , त्याचं अस असणं खूप जास्त कारणीभूत आहे खरं तर तुझी माझी ओळख करून देण्यात. आजोबांनीही गोष्टी सांगताना मला तुझ्या खूप जवळ आणून सोडलं.  तू माझा सुपरहिरो 'हनुमॅन' झालास. तुझ्याबद्दलच एक आश्वस्थ कुतूहल कायम राहिलं. शेवटच्या गाडीने गावाच्या फाट्यावर उतरल्यानंतर घरी जाणाऱ्या प्रत्येक लहानथोराला तुझे नुसते स्मरण म्हणजे जणू बुलेटप्रूफ जॅकेटच.
रामायणातील गोष्टींमध्ये तुझ्या वेगवेगळ्या पराक्रमांसकट कायमच भेटत राहिलास. मोठी झाले तसतशा आणखी गोष्टी कळत गेल्या ......
तुझे व्यक्तिमत्त्वच इतके पावन पवित्र , कर्तव्यनिष्ठ की प्रत्यक्ष शनी ला ही इतक्या व्रतस्थाला साडेसाती कोणत्या कारणाने द्यावी ? असा प्रश्न पडला. अनेक बाधा घालवण्यासाठी , मानसिक कणखरपणा येण्यासाठी तुझी स्तोत्रे रामबाण उपाय आहेत. भाषा आणि त्यांची व्याकरणे यावरही तुझे प्रभुत्व आहे.
नंतर भेटलास ते नवनाथ भक्तीसार ग्रंथात . खरं तर त्यात  तुझ्यासारखाच अजून एक आहे , गोरक्षनाथ ! . पूर्ण पोथीतील त्याचे व्यक्तिमत्व पाहिल्यावर मला तूच आठवलास. गाढ ,डोळस भक्तीने आलेला दुर्दम्य आत्मविश्वासामुळे तुम्ही गुरू असो किंवा आराध्य यांनाही प्रसंगी मोह मायेपासून , संकटातून बाहेर काढलेले आहे.
एवढे करून श्रेयही त्यांनाच देण्याची नम्रताही दाखवली आहे.
प्रभू श्रीरामानंही तू त्यांचा भक्त आहेस म्हणून सार्थ अभिमानच असणार....
      लहान मुलांसाठीचे सुपरमॅन गाणे मध्यंतरी ऐकण्यात आले . तेव्हा मला एक महत्वाची गोष्ट जाणवली की
मला माहित असणाऱ्या तुझ्या पूर्ण जीवनपटात तुला एकटेपणा , फ्रस्ट्रेशन असे कधी आले नाही.
रामायणात एक प्रसंग आहे - तुला तुझ्या शक्तींचा विसर पडला आणि मग जांबुवंताने आठवण करून दिली , यामध्ये तुला विसर पडला असेल असे वाटत नाही , तुझ्या आत्मसंयमाने तू अंगातील रग काही काळाकरता शांत ठेवली असशील , तू काय ताकदीचा आहेस हे जांबुवंताला माहीत असेल आणि तो एवढंच म्हणाला।असेल की " this is the time .…..." ( अर्थात संस्कृतमध्ये )
      लहानपणी निर्जीव फुग्याला घाबरणारी मी आणि आत्ताची मी यात स्तोत्ररूपाने तू जवळ असण्याचा खूप मोठा हात आहे....यापुढेही असाच सोबत रहा.
जिथे कुठे आहेस तिथे हे नक्की वाचत किंवा जाणून घेतले असशील तू.......
प्रकटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा .!!!
Happy birthday

Monday, February 25, 2019

#प्रपोज

हा त्यां दोघांचा ऑलमोस्ट 13 वा व्हॅलेंनटाईन होता. आज तो ऑफिसला नेहमीपेक्षा लवकर जाणार होता आणि लवकर येणार होता , कारण त्यांच्या मित्रमंडळात आज एकत्र सेलिब्रेट करायचे ठरले होते. मुलांसाठीचे खाणे ,खेळणी ,पुस्तके अशी तयारी करून ती आधी पोहोचणार होती . मोठा मुलगा छोटूला छान सांभाळत असल्याने ,त्यांना फार काळजी नसायची. एकाला दोघे असले की आईवडील थोडे निर्धास्त होऊ शकतात नाही का !
         तसं तर त्यांचं लव्ह मरेज.  लग्नाआधीचे दिवस जितके छान , तरंगत गेले , लग्नानंतर मात्र गालबोट लागल्यासारखे झाले. असूया , मत्सर, किंवा स्त्रीसुलभ हेवा तिच्यात मुळीच नव्हता. दागिने ,कपडे ,पैसे, घर यातही अडकणारी नव्हती ती त्याच्या आई-बाबांचं  मात्र 'मी' आणि 'माझं' कधी सुटलं नाही. 'My home my rules' हा फंडा. टाळी एका हाताने वाजत नाही हे बरोबर, पण समोरचा तुमच्या चार गोष्टी समजून घेतोय म्हणल्यावर तुमचीही तसं करण्याची जबाबदारी बनते ना, सारखंच समोरच्यावर बोट ठेवायचे तर घर शांत राहील का? कुठलेही छंद , मित्र- मैत्रीण नसणं ही गोष्ट स्वभावात अनेक निगेटिव्ह बदल करते , जणू स्लो पॉयझनिंग. म्हणजे समारंभात एखादं टोळकं सतत टीकेच्या सुरात असत ना ,टीकेचं लक्ष्यही absolutely बिनडोक ... म्हणजे केस किती लांब आहेत नई का हिचे ,पण मऊ नाहीत अजिबात ; ती अमकी - ढमकी शिकलेली आहे खूप , नोकरीही भक्कम पगाराची , घरचं करून जाते कामाला ,पण दिसायला काही खास नाही ह् ;  - हे असं जवळचं सगळंच. नकारात्मक बाजूला झुकणारे स्वभाव आणि अडेलतट्टू वृत्ती.
तिने सासरी atjust करण्याचा हरघडी प्रयत्न केला या गोष्टीचा सगळ्यात मोठा साक्षीदार तो स्वतः च होता .
त्याला वाटायचं एखादं भावंड असायला पाहिजे होतं आपल्याला , आई-बाबांचा आपल्यावरचा फोकस विभागला गेला असता ,झालेला त्रास सौम्य झाला असता.
             इथे अमेरिकेत आल्यावर जीवाला थोडी शांतता मिळाली, त्यामुळेच राहून गेलेला दुसरा चान्स त्यांनी  इथे घेतला. ते नऊ महिने आणि डिलिव्हरी खूप अवघड गेली. ती मैत्रिणीत खिदळताना म्हणायचीही ' वर हात लावून परत
आलेय मी'. खरंच होतं. त्याला स्वयंपाक यायचा नाही याची गिल्ट या काळात अनेकदा वाटली त्याला, ते त्याच्या लेखी दुय्यम किंवा नावडीचं काम होत अशातला भाग नव्हे ,पण हे स्किल इतक्या प्रकर्षाने कधी आपल्याला लागेल असं वाटलं नव्हतं त्याला. 'प्रेग्नसी पिरियड आणि डिलीव्हरी क्रिटिकल असेल' ही Dr ची वॊर्निंग डोक्यात सतत असायची.' तिला काही झालं तर ' ची शक्यता त्याची झोप उडवून जायची. मग तो जरुरी पुरता स्वयंपाक शिकला. तिला शक्य तेवढी शारीरिक, मानसिक विश्रांती दिली त्याने. काय केलं म्हणजे तिला बरं वाटेल ? याचा विचार करत असतानाच  'गरजेच्या वेळी तिच्या बाजूने ठामपणे उभं राहणं' हे तिला हवं असणार एकमेव सुख आपण दिलं नाही याची जाणीवही त्याला याच काळात झाली.
            दुसरा लेक दोन वर्षांचा होत आला , आणि ती जराशी सुटी झाली. मुलाची जबाबदारी बरोबरीने घेत ,त्या दोघांनाही किमान गप्पा मारायला थोडा वेळ मिळू लागला. ती सुद्धा तिच्या 'शिकवणे , वाचन, व्यायाम' या त्रिसूत्रीत परत गेली.
           आज प्रेमाचा दिवस. छान रेड कलरचे मॅचिंग कपल ड्रेस घालून चारही जोडपी तयार होती. चक्क आज सगळ्या पतीदेवांनी स्वयंपाकाचा भार उचलून एक एक पदार्थ आणला  होता. खरं तर हेच valentine चं मोठं गिफ्ट होतं. पण खरा रोमॅंटिक टास्क तर पुढे होता. काही कपल्सचं अरेंज मॅरेंज त्यामुळे 'प्रोपोज' करायचं राहूनच गेलं म्हणून लालचुटुक गुलाब आणले होते, आणि प्रत्येकाने बायकोला प्रोपोज करायचं होतं.
           आणि त्याला क्लिक झालं, हीच ती वेळ बोलण्याची ... मोकळं होण्याची . फक्त बायकांच्याच मनात साठतं असं कुठेय. पुरुषांच्याही साठतं की. शब्द जुळवायचीही गरज त्याला पडली नाही. त्याचा टर्न आला... हातात फुल धरून तो तिच्यासमोर गुढग्यावर बसला......
 " आपला हा दुसरा प्रोपोज आहे खरं तर , आधीचाही आठवतो .....किती छान दिवस होते ते.....
मला माहित आहे मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तुला माझ्या घरात खूप मानसिक त्रास झाला. ज्याच्या भरवशावर लग्न करून या घरात आलो तो माणूस खंबीर पाठीशी उभा असेल तर कोणत्याही परिस्थितीत बायको आनंदाने राहू शकते. हे कळायला उशीर झाला मला. तू बरोबर असूनही तुला त्रास होत असताना ठामपणे तुझी बाजू नाही घेतली मी. I m sorry. यामुळे आयुष्यातला खूप मोठा काळ तुझ्या क्षमतांचा विस्तार तू करू शकली नाहीस. यालाही अप्रत्यक्षपणे मी जबाबदार आहे. पण आता आपल्याला वेळ मिळतोय , मी तुला कायम सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन, नवरा - बायकोच्या पलीकडेही आपण आधी जसे एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो, ते विसरूनच गेलो , तसे पुन्हा बनुया. स्वच्छ मन असणारी पार्टनर मला मिळाली ,मी लकी आहे खरंच!
"Will you marry me again ?"
-  "Yes",  डोळ्याच्या कडा पुसत ती म्हणाली.
 डोळ्यासोबत मनावरच्या ओझ्याचाही बोळा निघाला....पाणी वाहतं झालं.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

(सत्यकथेवर आधारित)

Tuesday, January 8, 2019

नको तेच उद्योग मंडळ

#नको_तेच_उद्योग(मंडळ)
आजी-आजोबा बरेचदा नातवंडांना म्हणतात, "आमची मुलं नव्हती बाबा एवढी व्रात्य" .       असं काही नसतं .
सगळ्यांनी आपापल्या लहानपणी मोठ्यांना वैताग आणलेला असतोच . नाणी गिळणे, नाकात शेंगदाणा घालणे, खोली किंवा बाथरूम मध्ये जाऊन आतून कड्या लावून अडकणे, खिडक्यांच्या काचा फोडणे, कात्रीने स्वतःचे /भावंडांचे केस कापणे, पिठाच्या धान्याच्या रांगोळ्या काढणे, नळ चालू करून सगळा पिंप रिकामा करून घराचा स्विमिंग पूल करून ठेवणे हे आणि असले असंख्य प्रकार प्रत्येकाने केलेलेच असतात.
तरी आगाऊपणाची ठळक उदाहरणे झाली ,बाकी मित्रांच्या टोळीमध्ये परस्परसंमतीने बिनबोभाट उरकलेले उद्योग हा तर स्वतंत्र पोस्ट चा विषय होईल.😆😆
          मुलाचे लहानपण ते नातवंडं येणं यात किमान 25 वर्षांचा काळ मध्ये उलटून गेलेला असतो ,त्यामुळे मुलांनी लहानपणाचे बरेच असे वैताग आणलेल्याचा विसर आजी आजोबाना पडलेला असतो. दुसरं असं की मुलांचे शिक्षण , त्यांनी मिळवलेली बक्षिसे, त्यांची करिअर development असे खूप आनंदाचे आणि कौतुकाचे प्रसंग एव्हाना त्यांच्या डोक्यात घर करून असतात.
          ज्या घरात लहान मूल असतं ,त्या घरातल्या वस्तूंची रचना त्या प्रकारात असते ,म्हणजे सगळ्या वस्तू almost तीन फुटांच्या वर असतात. सैल झाकणाचे डबे वरच्या शेल्फ मध्ये असतात . विळी / चाकु/ स्क्रू ड्राइव्हर अशा टोकेरी ( इजा होऊ शकणाऱ्या ) वस्तू कट्ट्यावर ,खिडकीत अशा उंच ठिकाणी जातात. हॉल मधले टोकेरी कोपऱ्यांचे टेबल वा तसे फर्निचर नसते किंवा असलेच तर त्याच्या कडा रबरी कॉर्नर ने कव्हर केल्या जातात , पाण्याची भांडी मुलांच्या हाताला येणार नाहीत अशी वर ठेवली जातात.... वगैरे वगैरे . मुलांनंतर पुढे नातवंडे येईपर्यंत पुढल्या खूप वर्षात वरचेवर येऊन घरात वावरणारे हक्काचे लहान मूल नसते, त्यामुळे मोठ्यांच्या सोईनुसार घरातल्या वस्तूंच्या जागा सेट झालेल्या असतात . जसे की देवघर खाली येते , पिण्याच्या पाण्याचे हांडे ,कळश्या ज्या कट्ट्यावर चौकोनी बेसिन शेजारी असायच्या त्या खाली भरून ठेवलेल्या असतात. हे अस्स सगळं घर म्हणजे नातवंडांची प्रयोगशाळाच. मग काय होतात कुटिरोद्योग सुरू....
          मुलाच्या खोड्या निस्तरताना तरुण असलेले आजी -आजोबा नातवंडपर्यंत मात्र थकलेले असतात, त्यामुळे साहजिकच इतक्या वर्षांनी लहानग्यांनी घरभर सुरू केलेले प्रयोग त्यांना वरचा डायलॉग म्हणायला भाग पाडतात😂.
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Saturday, December 8, 2018

#दाढी
ज्या आयांना दोन मुलंच ,त्यांचे काय वांदे होत असतील. म्हणजे चौघांचं कुटुंब म्हणलं तर घरात 3 पुरुष , एक मोठ्ठा ,दोन छोटे छोटे . साधे सेप्टिपिन शेअर करायला पण चान्स नाही. मुलीला जितक्या सहज ती मागता किंवा शोधून दे म्हणून सांगता येते तसे यांना कसे सांगणार?तुम्ही म्हणाल सेफ्टीपिन काय ? हे उदाहरण आहे ( तसंही एक सेफ्टीपींन की किंमत तुम क्या जानो बाबू😢)काहीची मुलं देतीलही शोधून एखादयावेळी, पण नंतर भाडीपा मधल्या अनी सारखे 'क्काय? पिन?' असा डायलॉग येईल.
एरवीही आई काय म्हणतेय याकडे मुलांचं लक्ष नसतंच, ' हीची सारखीच काहीतरी बडबड चालू असते, काय लक्ष द्यायचं?  अस्सा ऍटिट्युड असतो (बापसासारखा). असं नसेल एखाद्या घरी , तर मुलं जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी असतातच सारखं 'काय करू?', 'काहितरी नवीन दे'  किंवा 'शोध'.
               यापेक्षाही भयावह म्हणजे 'माझं हे कुठाय? ,माझं ते कुठाय? असे प्रश्न विचारणारे तीन-तीन जण ??? ( इथं एक झेपेना ).
            दुसऱ्या खोलीत असलेल्या आई ला बोलवताना आपण "आई तू काय करतेयस?" अशी सुरुवात करतो .
माझ्या ओळखीच्या एक काकू आहेत त्यांना असे विचारले की त्या म्हणायच्या 'दाढी करतेय'. फार हसायला यायचं ऐकून, गंमत म्हणजे त्यांनाही दोन मुलंच
           आता हे सगळं डोक्यात येण्याचं कारण म्हणजे ,  स्वयंपाकघरातली आईची सुरी घ्यायला सर्कस सुरू झाली होती म्हणून सव्य ला प्लास्टिक सूरी ,काटे चमचे सेट आणून दिला मध्यंतरी. त्यातली एक सूरी घेऊन साहेब मला म्हणतात , "आई , दाढी कर, दाढी." मी म्हणाले मला नाही येत , मला म्हणायचे होते मला उगवत नाही ,तर त्याला वाटले की 'करता येत नाही, म्हणाला "मी करतो तुझी दाढी". हे ऐकून दुसऱ्या सेकंदाला मला त्या दाढीवाल्या...म्हणजे..' दाढी करतेय'
म्हणणाऱ्या काकू आठवल्या आणि त्यांचं दुःख मी समजून घेऊ शकले, त्याच्याच पुढच्या सेकंदाला दोन मुलं असलेल्या सगळ्या मैत्रिणी डोळ्यासमोर आल्या , त्यांची मुलं त्याच्या दोन्ही बाजूला बसून दोन्ही गालाची दाढी करत होती. 😂😂😂😂😂😂😂
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, November 14, 2018

अपेक्षांची दुसरी बाजू

बाळ असल्यापासून  आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो ... आपल्याही नकळत...  हेच की  रात्री जास्त वेळा उठू नये, जास्त रडू नये,  नीट पोटभर (त्यांचं का आपलं याबाबत गोंधळ ) खावं,  अंघोळ नीट करून घ्यावी वगैरे.....
             शाळेत गेल्यावर स्मार्ट असावं, तो अमका ढमका कसा बोलतो तसंच व्यक्त व्हावं, उगाच त्रास देऊ नये कोणाला , पण स्वतःचही सहज देऊ नये दुसऱ्याला, थोडक्यात डिफेनसिव्ह पण असावं वगैरे ,वगैरे ....

     अतिशयोक्ती नाही पण मरेपर्यंत काही ही लिस्ट संपत नाही...
तसे पाहता त्यांचा जन्म हा आपला निर्णय असतो, ते काही उपकार वगैरे नसतात.....त्यांनीही ते मानू नये....
       
         याची दुसरी बाजू मात्र फार कमी लोक विचारात घेतात किंवा त्यावर काही अंमलबजावणी करतात....
स्वतंत्र अस्तित्व म्हणून त्यांच्याही अपेक्षा असतातच की...पालकांकडून....
जास्त नाही ,छोट्या छोट्या (त्यांचं वयआहे तेवढ्याच छोट्याश्या),     वेळ देऊन खेळणे.... हाक मारल्यावर बघणे ..ओ देणे.. काय म्हणतोय ते ऐकून घेणे....
        पुढे शाळेत गेल्यावर सोडायला येणाऱ्या पालकांकडे बघून तसे तसे स्मार्ट वागणे ... इंग्लिश - विंग्लिश मुव्हीमध्ये थोडी झलक दाखवली आहे याची...
कालपरत्वे स्वतःच्या वागण्यात, पेहेरवात, स्वभावात बदल करणे....
म्हातारपणी किमान थोडाफार व्यायाम , फिरून  स्वतःला फिट ठेवणे , अंगावर दुखणी न काढणे, वेळच्या वेळी चेकअप करून घेणे वगैरे वगैरे ...
       पालक झालो की दुसरी बाजू विसरायला होते बहुतेक (यात मीही आलेच ) . बालदिन निमित्ताने  पालक म्हणून आत्मपरीक्षण आणि भविष्यविचार करताना जे मनात आले ते मांडले . अर्थात मीच मांडलेली ' दुसरी बाजू ' यावर विचार तर आहेच पण ते अमलात आणायला आजपासून सुरुवात करेन हे मात्र ठरलं!

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, August 7, 2018

युरेका

#युरेका
आज पुन्हा तेच झालं, त्याची शिकवताना चिडचिड आणि त्यानंतर तिचा अजूनच उडालेला गोंधळ. गेले महिनाभर तो तिला गाडी शिकवत होता, आणि त्याच्या म्हणण्यानुसार अजूनही ती खूप चुका करत होती.
झालं असं की इथे ड्रायव्हिंग क्लास लावणं परवडणारं नव्हतं, पण वाहतुकीचे नियम काटेकोर पाळले जायचे त्यामुळे चालवणं सोपं होतं. तो सुद्धा त्याच्या मित्राकडूनच गाडी शिकला होता. थोडी चूक सुद्धा महागात पडायची. लायसन्स वर पॉईंट चढणार , दंड तर भरवाच लागणार , गाडीचा आकार तर बिघडणारच , तो सरळ करायला खिशाला पुन्हा बांबू लागणार अशा भित्या आणि टेन्शन त्याला  असायचं आणि तो काही प्रोफेशनल ड्राइविंग टीचर वगैरे नव्हता.
हे सगळं तिला माहीत होतं , समजतही होतं, पण चिडल्यावरचे त्याचे वेंधळी , बावळट आणखी काही नवे नवे शब्द निघायचे ते तिला फार टोचायचे. नंतर त्यालाही वाटायचं ओव्हररिऍक्ट झालो आपण....पण एक चूक आणि पुढचे सोपस्कार त्याच्या टेन्शनने तो त्या वेळेत फाsर पॅनिक व्हायचा.
दुसऱ्या बाजूला ती मनाशी ठरवायची की त्याला बोलायची एकही संधी द्यायची नाही, इतकं व्यवस्थित चालवून दाखवायचं , पण ती काल जशी चुकली तशी सिच्युएशन आली की तो रागावूनच सांगायचा आणि मिठाचा खडा पडायचा, ती गोंधळायची, आणखी चुकांची भर पडायची.
           संध्याकाळच्या या ड्रायव्हिंगच्या तासाभराचे सावट आताशा तिच्या संपूर्ण दिवसावर पडायला लागले होते , स्वयंपाकातही कधी नव्हे तो गोंधळ होऊ लागलेला.
तिने ठरवलं...
'नकोच ते ...मला नाही शिकायचं ..सांगायचं आज त्याला. या विचारानेच तिला बरं वाटायला लागलं.
 ''रोज वेंधळी म्हणतो मला , इतकीच वेंधळी असते तर तुला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी जागेवर मिळतात, ते का उगीच ? एखादा पदार्थ खावसा वाटला तर त्याचं सगळं साहित्य घरात नेहमीच असतं, कुणाला जेवायला बोलावलं तर कमी पडत नाही आणि उरतही नाही, इतकी अचूक जजमेंट असतात माझी."
या स्वगताची तार अचानक व तुटली ती तिच्याच आतून आलेल्या प्रश्नाने ,
' मग गाडी चालवताना हे जजमेंट कुठं जातं बरं?'
-' हो ना, खरंच की ! म्हणजे आपण काही वेंधळ्या नाही! आपल्याकडे चांगली जजमेंट पॉवर आहे!'
तिने याच्या मुळाशी जायचे ठरवले . कॉर्पोरेट ट्रेनिंग मध्ये शिकली होती ना ती तसे रूट कॉज काढायचे...
'तो शेजारी बसून आत्ता ओरडणार , मग रागवणार अशा शक्यता गृहीतच धरून बसतो, त्यामुळे आपण
चुका करतो का काय?
 का असं आहे की , तो बसल्यामुळे चला काहीही झाले तरी तो आहे अशा कम्फर्ट झोन मध्ये आपण नकळत जातोय? जबाबदारी नकळत त्याला देतोय?
मग जर तो शेजारी नसेल तर?
हो हे ट्राय केलं पाहिजे , तरंच कळेल आपलं ड्रायव्हिंग जजमेंट".
विचार शेवटाला पोहोचला तोपर्यंत तीने गाडीची चावी हातात घेतलेली. रविवार असल्याने तो क्रिकेट खेळायला गेला होता , दोन तास तरी येणार नव्हता.
             एकटी गाडी चालवायची पहिलीच वेळ ... तिने बेल्ट लावला...चावीने गाडी स्टार्ट केली... पार्किंग मधून बाहेर काढली ..... स्टॉप साइन, राईट लेन चे नियम पाळत सोसायटी मधून बाहेर काढली... कोपऱ्यावरच्या मॉलला मागे टाकून नेहमी तिला अवघड वाटणारा राईट टर्न लीलया घेतला ....पुढे येणारा प्रत्येक टर्न तिचा आत्मविश्वास वाढवत गेला ....एक मोठा गोल फिरून ती घरी परत आली.कधी नव्हे ते दोन गाड्याच्या बरोबर मध्ये आज तिने गाडी पार्क केली.
स्वतःशी हसत हसत तिने घराचे दार उघडले.
आज तिचं काहीही बिघडणार नव्हतं , ना फूड , ना मूड.

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, April 19, 2018

व्यथा

         आतापर्यंत स्वतः ची काळजी न घेता , कष्ट केलेल्या आई - वडिलांना चांगले, निरोगी,आयुष्य,जास्त जगता यावे अशी कित्येक मुलांची निर्मळ इच्छा असते. लवकर परावलंबी व्हायला जसे आई-वडिलांना आवडत नाही तसे मुलांनाही आपल्या आई वडिलांना झालेलं बघणे आवडत नसतेच.
          स्वतः मिळवलेले किमान आरोग्यासाठीतरी स्वतः वर खर्च करायला जमत नाही , पण मुलं खर्च करायला वेळ द्यायला तयार असतील तरीही नाटच असतो.मुलं set होईपर्यंत काम आणि काटकसर केलेलीच असते, पण स्वतःची उतरवयातल्या शरीराची काळजी घ्या म्हटलं
'काय करायचंय??'कशाला ?असले प्रश्न.
        आई-बाबांचे धरणारे गुढगे, सतत दुखणारी कंबर, झिजणारे मणके बघणं सोपं नसतं हो....
कुठल्याही सणवारात उसनं अवसान आणून हे काम करतात.' आत्ता करतील आणि नंतर पडतील आडवे ' हे वाक्य यांना सुखावत असलं तरी मुलं काही ते आनंदाने बोलत नसतात.
        याउलट एखादे दिवशी आपण आजारी असताना औषधांचा एखादा डोस घ्यायची नुसती टाळाटाळ करून बघा , इतकी भुणभुण लावतील कानाशी की बाssssस . आपण म्हणालो की तुम्ही तरी कुठे नीट काळजी घेता स्वतः ची, मग आम्ही का घेऊ ? तर लगेच हल्लीची मुलं , ऐकत नाहीत.... आमच्या वेळेला ........ असं सुरू होईल सगळं ........
पण आम्ही पण घेऊ काळजी तुम्ही म्हणता तशी असं काही म्हणत नाहीत.
    मुलाच्या वागण्याला लहानपणी जसे आई-वडिलांना जबाबदार धरतात , तसेच म्हातारपणी त्यांना काही झाले तर मुलांनाच जबाबदार धरतो समाज आणि मुलांना वाट्टेल ते ऐकवतो, बोलतो.एरवी लोकांच्या बोलण्याची यांना पडलेली असते. मुलांविषयी हे असं कुणी (त्यांची चूक नसताना )बोललेलं किंवा कानावर आलेलं चालतं का?
     दुखण्याचा बाऊ करू नये हे बरोबर पण त्याकडे अशक्य दुर्लक्षही नको.
     म्हातारपण हे दुसरं बालपण म्हणतात. न ऐकलं लहान मुलांना दोन धपाटे देता येतात. यांचं काय करायचं?
        जे ज्येष्ठ स्वतः ची काळजी घेऊन निरोगी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात त्यां सगळ्यांना माझा इथूनच कौतुकास्पद नमस्कार ..

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, April 11, 2018

बाकी काहीही दुखू दे , दात नको..दातदुखीचा धसका 99%लोकांना असतोच. त्यात नेमके हे दात रात्री ठणकायला सुरुवात करतात . लवंग , पैन किलर , कश्श्या कश्श्याचा म्हणून उपयोग होत नाही , तो ठणकत राहतोच, झोप कशीबशी लागली तरी दिवसा खायचे वांदे होतात ते वेगळेच. इतक्या खत्रुड वेदना सहन करूनही बरेचजण डेंटिस्टची पायरी काही चढत नाहीत. कारण एकच 'भीती'.
       हे फक्त दाताच्या बाबतीत नाही तर कान आणि नाक   या बाबतीतही असतेच, कारण या आपल्या अत्यंत खाजगी जागा आहेत. याला दुसऱ्या कुणाचा हात लावू देणं हे मेंदूलाही चटकन मान्य होणारं नसतं, मेंदू शरीराला defencive मोड मध्ये जायची आज्ञा देतो. पण treatment च्या वेळेला हे आपल्या भल्याचं आहे हे मनाला ठाऊक असतं, त्यामुळे मन आणि मेंदूची आज्ञा याचं कॉम्बिनेशन तयार होतं , ते म्हणजे प्रचंड भीती.
त्यातून भरीस भर म्हणून डेंटिस्टचं त्याच्या छिन्नी-हातोड्याचं सुसज्ज केबिन. त्याच्यासमोर आssss करून बसल्यावर तो त्याच्या अस्तन्या सरसावून तीन चार कसले कसले tools तोंडात घालायला लागतो.
इतर अनेक सुररर , फुररर , सुईईइ , पीपीपी असा आवाज करणाऱ्या अनेक यंत्रांनी ही भीती आणखी गडद होत जाते.... की बरेचजण अगदी आणीबाणीची वेळ आल्याशिवाय ( लोकांचे दात कोरून पोट भरणाऱ्या, बिच्चाऱ्या ) dentist कडे जात नाहीत.
       ही पोस्ट एवढ्या confidently लिहिण्याचे कारण मला भीती वाटत नाही ( इतकं दातांच काम झालंय ).
त्यामुळे आता मी भिणाऱ्यांवर दात काढून हसते.
#आपले_दात_आपलीच_पोस्ट

©वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, March 30, 2018

_घरोघरी_तीच_आजी

#आजी_रॉक्स_सगळे_शॉक्स
यावर्षी मी मुलींना सांगितलंय की मी काही उन्हाळी वाळवण पाठवणार नाही , तुम्ही पण मला काहीही पाठवू नका" , इति आज्जी ( दरवर्षीचा डायलॉग )
काही दिवसांनी मामाबरोबर डबे येतातच.....
" आग आई काय हे , या वयात काय काहितरी करत बसतेस, कशाला एवढं  ?" इति लेकी ....
काय ? फार काही नाही केलं....
यांना पोह्याच्या पापड्या आवडतात म्हणून केल्या थोड्या!
परवा उपास होता, साबुदाणा जरा जास्त भिजवला त्याच्याही पापड्या केल्या , खिचडी जात नाही हल्ली!
उडदाचे पापड किती महाग ? अमुक पैशाला अमुकच येतात, त्यात बघ तुम्हाला तिघींना झाले पापड..
यांना म्हणलं मी मटकीची डाळ दळून आणणार असाल तरच करणार सांडगे ... आणलं यांनी दळून ....!
गुरुवारच्या मंडईत मोठे बटाटे चांगले मिळाले आणि स्वस्त मग थोडा कीस केला... मला खिचडी नाही आवडत उपासाला...
एवढंच ... बाकी काssही केलं नाही....तुमच्या लहानपणी केवढं करायचे... होत नाही आता...
********************************************
दिवाळी
"यावर्षी मी फराळाचं काहीही करणार नाहीये . हल्ली विकत मिळतं सगळं, आणि अगदी बारा महिने मिळतं.
पूर्वी दिवाळीलाच व्हायचं त्यामुळे भरपूर खायची मुलं",

मग सुरुवात लाडवाच्या डब्यापासून होते आणि त्याची कारणे पुढीलप्रमाणे,
फक्त लाडूच देणारे तिघींना... करंज्या कुणी खात नाही म्हणून थोड्याच केल्यात.... चकल्या घालायला आता जोर नाही लागत त्यामुळं कडबोळ्या केल्यात....
शंकरपाळ्या चहात बुडवायला बर्या लागतात .....
ह्यांना आवडते म्हणून थोडी शेव केली
कुणी शेजारीपाजारीनी दिले तर त्यांना द्यायला नको का फराळ म्हणून केलं आपलं थोडं.
पूर्वी डबेच्या डबे भरून करायचे ..
आता होत नाही पूर्वीसारखं....चिवडा केला की पाठवते "
#_घरोघरी_तीच_आजी

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, March 22, 2018

गरिबी...

परिस्थिती आर्थिकदृष्ट्या वाईट असताना , पैसा जोडत - साठवत जाणे , हौसमौज न करणे , वायफळ खर्च न करणे, आहे त्यात भागवायचा प्रयत्न करणे ही म्हणजे काटकसर...
ती आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हा , कमी / जास्त प्रमाणात करावी लागते.
पण परिस्थिती चांगली झाल्यावर , आर्थिक आवक चांगली झाल्यावर आपल्या आवडीच्या गोष्टींवर , छंदावर, updated सोयीसुविधांवर पुरेसा पैसा नक्की खर्च करावा. चांगले, पौष्टिक खावे / प्यावे.
पण ह्या गोष्टी जे करू शकत नाहीत ते काटकसरीची सीमारेषा ओलांडून कंजूषपणाकडे वळलेले असतात.
      काही वेळा खूप वर्षे काटकसरीत काढलेल्याना लाखो रुपये मिळाले तरी मुळाशी कसलीतरी अनामिक भीती असते बहुतेक की 'ते दिवस परत आले तर?' किंवा
( इतक्या वर्षांच्या काटकासरीचा ) सवयीचा परिणामही असू असतो की चांगले दिवस येऊनही ते मानसिक गरिबीतच जगतात....
    ही भीती वाढत्या वयाची अपरिहार्यताही असावी कदाचित ......
मानसिक गरिबी आणि आर्थिक गरीबी यांचं एक दुष्टचक्र असतं, जोपर्यंत आपण त्यावर मात करत नाही तोपर्यंत  ते  आपली पाठ सोडत  नाही.....
मग साठवलेल्या पैशाला नको असलेल्या अनेक वाटा फुटत जातात ....

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, January 29, 2018

हळदीकुंकू

#हळदीकुंकू
वाण 'लुटायचे' अशी खास ओळख असणारे म्हणजे संक्रांतीचे हळदीकुंकू. सध्याची पद्धत पाहता 'लुटणे' का म्हणायचे? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे . खरेतर वेगवेगळ्या वस्तुंचे वाण मांडून ठेवायचे आणि हळदीकुंकू घेऊन बायकांनी त्यातील आवडेल ती वस्तू घ्यायची,असे होते म्हणून याला लुटणे म्हणतात. मैत्रिणीशी बोलताना मला यात आणखी एक कल्पना सुचली , मी ही वेगवेगळ्या(उपयोगी) वस्तू मांडल्या, चिठ्ठ्यात त्याची नावे लिहिली. ज्या वस्तूच्या नावाची चिठ्ठी जी उचलेल ते तिचे वाण (घावंल त्याला पावंल) असे वाण लुटले. त्यांनाही मजा वाटली.
           माझे लहानपण ज्या कॉलनीत गेले तिथे सगळ्या जातीधर्माच्या बायकांना हळदीकुंकूचे बोलावणे असायचे.
कपाळाला नाही पण मंगळसूत्र किंवा गळ्याला हळदीकुंकू लावून घ्यायच्या त्या, वाणही घ्यायच्या... आनंदाचे वसे जणू.
विधवा बायका किंवा वयस्कर आजी, त्यांनाही बोलावले जायचे. त्यांना ऑकवर्ड वाटू नये म्हणून , 'देण्याघेण्यात काही चुकले/ विसरले तर सांगायला ,लक्ष तरी ठेवायला या, म्हणजे आम्हाला आधार वाटेल' अशी गळ घालून का होईना , पण त्यांनाही आनंदात सहभागी होता येईल असे बघितले जायचे.
          मध्यंतरी हळदकुंकू संदर्भात काही उलटसुलट विधाने वाचनात आली. 'काही आक्षेपार्ह गोष्टीमुळें आम्ही हळदीकुंकू करायचे सोडले',वगैरे... मला एक कळत नाही , असे म्हणणाऱ्या आणि त्याला पाठींबा देणाऱ्या लोकांना त्या आक्षेपार्ह गोष्टीं टाळून स्वतःच्या घरी हळदीकुंकू करण्यासाठी कुणी अडवले होते का? असे केले असते तर खरेच ते एक कौतुकास्पद पाऊल ठरले नसते का?
         सगळी घरे आपलीशी करणारा हळदीकुंकूहून चांगला कार्यक्रम माझ्यातरी पाहण्यात नाही.  एखादी प्रथा पूर्णपणे चुकीची ठरवून त्याला फेकून देण्यापेक्षा त्यात जे चांगले आहे ते उचलून पुढे चालवण्यात शहाणपण आहे.
        इथे अमेरिकेत तर आम्ही मैत्रिणी एकत्र येऊन असे आनंदाचे वसे लुटण्याचे बहाणेच शोधत असतो. 👇🏻


Tuesday, January 16, 2018

फुगेवाला

#फुगेवाला
 Ice festival च्या तंबूत दिसला तो.
जत्रेत/सर्कशीत मोठ्या पायांवर उभे राहणाऱ्या विदूषकासारखा उभा होता. डोक्याला हॅट , हॅट ला नमुना म्हणून एक twised बलून ने केलेला डॉगी चा आकार लावून.
कंडक्टर सारखी पिशवी, त्याला असंख्य कप्पे, त्या कप्प्यात असंख्य रंगाचे उभट फुगे, एका कप्यात कात्री न एकात पैसे.
समोर पालक-मुलांची रांग, आणि बघ्यांची गर्दी.
कारण मागणी तसा पुरवठा.
युनिकॉर्न, मिकी माउस, डॉग, कॅट, बटरफ्लाय, स्वोर्ड..
 काय मागेल ते तो त्याच्या बलून ने करून देत होता.
ऑर्डर मिळाल्यावर तो आकार, त्याला लागणाऱ्या फुग्याचे रंग त्याला किती आणि कसे ट्विस्ट दिले म्हणजे पाहिजे तो आकार मिळेल हे सगळं जणू छापलच होतं त्याच्या डोक्यात.
प्रत्येक ऑर्डर पूर्ण करायला त्याला दोन मिनिटं तरी त्याला लागत होती , पण मुलांची रांग काही कंटाळत नव्हती ,
त्याच काम बघताना मुलांबरोबर पालकही गुंतत होते.
घाई न करता , मन लावून, तो त्याची प्रत्येक कलाकृती करत होता , त्यामुळे एकही फुगा चुकीचा फुगला नाही ,फुटला नाही, extra ही झाला नाही.
काठीला गोल फुगे अडकवणारा फुगेवाला पासून हा इनोव्हेटिव्ह फुगेवाला हा प्रवास आवडला.
मूळ पाया पक्का ठेवून अपडेट आणि अपग्रेड होणाऱ्याला नामशेष होण्याच्या धोका नसतो.

वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, November 10, 2017

PRO

#_P_R_O
घरातील सगळीच माणसे मनमिळावू आहेत अशी कुटुंबे फार कमी . उरलेल्या बाकी घरातील लोकांमध्ये कोणी एक व्यक्ती  PRO( public relation officer ) असते.....
 नातेवाईक, शेजारी-पाजारी, त्यातुन निर्माण झालेल्या ओळखी, ह्या सगळ्या लोकांना आपल्या घराशी ही व्यक्ती जोडून ठेवतो. हा PRO चा बिनपगारी job सोपा नाही.
विरुद्ध स्वभावाच्या माणसांना हँडल करणे ,
अहंकारी लोकांची मने सांभाळणे, 
एखाद्या सण समारंभात एकमेकांशी न पटणाऱ्या दोन व्यक्तींची मर्जी राखणे,
 सतत कटकट करणाऱ्याला एखाद्याला समंजसपणे सामावून घेणे,
जे काही थोडेफार शहाणे , समजूतदार असतात त्यांनाही कायम गृहीत न धरता ,त्यांचे कोड पुरवणे ,
वयस्कर लोकांच्या तब्येतीची आवर्जून चौकशी करणे.....वगैरे वगैरे
अशा अनेक कसरती त्यांना दरवेळी कराव्या लागतात.
            काही फेक PRO पण असतात , कोणाचं काय चाललंय हे कळावं (म्हणजे गॉसिप ला विषय मिळतो)किंवा (तो आमकां/ढमका मुळीच करत नाही पण )आम्ही सगळ्यांचे सगळे कसे करतो याचे मानसिक समाधान त्यांना मिळवायचे असते.
           तारेवरची कसरत सांभाळून आपले कुटुंब इतर माणसांशी, समाजाशी जोडून ठेवणार्या ओरिजनल PRO ना
Hat's off ....👌

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Monday, November 6, 2017

हनुमॅन

#_हनुमॅन
            भीती वाटली किंवा कोणतीही ताकदीची सीमा म्हंटली की आठवायचा तो मारुतीराया. लहानपणीचा सगळ्यात आवडता आणि जवळचा वाटणारा देव.
आजोबांनी गोष्टी सांगताना हनुमान त्याच्या वेगवेगळ्या पैलुंसकट इतका सुंदर उभा केला होता की बाकी कुठलेही सुपरहिरो मला तितकेसे कधी आवडले नाहीत. मुळात त्यांच्यात आणि इतर सुपरहिरो मध्ये मुख्य फरक हा की,   भीती वाटल्यावर किंवा संकटांच्या वेळी सुपरमॅन नाही आठवत किंवा आठवून बघितला तरी धीर नाही येत, पण कधी एकदा सुद्धा म्हणलेले मारुतीस्तोत्र किंवा त्याची एखादी गोष्ट आठवून बघा आलेल्या अडचणींचा सामना करण्याची ताकद नककी येईल.
          पुढे संदीप खरे च ' सुपरमॅन' गाणं ऐकल्यावर वाटलं की हे गाणं लहान मुलांसाठी नाहीच . या गाण्यात सुपरमॅन खूप ताकदवान, सगळ्यांना मदत करतो, अडचणींना धावून जातो, सगळ्यांचा फेव्होरेट...  पण आतून का कोण जाणे त्याला एकट वाटतं , उदासपणा येतो.   अशा एकटेपणातच एका उंच शिखरावर गेला असता त्याला हनुमान भेटतो ....
त्याला कर्मयोग सांगतो, आत्मभान देतो.
           कासव' film ची समीक्षा वाचल्यावर तर हे गाणं आणि मारुतीराया पुन्हा प्रकर्षाने आठवला. 
        वालीच्या सैन्याचा सेनापती 'केसरी' चा तो मुलगा , जन्मतानाच चांदीचा चमचा जणू तोंडात घेऊन आलेला....
वडिलांनी बेस सेट केलेला .... उत्तम शिक्षण देऊ केलेला , भाषा /व्याकरण यात पारंगत ..व्यायामाने , तंत्रशुद्ध बाहुबल आत्मसात केलेला .....
अगदी आताच्या पिढीसारखा, ज्यांना आधीच पायघड्या घालून ठेवल्यात (बेस सेट आहे असा)
पण....
अतुल बुद्धी आणि अचाट शक्ती आपल्या राम भक्तीने (आपण आत्मभानाने म्हणूया ) संयमित केली त्याने ....
त्यामुळे त्याला कधी frustration आलें नाही....
एकटेपणा / पोकळी असले काहीही जाणवले नाही...
आपल्या हातून योग्य कार्य राम करवून घेतो, आपण निमित्त मात्र... याच भावनेने कार्य केल्यानें संकटमोचन झाला...
       मुलांना येणारे ताण,तणाव यावर उपाय लहानपणापासूनच आपल्या या देशी सुपरहिरो ची नीट ओळख करून द्यायला हवी, पालकांनीच तो आधी नीट समजून घ्यायला हवा.
मारुतीस्तोत्र, त्याचा अर्थ..याने त्यांना धीर तर मिळेलच पण आताच्या तरुण पिढीला येणारे frustration, निराश यावरही नक्कीच हा 'रामबाण' उपाय ठरेल असे मला एक पालक म्हणून वाटते . 
     आफळे बुवांच्या कीर्तनात त्यांनी कुठल्याही चमत्काराशिवाय , माणूस म्हणून हनुमान ( अगदी लॉजिकली ) मांडलाय. प्रत्येक पालकाने ऐकावे असे हे किर्तन, त्याची लिंक
https://youtu.be/yUJhGFb6BMQ




वीरश्री वैद्य - करंदीकर

Thursday, October 5, 2017

...... आणि मावशी जगो...

#________आणि_मावशी_जगो
आईपेक्षा लहानपणी मुलांना मावशीनेच जास्त सांभाळलेले असते .
मावशी लहान असेल तर मग दंगा , मस्ती , खोड्या
असा डाम्रटपणा करायला त्यांना खुल्ली सूट मिळावी, म्हणून ती त्याच्यात सामील होते,
आईच्या वटारलेल्या डोळ्यांना मग कोणी भाव देत नै
( एकूण काय .... आईचे काsssही चालत नाही)
मावशी मोठी असेल तर ती लाड खूप करते, म्हणेल तो ड्रेस, म्हणेल तो पदार्थ खायला , म्हणेल तिथे फिरायला ....... कारण इथे आईवर डोळे वटारायचा अधिकार तिला असतो.
( इथेही ........आईचे काsssही चालत नाही)

               कसलीही मदत न करता उगाच फुकाचे सल्ले  देण्यात लोक व्यस्त असतात तेव्हा मावशी बाळाची शी धुण्यापासूनची कामे करण्यात बाळाच्या आईला मदत करत असते.
          न रागावता , न ओरडता मुलांच्या कलानी घेत त्यांना समजावून देत  चांगल्या सवयी लावण्यात मावशीचा हातखंडा असतो. ..... तुला सगळ्यात जास्त कोण आवडते???
असे भाचेकंपनीला  बुचकळ्यात टाकणारे प्रश्न ती विचारत नाही .  त्यांच्या  मनातली आपली जागा ती राखून असते.
         सारखे खेळणी , खाऊ , काही ना काही gift असले फसवे temptation न देता , न दाखवताही ती भाचेकंपनीची लाडकी होते.
मुलं निरागस असतात म्हणूनच कोण मायेने आपले करते ते त्यांनाही चांगले ठाऊक असते.

विंदा करंदीकर यांची एक छोटीशी पण बरीच बोलकी कविता

मावशी

सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठीं
आणते चाकू.

कोल्हापूरहून
येते आत्ते;
माझ्यासाठी
आणते पत्ते.

राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पाप्पा घेते.

© वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, October 3, 2017

Sweet home

स्वतःचाच घरात बोअर झालंय किंवा कंटाळा आलाय असं कोणी म्हणालं की मला  फार फार आश्चर्य वाटायचं की असं कसं होऊ शकतं ?, ज्या घरात लहानपण घालवलंय त्या घरात  कंटाळा कसा येऊ शकतो ?
           शिक्षणासाठी मुलं परगावी जातात..... हळूहळू त्यांचे सामान कमी कमी व्हायला लागते ..... ते गेल्यावर त्यांच्या कप्प्यावर , जागांवर अतिक्रमण व्हायला सुरुवात होते .... स्टेशनरीच्या कप्यात स्क्रू ड्राईव्हर , खिळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू , चार्जर, बॅटरी इ. इ. असे काही समान जायला सुरुवात होते , कपडे कप्प्यात कोपऱ्यात सरकवले जातात ,  तो कप्पा extra वाले , आहेरात आलेले कपडे , शाली, टोप्या यांचाच होऊन जातो......मोठी झाली मुलं..... आता काय करायचेत स्केचपेन?, काय करणार त्या चकचकीत कागदांचे ? असे म्हणत म्हणत stationary वगैरे हळूहळू हद्दपार व्हायला सुरुवात होते .
           मुलांच्या या nostalgic , विरंगुळ्याच्या जागा कमी झाल्या , किंवा त्या जागेला भागीदार आले की मग करमेनासे होत असावे बहुतेक. मुलीचे दागिने , कपडे यांना आईच्या कप्प्यात जरातरी एखादी वेगळी जागा मिळते , पण बरेचदा मुलांचे तसे होत नसेल ..... आणि एव्हाना मित्रांची लग्न पण झालेली असतात, कुणी बाहेर set झालेला असतो , तर कुणाच्या priorities बदललेल्या असतात........ज्यांच्या घरी जाता यावे असे कोणी  नातेवाईक नसतात.......

शिक्षण , नोकरी निमित्त, बाहेर राहून सुदधा मला घरी नेहमीच करमायचे
कारण
ड्रॉवर मध्ये भरलेली भरपुर स्टेशनरी , क्राफ्ट चे समान , वेळोवेळी जमवलेले  चमकदार कागद , थर्माकोल चे गोळे , लेस , टिकल्या , विणकामाचे समान .... वगैरे वगैरे .....
   
याने मन भरलं की वाचायला भरपूर पुस्तके .....

 वाचायचा मूड नसेल तर बागकामाला वाव .....

  हे सुद्धा नको असेल तर घरात बागडणारे , खेळणारे मांजर

  मांजर बाहेर गेले असेल तर गच्चीवर ची मस्त हवा ......

मामा , मावशीकडे जाऊन गप्पाटप्पा........
 
    संध्याकाळी चौघे एकत्र जमलो की दिवसभरात काय झालेे याची देवाण घेवाण , चिडचिड / कटकट नाही....
   
       एखादा विनोदी सिनेमा किंवा विनोदी मलिका एकत्र बघणे ......... रोजच्या बातम्यांवर चर्चा......
वगैरे.........वगैरे........

,© वीरश्री वैद्य - करंदीकर

Wednesday, September 13, 2017

#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?

एखादी emergency असणारी परिस्थिती म्हणजे accident , operation वगैरे........ . इथे खमक्या(कणखर) लोकांची फार फार गरज असते .
सुतकी चेहरा करून वावरणे, हातपाय गाळून बसणे, उगाच वाईट साईट विचार करणे अशाने ज्या व्यक्तीवर  emergancy ओढवली आहे त्याच्या भोवतीही एक उदासवाणे , निराशाजनक वातावरण पसरते.
            अशा वेळी तिथले वातावरण नीट करण्यासाठी खमक्या लोकांचा  positive attitute परिणामकारक ठरतो.
             खमके , कणखर म्हणजे कोरडे वा भावनाशून्य नव्हे. ( कारण असा अर्थ बरेच लोक काढतात.)
खरेतर खमकेपणा हा ज्यावर ही emergacy ओढवली असेल त्याच्या काळजीपोटीच येतो. ( rather तो यायला हवा )
 त्याच्या आजूबाजूचे negative वातावरण घालवणे ,भक्कम मानसिक आधार देणे या हेतूनेच येतो.  काही लोक जात्याच खमके असतात तर काहींना परिस्थिती बनवते.
              ज्या घरचे लोक खमके असतात तिथे व्यक्ती आपल्यावर आलेल्या अडचणी , office चे टेन्शन, इतर ताणतणाव मोकळेपणाने मांडू शकतो. अति काळजी असणाऱ्या घरात मुले इंडिपेंडंट झाली की घरच्यांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपले tensions साधे बोलतही नाहीत.
Generaly अति काळजी करणाऱ्या लोकांना high / low Bp वा heart problems असतात. आपल्या अडचणी सांगितल्या तर धीर मिळणे तर लांबच, यांचीच तब्येत बिघडून नवी emergancy नको, असा शहाणा विचार असतो यामागे.
              'तुम्ही / तो /ती आम्हाला काssही ( अडचणी, problems) सांगत नाही' अशी तक्रार करण्याआधी आपण तेवढे  सक्षम आहोत का,  हा विचार नक्कीच व्हायला हवा .

एक वाक्य फार पूर्वी वाचनात आले होते , ते या situation ला चपखल बसते
#Are_u_a_solution__Or_part_of_the_problem_?

@ वीरश्री वैद्य - करंदीकर

Tuesday, August 15, 2017

नवरे येती स्वयंपाकघरा

#_नवरे_येती_स्वयंपाकघरा

काही नमुने :-

नवरा -भांडं कुठं आहे ?
बायको- खालच्या कप्प्यात.
नवरा - डाळीचे पीठ?
बायको - वरच्या कप्यात उजव्या बाजूला.
नवरा - चिरलेली भाजी?
बायको - फ्रीज मध्ये.
नवरा - मोठा डाव कुठे ठेवलास ?
बायको - ड्रॉवर मध्ये.
नवरा - मसाल्याचा डबा ?
बायको - ?????? 😠😠😠
              राहू दे मीच करते ......
******************************************
नवरा खिचडी करणार असतो.
कट्ट्यावरचे त्याने मांडलेले सामान
 तांदूळ , मुगाची डाळ, मिसळणाचा डबा , गुळाचा डबा    पाण्याचा ग्लास, मीठ , कोथींबीर, सूरी , डाव वगैरे

बायको - ( हे सगळं बघून ) काय कुकरी शो वाले येणारेत
                का ? खिचडीचं coverage घ्यायला ?  
             
*******************************************
नवऱ्याने पदार्थ करून झालेला , कट्टा (चक्क) स्वच्छ ,
 पण......
सिंक मध्ये भांड्यांचा डोंगर...chopping board , किसणी सुरी सकट....
*******************************************
बायको - जरा भाजी टाकता का?
नवरा -   बरं , पण मी माझ्या आवडत्या भांड्यात करणार.
  भाजी झाली
10 जणांची भाजी होईल एवढं मोठ्ठ भांडं (आवडतं☺)
 त्यावर काचेचं जड  झाकण

भाजी .... भांड्यांच्या तळाशी
********************************************
नवरा -    आज मी करतो (बनवतो )नाष्टा
बायको -  बरं , करून झाला की मला स्वयंपाकघर
              परत पूर्वीसारखं करून द्या .
*********************************************

दुर्मिळ किंवा काहींच्या स्वप्नातील नवरा
स्वयंपाक तयार ....
भांडी घासलेली......
गॅस , कट्टा साफ .....
**********************************************
© वीरश्री वैद्य - करंदीकर

Friday, August 4, 2017

Friendless

#_friendless
मैत्री दिनानिमित्त थोडेसे
माझ्या परिचितांपैकी एकाच्या मुलीनी , मुलाला कोणी मित्र नाहीत म्हणून लग्नाला नकार दिला. हल्ली मुलींच्या अटी फारच असतात , फारच igo असतो  हा माझा मुद्दा नाहीये.
     मुलीचे म्हणणे पडले त्याला कोणीही मित्र नाहीत , म्हणजे रोज उठून सगळ्या गोष्टींबद्दल तो माझ्याच डोक्याशी कटकट करणार.
      हे ऐकून मलाही वाटले होते की हे काय नकाराचे कारण असावे का? मुळात मित्र-मैत्रिणी (best friends) नसू शकतात हे काही पटेना , पण नंतर असे दोन नमुने समोर आले आणि पटले की अशीही माणसे असतात, याने एक पालक म्हणून मला विचारात पाडले.
       प्रगल्भता यायला , भावनांचा योग्य निचरा व्हायला , योग्य वयात समवयीन, समविचारी मित्र-मैत्रिणी अत्यंत आवश्यक असतात.
या friendless नमुन्यांबद्दल थोडे निरीक्षण मांडते......
      शाळेत ,कॉलेजमध्ये होते मित्र पण कुणी आता contact मध्ये नाही, अशी अवस्था असते. best friend वगैरे नसतात.
मग आई , वडील किंवा भावंडे यापैकीच कोणीतरी असे असते की ज्यांच्याशी ते मोकळेपणाने बोलतात. बरेचदा आईच असते.
आईच्याच डोक्याशी सगळे काही...
मुलांच्या बदलत्या वयानुसार त्यांचे मित्र होऊन समजून घेण्याची मानसिकता प्रत्येक आईची असतेच असे नाही.
 ( मुल कसेही असले तरी आई ला प्रिय त्यामुळे नीट मार्गदर्शन ,प्रसंगी कानउघडणी होतेच असे नाही)
       त्यातून यांच्यात अनेक न्यूनगंड निर्माण झालेले असतात.
हे बरेचदा attention सिकर असतात. भावंड असेल तर ते खूप लाडके आहे , असा समज असतो. हा समज दूर करण्यासाठी आईकडून अनेकदा फाजील लाड केले जातात.
माझ्यावर कसा अन्याय झालाय , असे सारखे सारखे उल्लेखात आणून ही मुले जन्मभर त्याचा फायदा घेत आईकडून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतात .
        त्यांचा स्वभावही चिडचिडा आणि कटकटी करणारा होऊन जातो , जरा काही मनाविरुद्ध झाले की सगळ्या घरभर कटकट करत फिरणे, आपल्याला सोडून बाकीचे सगळे मजा करतात, आपली कुणाला काही पडलेली नाही असे ग्रह करून घेणे , दुसऱ्याला त्रास होईल असे मुद्दाम वागण्याचा नतद्रष्टपणा करणे असे उद्योग सुरु होतात , आणि मग तो स्वभावच बनून जातो . मग अशा माणसांशी बोलायला तरी आवडेल का कुणाला ?
         यावरचढ आईची पाठराखण , लहानपणी समवयीन मुले मुली खेळायला नव्हती ( मग शाळा ,कॉलेज मध्ये काय होते?),
काही आयाना हा अभिमान असतो आपल्या मुलांच्या आयुष्यात फक्त आपणच खूप महत्वाचे माणूस आहोत.
खरे तर ही अभिमानाची नाही , विचार करण्याची गोष्ट आहे.
मित्र - मैत्रीण नसणे ही गोष्ट व्यक्तिमत्वात अनेक negetive बदल लहानपणापासूनच आणते. (Iike slow poisoning)
        असे लोक पाहिल्यावर वाटते  त्या मुलीने योग्य निर्णय घेतला.
           सध्या इथे फार मित्र-मैत्रीण नसणारी , आत्मकेंद्रित मुले मी पाहत आहे , किमान 5 वर्षाची झाल्यावर तरी खाऊ वाटून खाणे , खेळणी share करणे हे सुद्धा ती मुळीच करत नाहीत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पालक म्हणून मला पडलेले काही प्रश्न

* हे असे नेमके friendless कसे काय होतात?
* इतके की वयाची चाळीशी आली तरी याना मित्र का असू नयेत ???
*  आपली मुले अशी होऊ नयेत यासाठी पालक म्हणून काय करता येईल ?
* माझ्या मुलांना योग्य मित्र शोधायला / निवडायला  मदत कशी करता येईल?

@ वीरश्री वैद्य - करंदीकर